कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन होईपर्यंत ते छ.शहाजीराजेंच्या सावलीसारखे सोबत होते

भोसले घराण्याच्या दोन शाखा. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई राणी या कोल्हापूर गादीची स्थापना केली. औरंगजेबाशी लढा देण्याचा पराक्रम करणाऱ्या ताराराणी यांनी नानासाहेब पेशव्यासारख्या स्वकियांशी दोन हात करून कोल्हापूरची गादी राखली.

करवीरच्या या छत्रपती घराण्याला कर्तृत्वान राजकर्त्यांची परंपरा होती. याच घराण्यात राजर्षी शाहू महाराजांसारखे महापुरुष होऊन गेले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे चिमासाहेब महाराज, शाहू महाराजांचे कार्य पुढे नेणारे राजाराम महाराज असे दूरदृष्टीचे सत्ताधीश या संस्थानात होऊन गेले.

अनेक पुरोगामी निर्णय घेऊन कोल्हापूरला काळाच्या पुढे नेण्यात जसा छत्रपतींचा मोठा वाटा होता. तसाच वाटा छत्रपतींना लाभलेल्या काही विश्वासु अधिकाऱ्यांचा होता. संस्थानात अनेक अधिकारी कामाला होते, पण कर्तबगार आणि छत्रपतींच्या जवळचे मानले जाणारे असे मोजकेच अधिकारी होते.

त्यापैकीच एक होते, कॅ. मोहनसिंग बयास.

ते अगदी कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन होईपर्यंत छ. शहाजीराजेंसोबत सावलीसारखे सोबत होते. छत्रपतींना देखील कॅ. बयास एवढे जवळचे होते की, सामिलनाम्यानंतर बयास यांना मिठी मारुन त्यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली होती.

कॅप्टन मोहनसिंह बयास यांनी आपल्या लष्करी सेवेची सुरुवात राजाराम रायफल्समधून केली होती. त्यांच्या कर्तबगारीच्या चर्चा जश्या छत्रपतींपर्यंत पोहचल्या तसे त्यांना तत्कालिन कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे शाही सैन्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

पुढे कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन होण्याच्या काळात तत्कालिन छत्रपती शहाजी राजे यांचे एडीसी म्हणून काम केले.

ब्रिटिश अमलाच्या या काळात कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या पदावर नेमले जायचे. त्या वेळी अफगाण सीमेवर असलेल्या बंडखोर पख्तुन आदिवासीं विरूद्ध लढण्यासाठी ‘लँडी कोताल’ या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील शांतीसेनेच्या माध्यमातुन कॅप्टन बयास यांनी अनेक महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान विलिन होतानाच्या काळातील मोहनसिंह बयास प्रमुख साक्षीदार. त्यासंबंधातील वाटाघाटींतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशात शेवटच्या टप्प्यात जी काही संस्थाने विलीन झाली, त्यापैकी कोल्हापूर हे एक होते.

विलीनीकरणाच्या प्रक्रियेवेळी कॅ. मोहनसिंग बायस हे छत्रपती शहाजीराजे यांच्यासमवेत सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही. पी. मेनन यांना भेटण्यासाठी गेले होते.

त्यावेळी छत्रपतींनी बडोदा संस्थान विलीन होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला होता. पण सरदार पटेल यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांनी छत्रपती शहाजीराजे यांना दाखवून दिले की ६ महिन्यांपूर्वीच बडोदा संस्थांनने विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली आहे.

तेव्हा सरदार पटेल यांनी छत्रपतींना विलीनीकरणाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी तयार केले.

जेव्हा छत्रपती शहाजी महाराज पटेलांबरोबर खासगी बैठक संपवून सभागृहाच्या बाहेर आले, तेव्हा त्यांनी व्यथीत अंतकरणाने आणि साश्रुनयांनी कॅप्टन बयास यांना मिठी मारली आणि म्हणाले,

“मोहन, आपले कोल्हापूर गेले.’’

१९४९ मध्ये कोल्हापूर संस्थान विलीन होऊन त्या वेळच्या मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेचे मोहनसिंह बायस हे एकमेव साक्षीदार होते.

कोल्हापूर संस्थान विलिन झाल्यानंतर मोहनसिंग बायस यांची सेवा राज्य पोलिस दलात वर्ग झाली. त्यांनी डहाणू, धुळे, अलिबाग आणि सोलापुरात सेवा बजावली. त्यांनी बरीच वर्षे नागपूरचे एसीपी म्हणून काम पाहिले. त्यांची ही कारकिर्द विशेष गाजली.

एकदा जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत हायकोर्टाचे न्या. घाटणे यांनी म्हटले आहे की, काही प्राणांचे बलिदान देऊन मोहनसिंग यांनी सुमारे एक लाखाहून अधिक लोकांचा जमाव केवळ एका पलटणीच्या मदतीने पांगवला. त्यांनी जमाव पांगविला नसता तर नागपूर शहर पेटले असते व किंबहूना या पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असता हा निष्कर्ष काढला. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार
मिळाला.

पुढे ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रभारी झाले. त्यावेळची एक घटना आवर्जून सांगितली जाते.

एकदा एक सभा संपल्यानंतर लोक पंतप्रधानांच्या अगदीच जवळ आले. तेव्हा कॅप्टन बयास यांनी अंतर ठेवण्यासाठी लाठीचा वापर केला. तेव्हा नेहरूजींनी पळत येत त्यांच्या हातातील लाठी घेत लोकांना तुम्ही अशी वागणूक देवू नका म्हणून दरडावले.

पण पोलिसांच्या प्रोटोकॉलनुसार मी केवळ माझ्या पंतप्रधानांना सुरक्षित ठेवतो आहे. असे उत्तर देताच नेहरूजींनी फक्त हसून प्रतिसाद दिला.

कॅ. बयास हे निसर्गाचे देखील चांगले अभ्यासक होते. शिकार हा त्या वेळचा सहज प्रकार होता. एकदा विख्यात शिकारी आणि निसर्ग अभ्यासक जिम कॉर्बेट यांच्याबरोबर ते जंगलात फिरता फिरता एका ठिकाणी बसले. कॉर्बेट त्यांना म्हणाले,

‘‘मोहन, तू अजगराच्या वेटोळ्यावर बसला आहेस.’’

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बिबटे, वाघ आणि हत्ती यांच्याबरोबरच्या त्यांच्या आठवणी त्यांनी ‘दांडेलीची वाघीण’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.

अशा या विश्वासू लष्करी अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीने आणि मदतीने, छत्रपती आपले रयतेचे राज्य चालवू शकले. पुढे बायस यांनी वाचवले नागपूर शहर ही एक इतिहासातील महत्वाची घटना म्हणून नोंदवली गेली आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.