देशाच्या विजयाहून प. बंगालमधील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे.

पश्चिम बंगालचा निकाल लागला. एकूण ४२ जागांपैकी तृणमुल कॉंग्रेस २२ जागांवर विजयी झालं तर भाजप १८ जागांवर विजयी झाला. पं. बंगलामध्ये भाजपला २०१४ साली २ जागा होत्या. २०१९ या पाच वर्षात २ च्या १८ झाल्या. २०१४ साली मोदी लाट होती. तरिही भाजपला प. बंगालमध्ये म्हणावा असा विजय खेचून आणता आला नव्हता. २०१९ च्या निवडणुकांच वेळापत्रक लागण्यापुर्वी मोदी-शहा जोडीने यंदाची निवडणुक प. बंगालसाठी खास असणारे आहे दाखवून दिलच होतं. 

निवडणुक आयोगाद्वारे प. बंगालमध्ये सात टप्यात निवडणुका घेण्यात आल्या. ४२ जागांसाठी १ ते ७ टप्यात निवडणुका झाल्या. प.बंगालमध्ये जावून जय श्री राम म्हणणार ते अमित शहाच्या रॅलीत झालेला हिंसाचार इथपर्यन्त या निवडणुका गाजल्या. पण भाजपच हे यश काही आजचं नाही. प. बंगालच्या विजयासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत ठरले त्यापैकीच काही घटक. 

डाव्या पक्षामुळे मोदी आणि ममतांचा उदय. 

विधान धाडसी वाटेल पण डाव्या पक्षांच्या निर्णयातून मोदी आणि ममतांचा देशपातळीवर उदय झाला. त्याला कारणीभूत होते ते म्हणजे टाटांचा नॅनो प्लॅन्ट. मे २००६ ला हुगली जिल्ह्यातील सिंगूरच्या प्लॅन्टचा विषय देशपातळीवर चर्चेत आला. ९९७ एकरची जमीन डाव्या सरकारमार्फत टाटांच्या नॅनोसाठी देण्यात आली या विरोधात ममता बॅनर्जीनी आंदोलन उभा केलं. हिंसाचार झाला.

पुढे ममता बॅनर्जी या घटनेतूनच प. बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या मुख्यमंत्री होताच टाटांना जमिनीचा हट्ट सोडावा लागला. करेक्ट फायदा घेत मोदींना टाटांसाठी रेड कार्पेट टाकून देशपातळीवर विकासपुरूष प्रतिमा उभा केली. 

संघाची प. बंगालमध्ये प्रवेश. 

९० च्या ईशान्य भारतात संघाचा प्रवेश झाला होता. अथक परिश्रमातून संघाने सेव्हन सिस्टर राज्यात आदिवासीमध्ये आरोग्य आणि शिक्षणाच्या योजना राबवल्या. देशभरातून प्रचारसेवकांनी या भागात जावून काम केले. तरिही प. बंगालमध्ये डाव्यांच्या प्रभावामुळे संघाला प्रवेश करता येण अशक्य होतं. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली डावे क्षीण होत गेले आणि त्याचा अचूक फायदा संघामार्फत घेण्यात आला. बलरामपुर, मिदनापुर, पुरूलिया यासारख्या भागात संघाच्या शाखा अगदी अलीकडच्या काळात उभा राहल्या व संघ योग्य पद्धतीने भाजपच्या कामी येवू लागला. 

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपचा प्रवेश. 

२००७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्यांचा पराभव ममता बॅनर्जींनी केला होता. त्याचाच फायदा म्हणून त्या प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवडून येवू शकल्या. हेच यश भाजपला २०१७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालं. राज्यातील एकूण ३१,८०२ पंचायतीपैकी तृणमुल पक्षाकडे २०,८४८ तर भाजपच्या खात्यात ५,६३६ पंचायती होत्या.

आकडे छोटे वाटल असले तरी जिथे आठ ते दहा पंचायतींमध्ये भाजपचा प्रवेश होवू शकत नव्हता अशा वेळी भाजपने ५ हजाराहून अधिक ठिकाणी आपल्या पक्षाची सत्ता आणली. बलरामपूर जिल्हात भाजपने ९० टक्याहून अधिक पंचायतीमध्ये भाजपची सत्ता आणली. ममता बॅनर्जी ज्या मंत्र्यांच्या जीवावर अवलंबून असत अशा मतदारसंघातल्या पंचायती भाजपने काबीज केल्या. 

बांग्लादेशचा मुद्दा. 

२००५ साली लोकसभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा जटिल असून त्यावर चर्चा व्हावी. बेकायदेशीर रित्या बांग्लादेशी नागरिक प. बंगालमध्ये घुसत असून त्यामुळे त्यांच्या मतदार प्रभावित होत आहे. यावर लोकसभेचे उपसभापती चरणजीतसिंह अटवाल यांनी चर्चेस नकार दिला होता त्यावर ममता बॅनर्जी वेलमध्ये जावून रडल्या होत्या.

आपला राजीनामा देखील त्यांनी दिला होता पण तो प्रॉपर फॉर्मेटमध्ये नसल्याने नकारण्यात आला होता. मात्र यावेळी नॅशनल रिजिस्ट्री ऑफ सिटिझनशीप आणि असम नागरिकतेच्या मुद्यावर त्या भाजपच्या सर्वात मोठ्या विरोधक झाल्या. भाजपने योग्य संधी साधून हा मुद्दा केला. प्रचाराच्या दरम्यान ममता बॅनर्जींनी बांग्लादेशी अभिनेत्याला देखील प्रचारात उतरवलं. त्यावर टिका करण्यात आली. अशाच गोष्टींमुळे ममता बॅनर्जींचे डाव उलटे पडले. 

दुर्गा पूजा आणि मोहरम्. 

प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ म्हणाले होते, इथे तर मोहरममुळे दुर्गापूजेची वेळ बदलण्यात येत. युपीमध्ये मी स्पष्ट सांगितलं, मोहरमचा टाईम बदला दुर्गापूजा त्या वेळी होणार. २०१७ साली दूर्गा पूजा आणि मोहरमची वेळ एकच होती. यावर हाय कोर्टाच्या निर्देशांना केराची टोपली दाखवत ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पूजेची वेळ बदलली होती.

त्या बरोबरीने प्रचाराच्या वेळी अमित शहा यांनी मी प. बंगालमध्ये जाणार आणि जय श्री राम म्हणणार अशी घोषणा केली. मुस्लीम तुष्टीकरणाचं राजकारण ममता करतात हे मतदारांच्या मनामध्ये कोरण्यात भाजप पुर्णपणे यशस्वी होत गेली. 

२०१६ चे धुलागड दंगल.  

२०१६ साली हावडा आणि कलकत्याजवळ असणाऱ्या धुलागड येथे दंगल निर्माण झाली. हिंदू मुस्लीम दंगा निर्माण झाला. यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मोठ्या प्रमाणात हिंदूवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. अशा काळात ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा छोटी घटना म्हणून उल्लेख केला.

ममता बॅनर्जी या भूमिकेमुळे ममता “बानो” झाल्या. हिंदूबहूल भागात त्यांच्या उल्लेख ममता बानो करण्यात आला व मुस्लीम तुष्टीकरण करणाऱ्या ममता “बानो” हे नाव ठसवण्यात भाजप यशस्वी झाला. 

हिंसाचार आणि गुंडागर्दी. 

२०१७ च्या पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारास तृणमुल कॉंग्रेसच जबाबदार असून डाव्याहून त्या काही वेगळ्या नाहीत हे मत लोकांमध्ये घेवून जाण्यात भाजप यशस्वी झाला. अगदी शेवटच्या टप्यात अमित शहा यांच्या रॅलीत हिंसाचार झाला तेव्हा माझा जीव गेला असता असे सांगून अमित शहा आणि भाजपने ममतांचा हाच हिंसाचार अधोरेखित केला. त्यामुळे हिंसाचार आणि गुंडगिरीला विरोध हे मत भाजप ठोसपणे लोकांपर्यन्त घेवून जावू शकले. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.