आज माकड चाळे करणाऱ्या जावेद हबीबचे वडील एकेकाळी डॉ. अब्दुल कलामांचे केस कापायचे

जावेद हबीब. भारताचे सुपरस्टार बार्बर. आज तो चर्चेत आला कारण त्याने एका बाईंचा हेअर कट करताना त्यांच्या डोक्यावर थुंकला. त्याचा हा प्रकरण व्हिडीओद्वारे सगळ्या देशात व्हायरल झाला. एकेकाळी आपल्या हेअरस्टाइलिंग साठी फेमस असलेला जावेद हबीब आता माकडचाळ्यांमुळे गाजू लागला आहे.


हे सगळं जरी असलं तरी त्याच्या खानदानाची हेअर कटिंगची परंपरा खूप जुनी आहे 

नव्वदच्या दशकातली गोष्ट. हबीब अहमद दिल्लीत आपलं हेअर सलून चालवायचे. एकदा त्यांच्या सलून मध्ये एक व्यक्ती आली. साधी शर्ट पँट, कानापेक्षा खाली वाढलेले केस, बरोबर मधून पाडलेला भंग. थोडेसे लाजरे बुजरे वाटणारे ते म्हणाले,

“hello my name is doctor kalam.”

त्यांना कोण ओळखत नव्हत! भारताचे मिसाइलमॅन डॉ. अब्दुल कलाम आपल्या दुकानात आले आहेत हे कळल्यावर हबीब अहमद यांना धक्का बसला. पंतप्रधानांच्या सल्लागार पदी निवड झाल्यामुळे कलाम नुकताच दिल्लीला शिफ्ट झाले होते.

हबीब रहमान यांनी केलेली कटिंग कलामांना पसंत पडली.

तसंही त्यांच्या काही मोठ्या अपेक्षा नसायच्या. देशकार्यात बिझी असल्यामुळे आपल्या हेअरस्टाईलकडे लक्ष देण्यास वेळ देखील नसायचा. उलट हबीब त्यांना म्हणायचे की

तुमची हेअरस्टाईल आपण चेंज करू पण कलाम नम्रपणे नकार द्यायचे.

रामेश्वरम मध्ये आपल्या गावातल्या केश कर्तन काराने वर्षानुवर्षे जस केस कापले आहेत तसच दिल्लीतल्या हेअरस्टाईलीस्टने कापावेत असच कलामांना वाटायचं.

तरीही एकदा आगाऊपणा करून हबीब अहमद यांनी न विचारताच कलामांची नव्या स्टाईलने केस कापले. डॉ.कलामांना ही स्टाईल आवडली नाही. पण कोणताही रागराग किंवा अकांडतांडव त्यांनी केला नाही. काही न बोलता तिथून निघून गेले.

हबीब अहमद यांना वाटलं की आता कलाम आपल्या दुकानात परत येत नाहीत.

पण तसं घडल नाही. जवळपास महिन्याभराने अब्दुल कलामांची स्वारी त्यांच्या दुकानात आली आणि म्हणाले,

“आता माझे केस बरेच वाढले आहेत. फक्त ते पूर्वी प्रमाणे करून द्या.”

हबीब अहमद यांना आश्चर्याचा धक्का बसला. एखादा माणूस इतका शांत व सज्जन कस असू शकतो याचं त्यांना कोडं पडल होतं. हा सिलसिला अनेक वर्ष चालला. पुढे अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले. राष्ट्रपती भवनात तिथला वेगळा केशकर्तनकार असतो जो राष्ट्रपतींच केस कापतो.

पण डॉ. कलाम हबीब अहमद यांना विसरले नव्हते. त्यांनी हबीब व त्यांच्या कुटुंबाला राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी आमंत्रण दिल. हबीब अहमद म्हणतात,

“राष्ट्रपती भवनात गेल्यावरही हा माणूस तितकाच साधा व तितकाच सज्जन राहिला.”

खर तर हबीब अहमद यांच्या घराण्याची केसकर्तनाची परंपरा खूप मोठी आहे. त्यांचे वडील नजीर अहमद भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, व्हाईसरॉय माउंटबॅटन यांचे केस कापायचे. अहमद कुटुंबातली पिढी सुद्धा याच व्यवसायात उतरली.

त्यांच्या मुलाचं नाव जावेद हबीब.

खरं तर जावेद हबीब हा लहानपणापासून शाळेत हुशार होता.  त्याने भारतातल्या सुप्रसिद्ध अशा जेएनयु विद्यापिठाची प्रवेश परीक्षा चांगल्या मार्काने पास केली व तिथे फ्रेंच साहित्यामध्ये ग्रज्यूएशन करू लागला.

घरच्यांची इच्छा जावेदने नोकरी करावी अशी होती तर त्याला क्रिकेटर व्हायचं खूळ लागलं होत. युनिव्हर्सिटी टीमचा तो कप्तानसुद्धा बनला पण क्रिकेटमध्ये प्रचंड स्पर्धा आहे व आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लवकरच लक्षात आलं.

जावेद हबीब अखेर सगळ सोडून आपल्या घरच्या बिझनेस आला.

त्याला हेअरस्टाईलिंगचे उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनच्या प्रतिष्ठीत अशा मॉरीस स्कूल ऑफ हेअरडिझाईन मध्ये प्रवेश मिळवला.

घराण्याची पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला होतीच पण युरोपात राहून जावेद हबीबला हेअरड्रेसिंगची नवी दृष्टी प्राप्त झाली. तिथे या धंद्यात फक्त पैसा नव्हता तर प्रतिष्ठासुद्धा होती. हेअरड्रेसरचंसुद्धा बिझनेस मॉडेल असू शकत हे त्याने तिथ अनुभवल. भारतात आल्यावर त्याने आपली आयडिया घरच्यांना सांगितली पण त्यांना हे पटल नाही.

अखेर जावेदने स्वतःच वेगळ सलून उघडलं. त्याला नाव दिलं,

जावेद हबीब हेअर अँड ब्युटी.

ते वर्ष होतं २०००. जावेदच्या या सलूनची चर्चा काही दिवसातच सर्वत्र पसरली. मोठमोठे सेलिब्रिटी जावेदकडून हेअर स्टाईल करून घेऊ लागले. २४ तासात विक्रमी ४१० जणांचे केस कटिंग करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये देखील त्याच नाव शामिल झालं.

पण त्याला फक्त एक हेअरस्टाईलीस्ट बनून राहायचं नव्हत तर मोठा बिझनेसमन बनायचं होत.

गेल्या वीस वर्षात जावेद हबीबच हे स्वप्न पूर्ण झाल. आज अगदी गल्ली ते दिल्ली त्याच्या नावावर खोललेले सलून दिसतात. हेअर कटिंग सुद्धा एसीत बसून केली जाते हे त्याने भारताला शिकवलं. टीव्हीवरच्या जाहिरातीतही तो दिसतो, मिस इंडिया सारख्या स्पर्धांचा तो जज असतो.

आज जावेद हबीब स्वतः एक ब्रँड बनलाय. 

भारताबाहेर दुबई, सिंगापूर सारख्या ठिकाणी त्याचे सलून उघडले गेले आहेत. एवढच नाही तर त्याने सुरु केलेल्या जावेद हबीब अॅकडमीमध्ये दरवर्षी ५००० मुले हेअरस्टाईलिंग शिकतात.

unnamed

त्याची लोकप्रियता इतकी आहे कि काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने त्याला राजकारणात आणलं. नेहरू, राजेंद्र प्रसाद, अब्दुल कलामांचे केस कापणाऱ्याच्या या वारसदाराचं राजकीय करीयर काय झाल हे माहित नाही पण जगातल्या टाईम्स आणि फोर्ब्स सारख्या मासिकात मात्र त्याच नाव कायम झळकत असतंय.

असा हा जावेद हबीब आपल्या चाळ्यांमुळे पूर्वजांच नाव मातीत मिसळत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.