‘अल बगदादी’ला ठार करून अमेरिकेने या मुलीच्या मृत्यूचा बदला घेतलाय?

आतापर्यंत ही बातमी कन्फर्म झाली की आयसीसचा म्होरक्या, लादेनच्या मृत्यूनंतर जगभरातल्या खतरनाक अतिरेक्यांचा खलिफा बनलेला अबू बक्र अल बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाला. गेली अनेक वर्षे अशी अफवा उठत होती पण यावेळी डोनाल्ड ट्रम्पने स्वतः ही बातमी जाहीर केली. शिवाय अमेरिन सुरक्षायंत्रणेने सिरीयामध्ये केलेल्या कारवाईचा व्हिडीओ टाकून सगळे पुरावे दिले.

ही कामगिरी फत्ते केली खडतर प्रशिक्षण घेतलेल्या डेल्टा वन या कमांडो टीमने.

ते गेली अनेक दिवस अल बगदादीच्या खातम्यासाठी सिरीयामध्ये जाळे टाकून बसले होते. परवाच्या मध्यरात्री अतिशय सूक्ष्म प्लॅॅॅनिंग करून केलेल्या हल्ल्यावेळी त्यांनी बगदादीला पळून जाण्याच्या सगळ्या वाटा बंद केल्या होत्या. मरण समोर दिसत असताना त्याने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबातले अनेकजण, त्याचे कित्येक सहकारी या हल्ल्यामध्ये ठार झाले.

काही वर्षापूर्वी इस्लामिक स्टेटच्या नावाखाली जगाला दोन तुकड्यात विभागण्याच्या बगदादीच्या मनसुब्यावर पाणी फेरले.

या घटनेमुळे आयसीस सारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेचं कंबरड मोडल. डेल्टा वन कमांडोचं जगभरातून कौतुक करण्यात येतंय. अतिशय धाडसी अशा या मोहिमेचे नाव एका मुलीच्या नावावरून देण्यात आले होते.

ऑपरेशन कायला म्युलर

कोण होती ही कायला म्युलर? तिचा आणि बगदादीचा काय संबंध? तिचं नाव का या मोहिमेला देण्यात आलं?

कायला म्युलर ही मुळची अमेरिकेची. अगदी लहानवयात तिला मानवाधिकाराबद्दल काम करण्याची आवड निर्माण झाली होती. घरच्यांचाही तिला सपोर्टच होता. बॉम्ब नको अन्न हवे हा मंत्र घेऊन तिने काम सुरु केले. कोलेजमध्ये असताना रिफ्युजींच्या प्रश्नाची ओळख झाली. मग काय अवघ्या विशीतली ही मुलगी देश सोडून भारतात आली. तिबेटहून विस्थापित झालेल्या बौद्ध निर्वासितांसाठी स्वतःला वाहून घेतले.

याच दरम्यान सिरीयामध्ये अंतर्गत यादवीला तोंड फुटले. कायला तिथे काम करण्यासाठी मध्यपूर्व आशियाला आली. तुर्कस्थानमधून एका एनजीओसाठी तिने सिरीयन रीफ्युजीनां वैद्यकीय मदत पोहचवण्यास सुरवात केली.

यातूनच एकदिवस सिरीयामधल्या आलेप्पो नावाच्या शहरात डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये मदत घेऊन पोहचली. संपूर्ण देश आयसीस च्या दहशतवादाखाली जळत होता अशावेळी एका अमेरिकन नागरिक असलेल्या मुलीचे तिथे येणे सुरक्षित नव्हते. तिला हॉस्पिटलमधल्या कर्मचार्यांनी समजावून सांगून  परत पाठवले. मात्र परतत असताना अतिरेक्यांनी तिला गाठलेच.

कायला म्युलरचे आयसीसने अपहरण केले आहे ही बातमी अमेरिकेत पोहचली.

तिच्या आईवडीलानी हंबरडा फोडला. तत्कलीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत मदतीची याचना केली. तिच्यासाठी अनेकांनी आंदोलने केली. कायलाला सोडवण्यासाठी अमेरिकन नेव्ही सील, डेल्टा वनची नेमणूक करण्यात आली. पण ऐन युद्धाच्या धामधुमीत अनेकदा प्रयत्न करूनही कायलाला सोडवून आणण्यास अमेरिकन सैन्याला अपयश आलं.

कायलाला सोडवण्याच्या बदल्यात आफिया सिद्दिकी नावाच्या दहशतवादी मुलीची सुटका करण्याची अट आयसीसने घातली. ज्याला ओबामा तयार झाले नाहीत. याच काळात एकापाठोपाठ एक पत्रकारांचे खून सत्र आयसीसने सुरु केले. सिरीयन यादवी चिघळली होती आणि तिला आवरायचे कसे हा प्रश्न समोर होता.

दरम्यानच्या काळात कायलावर प्रचंड अत्याचार करण्यात आला. तिला भुके ठेवून मारहाण तर रोजचीच होती पण ती अमेरिकन असल्यामुळे आयसीसच तिच्यावर विशेष लक्ष होते. तिच्या सोबत तुरुंगात असणाऱ्या दोन याझ्दी महिलांच्या साक्षीप्रमाणे त्याही परिस्थितीत कायलाने आयसीससमोर झुकण्यास नकार दिला. तिची नखे उचकटून तिला मरण यातना देण्यात आल्या.

काही महिन्यांनी तिचे थेट अल बगदादीबरोबर निकाह लावून देण्यात आला.

त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला, बेदम मारहाण केली. पण कायला जीवनाशी लढा देतच राहिली. जवळपास अठरा महिने ती आयसीसच्या तुरुंगवासात होती. एक दिवस अचानक कायलाच्या आईवडीलाना एक मेल आला ज्यात तिच्या मृतदेहाचे तीन फोटोग्राफ होते. कायलाचा आयसीसने खून केला होता.

अमेरिकन जनतेमध्ये कायलाच्या मृत्यूबद्दल खूप मोठा आक्रोश होता. तिचा बदला घ्यावा अशी मागणी करण्यात येत होती. बगदादीच्या पापाचा घडा भरला आहे असे पोस्टर सगळीकडे झळकत होते.

पण हे प्रत्यक्षात घडण्यासाठी तीन वर्षे उलटली. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी ऑपरेशन कायला म्युलरवेळी अमेरिकन कमांडोंच्या डॉग स्क्वाडला घाबरून भुयारात पळून जाणाऱ्या अल बगदादीने आत्महत्या केली. कायलाच्या आईवडीलानी एका मुलाखतीमध्ये सांगितलं,

” उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला.”

अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेनंतरच्या आपल्या भाषणात कायलाचा उल्लेख केला. तिच्या मृत्यूच्या बदलाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर होतो की काय यावरून अमेरिकेतील काही विचारवंतांनी काळजी व्यक्त केली.

कायला म्युलरचे हौतात्म्य हे कोणाचा बदला म्हणून ओळखले जाऊ नये तर तिने केलेल्या शांतीच्या कामासाठी युद्ध थांबावे म्हणून प्राण पणाला लावला यासाठी ओळखले जावे अशीच इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.

आणि बगदादीचा खात्मा हा फक्त एका मुलीच्या मृत्यूचा बदला नाही तर गेली अनेक वर्षे हजारो जणांच्या मृत्यूचा त्याच्या कट्टरवादाचा खात्मा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.