२० व्या शतकात भारताची महिला बाईक रायडर साडी नेसून रस्त्यावर रॉयल एनफील्ड चालवायची.

जेव्हा एखादी तरुणी साडी नेसून बाईक चालवतांना दिसली तर आपण सहज ‘काय स्वॅग आहे’ असं म्हणतो…’नथीचा नखरा असो किंव्हा कोणती मिरवणूक असो तरुणी साड्या नेसून बाईक, बुलेट चालविणे इत्यादी गोष्टी आत्ता ट्रेंड बनल्या आहेत मात्र पण असं पूर्वी नव्हतं…

तो काळच तसा होता..१९३० चे दिवस म्हणजे, रस्त्यावर साधी मोटारसायकल दिसणे म्हणजे मोठं नवल होतं. तर ती मोटारसायकल चालवणारी एक स्त्री पाहणे हे समाजाला कसं पचेल?

केरळमध्ये एक नारायणी नावाची तरुणी जेंव्हा सहावर साडी नेसून मोटारसायकल चालवत असायची तेंव्हा लोकं उघड उघड म्हणायचे.. “एक बाई मोटरसायकल चालवते म्हणजे आपल्या समाजाचे आता काय होणार ? कलियुग आले आहे “.

तिचं नाव होतं, कलाथीपरंबिल रमण नारायणी !

नाव तसं कुणाच्या ओळखीचं नसेल पण या नारायणी बाईंचा इतिहासात मात्र नक्कीच उल्लेख आहे तेही पहिली महिला बाईक रायडर म्हणून.

त्यांचा जन्म १९०२ मध्ये केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील पट्टणकड येथे के.ए. रमण आणि ए.पी. पार्वती या दाम्पत्याच्या पोटी झाला. ती त्यांच्या सात मुलांपैकी सर्वात मोठी होती. तिने तिरूर (अलाप्पुझा) येथील शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि गायनाचे शिक्षण घेतले. शास्त्रीय संगीत मैफिलींमध्ये भाग घेऊ लागली.

नारायणी यांनी १९२२ मध्ये पर्शिया म्हणजेच सध्याच्या इराणमधील ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीमध्ये काम करणाऱ्या आर. केशवन यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर केशवन यांची इच्छा होती कि नारायणी यांनी त्यांच्यासोबत पर्शियाला यावं पण नारायणीने अलाप्पुझामध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

के.आर. नारायणी के.आर.गौरी यांच्या मोठ्या बहीण होत्या.

के.आर गौरी म्हणजे ग्रेट क्रांतिकारी आयकॉन, त्याच ज्या केरळच्या पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडलेल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये केरळच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या.

मोटरसायकल चालवणे हि त्याकाळची मोठी गोष्ट पण आणखी एक म्हणजे नारायणी तिच्या पतीच्या आडनावाला चिकटून राहणे पसंत करत नसत, तिला साहसी स्वायत्ततेचे जीवन जगायला आवडायचे.

नारायणी यांनी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यावर केशवन यांनी नारायणीला रॉयल एनफील्ड-मॉडेल ५०५ भेट दिली. साइडला कारसारखी जोडलेली बाईक यूकेहून पाठवण्यात आली होती. आणि सोबतच नारायणी आणि त्यांच्या मुलाला शहराच्या आसपास फिरण्यासाठी ड्रायव्हर नेमला. पण लवकरच नारायणीने ड्रायव्हरकडून मोटरसायकल चालवायची शिकून घेतले.

पण साडी नेसून बाईक आरामात कशी चालवायची हा नारायणीचा पहिला टास्क होता.

यावर उपाय म्हणून तिने काष्ट्यासारखी साडी नेसायला सुरुवात केली. अशाप्रकारे तीअलाप्पुझापासून ११ मैलाच्या अंतरावर असलेल्या जंक्शनवर ती मोटर सायकल चालवत जायची. पण यामुळे तिला समाजाच्या तिला तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. 

आपला समाज अजून इतका परिपक्व झाला नाही, आपला समाज एक स्त्री बाईक चालवते हे स्वीकारू  शकत नाही.   

नारायणीने आयुष्यात आणखी एक क्रांतिकारी पाऊल टाकलं.

त्या काळात स्व-इच्छेने नारायणीने केशवनला घटस्फोट दिला आणि दुसरा विवाह केला. पेशाने वकील तसेच ‘श्री नारायण धर्म परिपालन संघा’चे नेते एन.आर कृष्णन यांच्याशी विवाह केला. १९३० च्या दशकातील एका महिलेने तिच्या पतीला तिच्या इच्छेनुसार घटस्फोट देणे आणि पुन्हा लग्न करणे हे एक मोठे पाऊल होते आणि त्याचे काय पडसाद उमटले होते त्याची कल्पना आपण करू शकतो.

नारायणीने तिच्या दुसऱ्या जोडीदाराचे आडनाव लावण्यास देखील नकार दिला आणि स्वतःच्या आडनावावर लावले. 

तिचा संपूर्ण फोकस तिच्या स्वायत्त आयुष्यावर होता. ती तिचा मुलगा आणि तिची बहीण-गौरी बाजूच्या गाडीत बसत असे. गौरीला तिच्या मोठ्या बहिणीचे आयुष्य खूप आवडत असे, त्या त्यांच्या चरित्रात लिहितात कि, “मला आठवते , ती बाईक चालवायची आणि आम्ही बाजूला बसायचो. रस्त्यावरचे लोकं  माझ्या बहिणीची बाईक चालवल्याबद्दल थट्टा करायचे. ज्यामुळे तिला खूपच राग यायचा”.

सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. यामुळे कोचीन, मलबार, दक्षिण कॅनरा आणि त्रावणकोर मध्ये विभागलेला केरळ युद्धामुळे दुष्काळात गेला, अन्नाची कमतरता भासू लागली. साथीचे रोग पसरले.

रोगांनी ग्रस्त असलेल्यांसाठी अलाप्पुझामध्ये श्री नारायण मिशन हॉस्पिटलची स्थापना करण्यात नारायणीने महत्वाची भूमिका बजावली आहे. 

नारायणीने गरीब महिला मजुरांच्या मदतीसाठी धावून गेली, तिच्या घराभोवती उपलब्ध असलेल्या नारळाच्या भुसा गोळा करून त्यापासून रोजगार उपलब्ध करून दिला. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते विकत घेण्यासाठी ठेवले असता कॉयरच्या मागणीत वाढ झाली आणि तिने ती कॉयर १४,००० रुपयांना विकली, म्हणजे सध्याच्या पैशाच्या मूल्यात अंदाजे एक कोटीच्या मूल्याचा नफा मिळवून दिला होता.

तिने कॉयर विकून मिळालेल्या पैशांचा वापर करत हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम स्थापन केले.

अलाप्पुझामधील गर्भवती महिलांसाठी सेवांच्या अभावामुळे व्यथित, तिने रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती वॉर्ड उघडण्यासाठी उर्वरित पैशांचा वापर केला.

अनाथ आश्रम आणि गरिबांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काही महिलांना एकत्र करून नारायणीने ‘द यंग वुमेन हिंदू असोसिएशन’ ची स्थापना केली. तिने अलाप्पुझा येथे जनतेसाठी उपलब्ध वैद्यकीय उपचारांमध्ये मदत करण्यासाठी परिचारिकांसाठी एक अकादमी देखील उघडली.

 १९४६ मध्ये तिला क्षयरोगाचे निदान झाले या आजारपणातच तिचा मृत्यू झाला.

एन. आर. कृष्णन यांनी त्यांच्या पत्नी नारायणीच्या स्मरणार्थ हॉस्पिटलमध्ये एक्स-रे वॉर्डची स्थापना केली. अलाप्पुझाच्या हॉस्पिटलमध्ये प्रथमच सुविधा आणल्याबद्दल नारायणीला श्रद्धांजली म्हणून श्री नारायण मिशन हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याला एक्स-रे जंक्शन असे नाव देण्यात आले.

WhatsApp Image 2021 08 12 at 4.55.29 PM

महिलांनी स्कुटी आणि पुरुषांनी मोटरसायकल चालवायची अशाच मानसिकतेत आपला समाज  जगतोय. महिला दुचाकीस्वारांना माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही कारण बाईकच्या बहुतेक जाहिरातींमध्ये मर्दानी दिसणारे पुरुष दाखवले जातात. स्कूटरच्या जाहिरातींमध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश असतो.

वास्तविक जीवनात मात्र कॉलेजमध्ये जाणाऱ्या, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बाईक चालवणाऱ्या अनेक महिला आहेत. ज्या महिलांना मोटार सायकल चालवायची इच्छा असते त्यांच्यासाठी के.आर  नारायणी ह्या एक उत्कृत्ष्ट प्रेरणादायी उदाहरण आहे.

नारायणीची मोटारसायकल चालवणे फक्त एक हट्ट नव्हता, ना पुरुषांसोबत केली जाणारी बरोबरी. तर तिची हि कृती तिच्या सामर्थ्याचे आणि धाडसी स्वायत्ततेचे प्रतीक म्हणून समाजाच्या संकुचित, मानसिकतेला दिलेले सडेतोड उत्तर होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.