पाकिस्तानामध्ये इम्रान खानला जेरीस आणण्यामध्ये हे विरोधी पक्षनेते पुढे आहेत

“लोकशाही मुस्लिमांच्या रक्तात आहे, ते मानवजातीची संपूर्ण समानता पाहतात आणि बंधुता, समानता आणि स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात”

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे हे वाक्य.

त्यांना पाकिस्तानात लोकशाहीकडून खूप अपेक्षा होत्या. पण त्यांच्या येणाऱ्या पिढीने जीनांची जशी सगळी स्वप्न पायदळी तुडवली त्यातलंच हे लोकशाहीचं पण होतं. एकतर पाकिस्तान सारखाच मिलिटरी हुकूमशहांच्या अंमलाखाली राहिला. आणि जेव्हा जेव्हा लोकशाही आली तेव्हा तेव्हा नेत्यांचा टाइम सत्तेची संगीत खुर्ची खेळण्यातच गेला.

आतापर्यंतचा इतिहास आहे पाकिस्तानात एका पण पंतप्रधानाला फुल्ल टर्म ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीये.

३ वर्षे ८ महिने सत्तेत राहिल्यानंतर  ‘नया पाकिस्तानचं’ स्वप्न घेऊन आलेल्या इम्रान खान यांना आता जुन्याच पंतप्रधानानासारखंच सत्तेबाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे.  विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्ल्यानुसार पाकिस्तानच्या राष्ट्रअध्यक्षांनी संसद बरखास्त केली आहे, ज्यांनी नव्या निवडणुकांची मागणी केली होती. आता या गोंधळाची पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दखल घेतली असून कोर्ट राष्ट्रअध्यक्षांनी संसद बरखास्त करण्याच्या निर्णयाची कायदेशीरता चेक करणार आहेत.

पण इम्रान खानच्या मागे अशी ही हाथ धुवण लागलेली माणसं कोण आहेत हे तुम्ही बघतलंय का? 

 इम्रान खानाच्या बायकोला पार जादुटोणा करण्यापर्यंत मजबूर करणारे विरोधी पक्षातले मुख्य माणसं ही आहेत.

शहबाज शरीफ 

तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे शहबाज शरीफ हे भाऊ आहेत. नवाझ शरीफ यांना  पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे आणि सध्या ते युनायटेड किंगडममध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत. त्यामुळं नवाझ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगची धुरा त्यांचे बंधू शहबाज शरीफ यांच्याकडे आली. जर इम्रान खान याच्याविरोधचा अविश्वास ठराव पास झाला असता तर शहबाज शरीफ हेच पुढचे पंतप्रधान होणार होते. सध्या संसदेत विरोधी पक्षनेते असलेले शहबाज शरीफ पाकिस्तनच्या राजकारणात दबदबा राखणाऱ्या पंजाबचे ११ वर्षे मुख्यामंत्री राहिले आहेत. 

एकापेक्षा जास्त विवाह आणि लंडन आणि दुबई मधील लक्झरी अपार्टमेंट्सह गडगंज संप्पती अशा बातम्या छापण्यात आल्यानंतरही ते पाकिस्तानात लोकप्रिय आहेत.

आसिफ अली झरदारी

एका श्रीमंत सिंधी कुटुंबातून आलेले, झरदारी हे त्यांच्या प्लेबॉय जीवनशैलीसाठी अधिक ओळखले जात होते. इम्रान खान राजकरणात येयच्या आधी ते पाकिस्तानच्या राजकारणातळे ओरिजनल प्लेबॉय म्हटलं तरी चालेल. पुढे त्यांनी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी लग्न केले होते. BBC ने केलेली झरदारी आणि बेनझीर भुत्तो यांच्यावर प्रिन्सेस आणि प्लेबॉय ही डॉक्युमेंट्री देखील केली होती.

यांनी राजकारणात धडाक्यात एंट्री घेतली होती.

पण सरकारी कंत्राटांमधून हफ्ता घेण्यामुळे त्यांना  “मिस्टर टेन पर्सेंट” हे टोपणनाव मिळाले ते कायमचेच. 

भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची तस्करी आणि खुनाशी संबंधित आरोपांमुळे त्यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला होता.

२००७ मध्ये बेनझीर भुत्तो  यांच्या हत्येनंतर ६७ वर्षीय आसिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे सह-अध्यक्ष बनले आणि एक वर्षानंतर पीएमएल-एन सोबत सत्तेच्या वाटणीच्या करारात ते राष्ट्र्रअध्यक्ष पण झाले.

बिलावल झरदारी भुट्टो

बिलावल झरदारी भुट्टो हा बेनझीर भुट्टो आणि आसिफ झरदारी यांचा मुलगा आहे. आईच्या हत्येनंतर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तो पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष झाला होता.

ऑक्सफर्ड-शिक्षित ३३ वर्षीय बिलाला याला त्याच्या आईसारखंच विचारानं पुरोगामी असल्याचं मानलं जातं. त्याने महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर अनेकदा आवाज उठवला आहे.

अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे वय २२ किंवा त्यापेक्षा कमी आहे असलेल्या पाकिस्तानात भुट्टोची  तरुणांमध्ये जोरदार लोकप्रियता आहे. मात्र त्याच्या इंग्लिश ऍक्सेंट मधल्या तोडक्यामोडक्या उर्दूचे मीम पण तेवढेच फेमस आहेत .

मौलाना फजलुर रहमान

कट्टरपंथीय मौलानाची इमेज घेऊन राजकरणात एंट्री मारलेल्या या मुस्लिम धार्मिक नेत्याने गेल्या काही वर्षांत आपली पब्लिक इमेज जरा सॉफ्ट केली आहे.  ज्यामुळे त्याला स्पेक्ट्रमच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती करता आली आहे.

हजारो शाळकरी  विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याची क्षमता ठेवणाऱ्या या मौलाच्या  जमियातुल उलेमा-ए-इस्लाम (एफ) या पक्षाला कधीही स्वबळावर सत्तेसाठी पुरेसा पाठिंबा मिळवत आलेला नाहीये. परंतु  प्रत्येक सरकारमध्ये हा माणूस किंगमेकरच्या भूमिकेत असतो.

इम्रान खानशी तर या मौलानाची बांधाला बांध असल्यासारखी भांडणं आहेत. ब्रिटनच्या जेमिमा गोल्डस्मिथ सोबतच्या इम्रान खानच्या पूर्वीच्या लग्नाचा दाखल देत या मौलवीने इमरान खानवर “ज्यू” म्हणून टीका केली होती. तर  इंधन परवान्यांसह इतर भ्रष्टाचारात नाव आल्यानंतर इम्रान खानने या मौलवीला  “मुल्ला डिझेल” असं म्हटलं होतं.

आता अविश्वास ठराव होईपर्यंत हे सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि शहबाझ शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. मात्र आता परिस्तिथी वेगळी झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी सरकारवर अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यास डेप्युटी स्पीकरने नकार दिल्यानंतर काही तासांतच राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली विसर्जित केली. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये ९० दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतील. आणि तिथे हा प्रत्येक नेता पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसण्याच्याच आवेशात निवडणूक लढेल.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.