ज्यु. NTR ला पुढे करून भाजप तेलगू देसमचा देखील शिवसेनेसारखाच कार्यक्रम करणार

ज्युनिअर NTR हे नाव RRR च्या यशानंतर देशातल्या घराघरापर्यंत पोहचलं. जे साऊथच्या सिनेमांचे फॅन्स आहेत त्यांना वृंदावन ,आदी ते अगदी सिम्ह्याद्री पिक्चरपासून माहित होता. आता हा सुपरस्टार बातम्यांमध्ये येण्याचं कारण म्हणजे ज्युनिअर NTR याने घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट.

सध्या भाजपकडून तरी याला एक साधी ‘कर्टसी भेट’ असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या भेटीचा विषय बराच डीप असू शकतोय. अमित शहा यांचं ज्युनियर NTR यांना ‘ज्वेल ऑफ तेलगू सिनेमा’ म्हणण्यामागं देखील काही राजकीय कारणं आहेत.

त्याआधी तुम्हाला ज्युनियर NTR चं चा फॅमिली ट्री समजून घ्यावा लागेल. 

बॉलीवूडवर घराणेशाहीचा  आरोप करून  तेलगू पिक्चर पाहण्याचे सल्ले देणाऱ्यांसाठी हा धक्का असणार आहे. तर ज्युनियर NTR हा तेलगू सुपरस्टार आणि तीनवेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या NTR यांचा नातू आहे. खरं तर ज्युनियर NTR चं नाव तारक असं ठेवण्यात आलं होतं. 

त्याने एन टी रामाराव  म्हणजेच NTR दिग्दर्शित ब्रह्मश्री विश्वामित्र (१९९१) या त्याच्या आजोबांच्या चित्रपटातून त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. या चित्रपटानंतर लोक त्याला ज्युनियर एनटीआर म्हणून संबोधू लागले. 

बरं ज्युनियर NTRचे आजोबाच मोठे असामी होते अशातला भाग नाही.

 NTR म्हणजेच नंदामुरी तारका राम राव यांना ८ मुलं आणि ४ मुली. त्यापैकी या ४ मुलींपैकी भुवनेश्वरी यांचं लग्न चंद्राबाबू नायडू यांच्याशी झालं. तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू आपल्याला परिचित आहेत. 

तर  NTR यांची अजून एक मुलगी डग्गुबती पुरंदेश्वरी या माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जनरल सेक्रेटरी आहेत. तर NTR यांचा अजून एक मुलगा नंदामुरी  बाळकृष्ण आज तेलगू सुरस्टार म्हणून सुपरिचीत आहेत. 

काका, आत्या , अत्याचा नवरा अशी मोठं मोठी माणसं असताना ज्युनियर NTR चे वडील नंदामुरी हरिकृष्ण पण काही कमी नव्हते. 

ऍक्टर, प्रोड्युसर असण्याबरोबर ते राजकारणी देखील होते. विशेष म्हणजे NTR यांच्या नंतर त्यांच्या लेगसीवर दावा करणाऱ्यांमध्ये नंदामुरी हरिकृष्ण सगळ्यात पुढे होते.नंदामुरी हरिकृष्ण यांनी कधीकाळी तेलगू देसम पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी कसे प्रमुख दावेदार होते हे पाहण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागं जावं लागेल. 

कॉंग्रेसी नेत्यांचा होत असणारा अपमान, दक्षिणेतील लोकांना उत्तरेतल्या राजकारण्यांकडून होणारा त्रास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेलगु अस्मिता या मुद्यावर NTR यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना केली. NTR हे तेलगु फिल्म इंडस्ट्रीतले सुपरस्टार होते. पण जेव्हा त्यांनी पक्षाची स्थापना केली तेव्हा मात्र त्यांच फिल्मी करियर संपुष्टात आलं होतं अस सांगितलं जातं. तरिही एखादा जादूई करिष्मा व्हावा तशी आंध्रामध्ये NTR नावाचं वादळ निर्माण झालं. 

आपल्या पहिल्याच प्रयत्नात NTR आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

२९ मार्च १९८२ साली स्थापन झालेला पक्ष १९८३ साली आंध्रप्रदेशच्या फक्त मुख्य राजकिय प्रवाहातच नव्हता तर तो एकट्याच्या हिंमत्तीवर सत्तेत जावून बसला होता. त्यानंतरच्या काळात NTR तीन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झाले.

याच काळात म्हणजे १९८५ साली त्यांच्या पहिल्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आली ती अम्मा लक्ष्मी पार्वती. लक्ष्मी पार्वती हि लेखक होती. NTR यांच्यावर पुस्तक लिहण्याच्या निमित्ताने त्यांची आणि NTR यांची ओळख झाली.

ओळखीच प्रेमात रुपांतर होऊन NTR यांनी लक्ष्मी पार्वती यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा NTR यांच वय होतं ७० वर्ष आणि लक्ष्मी यांच वय होतं ३८ वर्ष. 

NTR यांच्या ८ मुले आणि ३ मुली यांचा या लग्नाच्या निर्णयाला विरोध होता. 

घरातील या सर्वांनाच ७० वर्षांच्या वयात NTR यांनी लग्न करण्याचा निर्णय रुचला नाही. अशात १९९४ सालच्या निवडणुका लागल्या NTR यांच्यासोबत लक्ष्मी यांनी या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला. लक्ष्मी यांच्या योगदानामुळेच तेलगु देसम २९४ पैकी २१४ जागा घेवून विजयी झाल्याचं सांगितलं जात.त्यानंतरच्या काळात NTR यांना अर्धांगवायूचा झटका आला. 

NTR जागेवर बसून राहू लागेल. पक्षाची संपुर्ण जबाबदारी लक्ष्मी पाहू लागल्या. 

लोक त्यांना अम्मा म्हणू लागल्या व याचा सर्वात मोठ्ठा त्रास NTR यांची ७ मुले व ३ मुली यांना होवू लागला. NTR यांची पारंपारिक जागा समजल्या जाणाऱ्या तेकाली विधानसभेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला. या जागेवरुन कोण उमेदवारी घेणार हा प्रश्न चर्चेत आला. NTR यांच्या जागेवरुन लक्ष्मीच जागा लढवतील अशी शक्यता असताना त्याविरोधात NTR यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्ण यांनी दावा ठोकला. कौटुबिंक वाद नको म्हणून हि जागा NTR यांनी तिसऱ्याच उमेदवाराला दिली.

या प्रकरणातनंतर मात्र कुटूंबाचा वाद चार भिंतीत राहिला नाही. त्यातच लक्ष्मी यांचं राजकीय वजनही दिवसेंदिवस वाढत होतं.NTR यांचा लक्ष्मी यांना असणारा पाठिंबा पाहून शेवटी त्यांच्या मुलांनी व मुलींनी त्यांच्या विरोधात बंड करण्याच ठरवलं. 

मात्र या बंडाचा चेहरा होते NTR यांचे जावई चंद्राबाबू नायडू. 

या घटनेनंतर पक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या हाती आला, ज्या पक्षाला NTR यांनी उभे केले त्याच पक्षातून त्यांना बाहेर काढण्यात आले. NTR यांनी खचून शेवटचा निर्णय घेतला तो म्हणजे त्यांनी सार्वजनिक पातळीवर आपल्या तीन मुलींचा आणि सात मुलांच्या कुटूंबाचा त्याग केला. त्यांच्याबरोबरचे संबध संपुष्टात आल्याच जाहिर केलं. अशाच काळात NTR यांच १८ जानेवारी १९९६ रोजी निधन झालं.

मात्र हा संघर्ष इथंच थांबणारा नव्हता एका बाजूला जोपर्यंत चंद्राबाबूची मुख्यमंत्री पदाची खुर्ची जात नाही तोपर्यंत अस्थी कलशाच विसर्जन करणार नाही अशी प्रतिज्ञा लक्ष्मी अम्मा यांनी केली होती. तर नंतर यांच्या मुलांना वडलांच्या पक्षाची धुरा घराच्या जावयाकडून म्हणजेच चंद्राबाबू नायूडूंकडून आपल्याकडे घ्यायची होती. यामध्ये सगळ्यात आघाडीवर पुन्हा हरिकृष्णच होते.

आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन हरिकृष्ण यांनी चंद्राबाबू नायडू यांना साथ दिली होती. नायडूंनी देखील हरिकृष्ण यांचा NTR यांना हटवाल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश करून घेतला होता. मात्र हरिकृष्ण यांच्या महत्वकांक्षा याहून मोठ्या होत्या. त्यांना त्यांच्या वडिलांनीच स्थापन केलेल्या तेलगू देसम पक्षाचा सर्वेसर्वा बनायचं होतं. मात्र चंद्राबाबू नायडूंनी आता तेलगू देसमवरची पक्कड मजबूत केली होती. पक्षात त्यांचाच शब्द प्रमाण मानला जात होता.

पक्षाची सत्ता नंदामुरी फॅमिलीकडून चंद्राबाबू नायडूंच्या नारा फॅमिलीकडे आली होती.

हरिकृष्णाचे आपल्या मेहुण्याशी मतभेद झाले आणि त्यांनी टीडीपी सोडली आणि अण्णा तेलुगु देसम पार्टीची स्वतःची राजकीय संघटना स्थापन केली. एनटीआरला सर्वजण प्रेमाने अण्णा म्हणत. त्यामुळं हरिकृष्ण पक्षाच्या नावात अण्णा ऍड करून ते स्वत:ला एनटीआरचे खरे राजकीय वारसदार म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. हे NTRच्या वारशासाठी नंदामुरी आणि नारा कुटुंबांमधील पहिला आणि सर्वात प्रमुख संघर्ष होता.

जेव्हा NTR हयात असतान ते राज्यातून चैतन्य रथम नावाने रथयात्रा काढायचे तेव्हा हरिकृष्णच त्यांच्या रथांचे सारथ्य करायचे. 

त्यामुळं लोकं आपल्याला वडील NTR यांचा राजकीय वारस स्वीकारतील अशी त्यांना अशा होती. मात्र हरिकृष्ण यांचा यांचा पक्ष सपशेल फेल गेला आणि त्यांनी पुन्हा चंद्राबाबूंचं नेतृत्व स्वीकारता ओरिजनल तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. 

मात्र तरीही हरिकृष्ण यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिल्या नव्हत्या. त्यांना काही करून वडिलांच्या पक्षावर वर्चस्व हवं होतं. त्यामुळे त्यांचे पक्षात चंद्राबाबूंशी खटकेही उडत होते. मात्र चंद्राबाबूंच्या पॉवेरपुढे ते खुजेच राहिले. 

आता हि लढाई नंदामुरी आणि नारा कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीपर्यंत आली होती.

NTR यांचे आम्हीच खरे राजकीय वारस आहोत हा दावा मजबूत करण्यासाठी आणि NTR यांची लीगसी आपल्या मुलापर्यंत पोहचवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी मास्टरस्ट्रोक खेळला. त्यांनी आपला मुलगा नारा लोकेश यांचं लग्न NTR यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेते नंदामुरी बाळकृष्ण यांच्या मुलीशी केलं. 

त्यामुळं कुटुंबात एकाचवेळी NTR यांची मुलगी आणि नात आणत चंद्राबाबू नायडू यांनी आपली NTR यांचा खरा राजकीय वारस असल्याचं पुन्हा एकदा फिक्स केलं होतं. त्याचबरोबर  चंद्राबाबू नायडू यांनी आपला मुलगा नारा लोकेश याला राजकीय वारसदार घोषित करून तेलगू देसम पक्ष नारा फॅमिलीच्या हहतच राहील याची तजवीज करून ठेवली होती. 

त्यातच NTR यांची इतर मुले राजकारणांपासून दूर होती. याला अपवाद फक्त मुलगा हरिकृष्ण आणि मुलगी पुरेंदेश्वरी हे दोघंच होते. पुरेंदेश्वरी यांनी नायडूंशी जुळवून घेणं अवघड झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रात मंत्रिपद मिळवलं होतं तर नंतर आंध्रच्या फाळणीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.

मात्र या काळात हरिकृष्ण आपला हुकमाचा एक्का तयार करत होते ते म्हणजे ज्युनियर NTR

ज्युनियर NTR पिक्चरमध्ये सुपरहिट होत होता. त्याचे लाखो चाहते तयार होत होते. आता हरिकृष्ण यांनी आपल्या मुलाला इलेक्शनच्या रिंगणात देखील उतरवले.

२००९ विधानसभा निवडणुकीमध्ये ज्युनियर NTR याने आंध्रप्रदेशात तेलगू प्रदेशाचा तुफान प्रचार केला. ज्युनियर NTR चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश या दोघांना पुरुन उरेल असं प्रचाराच्यावेळी बोललं जात होतं. मात्र व्हाय एस राजशेखर रेड्डी यांच्यापुढं तेलगू देसमला सत्तेत येणं शक्य झालं नाही आणि पर्यायाने ज्युनियर NTR त्याची राजकारणातल्या एंट्री तेवढी ग्रँड झाली नाही.

त्यानंतर ज्युनियर NTR देखील राजकारणापासून अंतर ठेवतच गेला. तर २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी आपला मुलगा नारा लोकेश याला मंत्रिमंडळात घेत चंद्राबाबूंनंतर नारा लोकेश याच्याकडे तेलगू देसमची धुरा जाईल हे जवळपास फिक्स केलं.

 त्यात ऑगस्ट २०१८ मध्ये हरिकृष्ण यांचं निधन झालं.

त्यामुळं तेलगू देसम आणि नारा फॅमिली हे इक्वेशन फिक्स झालं. मात्र २०१९ नंतर चंद्राबाबूंचे ग्रह बदलू लागले. सुरवात झाली २०१९च्या विधानसभेतील मानहानीजनक पराभवापासून. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तेलगू देसमला फक्त 23 जागा मिळाल्या होत्या. तर मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेसने विधानसभेच्या 175 पैकी 151 जागा जिंकल्या.

तेलगू देसांचा उडालेला हा धुराळा आम्हाला १०० दिवसांनंतरही पाचू शकला नाही असं स्वतः नारा लोकेश यांनी मान्य केलं होतं. त्यातच २०१८ मध्ये चंद्राबाबूंनी भाजपाबरोबरची केंद्रातली युती देखील तोडली होती.

सत्तेत आल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी रायडू यांना जंग जंग पछाडलं आहे. अनेक मोठे नेते तेलगू देसम सोडून गेले आहेत. पक्षाच्या पार्टी ऑफिसेस, प्रॉपर्टी वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून  टार्गेट केली जात होती. चंद्राबाबू नायडू यांच्यावर झालेल्या खालच्या भाषेतील टीकेनंतर चंद्राबाबूंना अक्षरशः रडताना सगळ्या देशाने बघितलं.

यानंतर चंद्राबाबू दिल्ली भाजपकडे पुन्हा युती व्हावी यासाठी प्रयत्न देखील करत होते. मात्र भाजपकडून त्यांना दाद दिली जात नव्हती. भाजपाला आता पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखाली पवनकल्याण यांच्या नेतृत्वाखाली जनसेना मित्रपक्षाही भेटला आहे. 

मात्र हे चित्र आता जुनियर NTR आणि अमित शहा यांच्या  भेटीनंतर बदलू शकतंय. 

पाहिला कारण डोळ्यासमोर येतं ते म्हणजे 

भाजपाला आंध्र प्रदेशात हात पाय पसरवायला तेलगू देसमची गरज लागणार आहे. 

भाजप आणि पवन कल्याण यांचा जनसेना हे दोघंच जगन मोहन रेड्डी यांची सत्ता उलथवू शकत नाही असं राजकीय जाणकार सांगतात. त्यासाठी त्यांना तेलगू देसमची गरज लागेलच. मात्र २०१८ ला भाजपाची साथ सोडताना चंद्राबाबू नायडू यांनी केली टीका शाह-मोदी सहजासहजी विसरतील असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना तेलगू देसम पाहिजे असेल पण त्यांनी बसवलेल्या नेतृत्वाखाली.

दुसरं म्हणजे चंद्राबाबू यांचं झालेलं वय 

चंद्राबाबू नायडू आज ७१ वर्षाचे आहेत आणि बऱ्यापैकी खचलेले दिसतात. मात्र त्याचवेळी नारा लोकेश याचं नेतृत्व तितकंसं विकसित झालेलं नाहीये. अशावेळी नेतृत्वाच्या पोकळीमध्ये आता आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या ज्युनियर NTR आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रँड एंट्री घेऊ शकतो. तसेच तेलगू देसमवर नंदामुरी फॅमिलीचं नेतृत्व देण्यासाठी ज्युनियर NTR ही संधी सोडणार नाही असं जाणकार सांगतात. 

तिसरा कारण म्हणजे तेलगू देसमचे विचारधारा 

काँग्रेस विरोध आणि तेलगू अस्मिता हे दोन मुद्दे तेलगू देसमची विचारधारेचे प्रमुख मुद्दे आहेत. त्यामुळं तेलगू देसम हा भाजपसाठी एक नैसर्गिक मित्र पक्ष ठरतो. स्वतः चंद्रबाबू नायडू असं सांगत फिरत आहेत.

ज्युनियर NTRचं स्टारडम 

ज्युनियर NTR आज आपल्या करियरच्या शिखरावर आहे. पॅन इंडिया लेव्हलला तेलगू सिनेमा गेल्यानंतर ज्युनियर NTR हे नाव देखील नाव देशभर पोहचलं आहे. त्यामुळं ज्युनियर NTR सारख्या अभिनेत्याचं राजकारणात येणारं भाजपाला देश पातळीवर फायद्याचं ठरू शकतंय. 

यात अजून एक महत्वाचा अँगल आहे तो म्हणजे  ज्युनियर NTRच्या फायदा केवळ आंध्रातपुरता मर्यादित नं राहत तेलगू भाषिक प्रदेश तेलंगणात देखील होऊ शकतोय.  

जगन मोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांची सत्ता उलथवण्याबरोबरच २०२४च्या निवडणुकीत साऊथमधून सीट्स वाढवण्यात देखील भाजप  ज्युनियर NTRचं स्टारडम वापरू शकते.

या सर्व कारणांमुळे शिवसेनसारखाच भाजप तेलगू  देसममध्ये नेतृत्वबदल घडवून आणून आपल्याबरोबर घेऊ शकतेय आणि त्यासाठी ज्युनियर NTR हा हुकमाचा एक्का होऊ शकतोय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.