मुस्काइए आप “लक्ष्मणपुरी” में हैं ; लखनौचं लक्ष्मणपुरी होण्याच्या मार्गावर, हे आहे कारण.. 

योगींनी अलाहाबादचं प्रयागराज केलं, फैजाबादचं अयोध्या केलं, मुघलसरायचं पंडित दिनदयाल उपाध्याय नगर केलं.इतकचं नाही तर स्वत:च नाव अजयसिंग बिश्त बदलून योगी आदित्यनाथ असही केलं.. 

आत्ता याच यादीत नवीन नावाची भर पडणार असल्याची चर्चा आहे. ती चर्चा आहे लखनौची.. 

लखनौं म्हणल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं, कबाब.. नवाब.. पण योगीच्या राजवटीत आत्ता लखनौंला वेगळी ओळख मिळणार आहे आणि ती ओळख असणार आहे लक्ष्मणाची.. 

लखनौच्या नामांतराची चर्चा का सुरू झालेय.. 

यासाठी योगींच्या राजवटीतला मुलभूत फरक समजून घ्यायला हवा. योगी आदित्यनाथ यांनी भूतकाळात अनेक शहरांची नावे बदलेली आहेत. याऊलट महाराष्ट्रात औरंगाबादच संभाजीनगर करण्याची चर्चा १९८८ पासून चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तरी औरंगाबाद शहराच्या नामांतराची चर्चा सुरू झाली की ती फक्त चर्चेच्या पातळीपुरती राहते.

मात्र योगीच्या युपीमध्ये खटक्यावर बोट जाग्यावर पलटी निकाल नामांतराच्या बाबतीत घेतल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे होतं काय तर योगींनी केलेलं छोटस् ट्विट सुद्धा भविष्यातल्या कल्पनांची नांदी ठरतं. 

असच एक ट्विट योगींनी १६ मे रोजी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वागत करताना योगीजी म्हणाले, 

शेषावतार भगवान लक्ष्मणजी की पावन नगरी उखनऊमें आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन.. 

लखनौच्या समोर भगवान लक्ष्मणाचे विशेषण जोडल्याने या चर्चा सुरू झाल्या. 

आत्ता या गोष्टीला लक्ष्मण आणि लखनौची पार्श्वभूमी आवश्यक आहे ती पुष्टी कशी जोडली जाते ते पाहणं गरजेचं आहे.. 

तर लखनौ सोबत लक्ष्मणाचे नाव जोडण्याचं निमित्त ठरलय ते अनकहा लखनऊ हे पुस्तक. चार वर्षांपूर्वी भाजप नेते लालजी टंडन यांनी हे पुस्तक लिहलं. या पुस्तकात लखनौ शहराचं आणि लक्ष्मणाचं नात विस्ताराने सांगण्यात आल आहे. प्रत्येक ठिकाणी औरंगजेब येतो तसाच तो इथेही आलेला आहे.

या पुस्तकात सांगितलय की लखनौमध्ये लक्ष्मण का टीला अर्थात लक्ष्मणाची टेकडी नावाची जागा होती. तशी ती टेकडी आजही आहे. मात्र औरंगजेबाच्या काळात इथे एक मशिद बांधण्यात आली त्यानंतर या जागेला टीलेवाली मशिद म्हणून ओळखलं जावू लागलं. काळाच्या ओघात लक्ष्मण का टिला हे नाव मागं पडलं. त्यांच्या मते ब्रिटीशांच्या काळात देखील या जागेला लक्ष्मण का टिला म्हणूनच ओळखलं जायचं पण स्वातंत्र भारतात टिलेवाली मशिद या नावाने हे नाव रुढ झालं.. 

लखनौ शहराच्या नावाबाबत पुस्तकात काही संदर्भ देण्यात आले आहेत.

ज्यामध्ये लखनौचं पुर्वीच नाव लखमावती होते. जे पुढे लक्ष्मणपुर झाले. त्यानंतर लखनावती नावाने हे शहर ओळखले जावू लागले व पुढील काळात हे शहर लखनौ म्हणून ओळखले जावू लागले. या शहरासोबत लक्ष्मणाचा ऐतिहासिक संदर्भ जोडलेला आहे. रामाने लक्ष्मणाला हे शहर दिलेले आहेत अस दावा देखील या पुस्तकात आहे. 

आत्ता झालं अस की हे पुस्तकचं निमित्त ठरलं.

लालजी टंडन यांनी या पुस्तकातून लक्ष्मणासोबतच लखनौ नातं विसरलं आहे हे दाखवून दिल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या. यातच लखनौचे महापौर संयुक्ता भाटिया यांनी गोमती नदीच्या किनारी लक्ष्मणाचा १५१ फुटांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं. सोबतच टिलेवाली मशिदीजवळ लक्ष्मणाचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवकांकडून देण्यात आला. या गोष्टीला आधार मानत राज्यस्थानच्या राज्यपालांनी सांगितलं की, 

सगळ्यांची मान्यता असेल तर लखनौचे नामांतर लक्ष्मणपुरी करण्यात काहीच हरकत नाही. 

दूसरीकडे फक्त लालजी टंडन यांनीच लक्ष्मणपुर असा दावा केलाय का तर नाही. इतिहासकार अब्दुल हलिम शरार यांच्या पुराना लखनौ या पुस्तकात देखील काही संदर्भ आहेत.

या पुस्तकात लोककथांनुसार भगवान राम वनवासातून आल्यानंतर त्यांनी ही जागा लक्ष्मणाला दिली. टेकडीच्या आजूबाजूला गाव वसवण्यात आले व त्याला लक्ष्मणपुर म्हणण्यात आले असे संदर्भ दिले आहे… 

थोडक्यात काय येत्या काही दिवसात मुस्काइए आप लक्ष्मणपुरी में हैं अस म्हणलं तर ऑड वाटू नये. बाकी लखनौं कबाब चं नामांतर मात्र होवू नये कारण लखनौवी कबाब च्या ऐवजी लक्ष्मणपुरी कबाब म्हणल्यास भावना दुखावल्या जावू शकतात इतकच. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.