सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते…

इथल्या मातीवर प्रेम करणारे आणि मातीसाठी खर्ची पडणारे अनेक महापुरुष या महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्रात साहित्यिक आणि शाहीर या लोकांनी मराठी लोकांची एकी टिकवून ठेवण्याचं मोलाचं काम केलं. गाण्यांमधून मराठी भाषेचं अस्तित्व, जाण याविषयी बरच प्रबोधन केलं गेलं. अगदी रांगड्या बाजातलं लोकगीत असो किंवा शास्त्रीय राग आळविणारं भावगीत असो मराठी लोकांनी त्याच प्रेमानं गाण्यांना उचलून धरलं. गाण्यांमधून मराठी भाषेची अभिव्यक्ती मांडली गेली. महाराष्ट्राचं अभिमान गीत म्हणजे,

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी.

हे गाणं जितकं गाजलं त्यामागे बऱ्याच लोकांची मेहनत आहे. या गाण्याने मराठी माणसाला आपल्या भाषेविषयीची अभिमान जागृत करून दिला. या गाण्याचा इतिहास आपल्याला अभिमान वाटायला लावेल असाच आहे. या गाण्याला बरीच वर्ष जरी पूर्ण झाली असली तरी हे गाणं मराठी लोकांमध्ये तसंच ताजं आहे.

या गाण्याची निर्मिती करणारे संगीतकार कौशल इनामदार. कौशल इनामदार याना एका खाजगी रेडिओ केंद्रावर काहीं कामासाठी बोलवण्यात आलं. तेव्हा त्यांनी सहज रेडिओ जॉकीला विचारलं कि तुम्ही मराठी गाणी का नाही वाजवत तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं कि,

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मराठी गाणी वाजवायला मनाई केली आहे, मराठी गाणी वाजवली तर चॅनल डाऊनमार्केट म्हणून घोषित केलं जाईल.

हि गोष्ट कौशल इनामदारांना खटकली. आधीच महाराष्ट्रात मराठी भाषा कमी होत चालली आहे आणि मराठी गाण्यांना अशी मिळणारी वागणूक पाहून त्यांनी यावर उपाय काढण्याचा विचार सुरु केला.

यावर इनामदारांनी ठरवलं कि आपण असं गाणं बनवू जे प्रत्येक मराठी लोक प्रेमाने गुणगुणतील आणि जेणेकरून भाषेबद्दलची अस्मिताही टिकून राहील. मराठी अभिमान गीत यावर त्यांनी २००९ साली काम सुरु केलं. पुढे हा प्रोजेक्ट ‘ मराठी अस्मिता ‘ म्हणून तयार झाला. यासाठी त्यांनी सुरेश भटांची कविता निवडली.

सुरेश भट म्हणजे मराठी गजलेतील दिग्गज. मराठी भाषेवर असलेलं त्यांचं प्रभुत्व अगदी सर्वश्रुत होतं. त्यांची हि कविता मराठी अभिमान गीत म्हणून महाराष्ट्राच्या पुढे आली. अचूक भाषेत मराठी भाषेचं केलेलं वर्णन म्हणजे त्यांची हि कविता.

कौशल इनामदारांनी हि कविता स्वतःच संगीतबद्ध करायला सुरवात केली, गाण्याची चाल तयार झाली होती. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा खर्च परवडण्याजोगा नव्हता. यावर उपाय म्हणून त्यांनी लोकांमध्ये जाऊन या गाण्याबद्दलची कल्पना समजावून सांगायला सुरवात केली. सुरवातीला एक महिनाभर त्यांना यश आलं नाही मात्र त्यानंतर तब्बल २००० लोकांनी त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा निधी देऊ केला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनीही या गाण्याच्या निधीत हातभार लावला होता.

ज्या ज्या लोकांनी देणगी दिली होती त्या त्या लोकांची नावे या गाण्याच्या सीडीच्या बुकलेट मध्ये असणार होती त्यामुळे बऱ्याच लोकांनी मदत केली.

या कवितेचं गाणं झाल्यावर जनमानसात वेगाने कस पसरेल याकडे त्यांचं लक्ष लागून होतं. यासाठी त्यांनी आजवरच्या संगीत इतिहासात न घडलेला विक्रम घडवून आणला तो म्हणजे एका गाण्यासाठी ४५० गायक निवडण्यात आले. यात शास्त्रीय संगीतातल्या महान लोकांपासून ते लोकसंगीतातल्या दिग्गज लोकांचा समावेश होता. बॉलिवूड मधीलही गायकांचा यात समावेश होता. प्रत्येक गायकाने आपल्या आवाजाने हे गाणं अत्यंत सुंदरतेने फुलवलं.

या गाण्यात विशेष बाब म्हणजे गायकांमध्ये १० वर्षाची मुग्धा वैंशपायन आणि ८० वर्षाचे लोकशाहीर विठ्ठल उमप होते.

गायकांमध्ये रवींद्र साठे, आरती अंकलीकर, हरिहरन, साधना सरगम, अजय अतुल, नंदेश उमप, शंकर महादेवन, देवकी पंडित , उत्तरा केळकर, वैशाली सामंत, रोहित राऊत, आर्या आंबेकर असे अनेकी गायक होते.

या गाण्याच्या रेकॉर्डिंगला एकूण पंधरा महिन्यांचा प्रदीर्घ काळ लागला. मुंबई , ठाणे आणि ए आर रेहमानच्या चेन्नईमधल्या स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. यात वादक म्हणून महान संगीतकार इलायराजा यांच्या वाद्यवृंदातील वादक मंडळी होती.

२७ फेब्रुवारी २०१० साली मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या अनेक दिग्गज लोकांच्या उपस्थितीत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. पुढे याच गाण्याच्या धर्तीवर ए आर रेहमानने तमिळ भाषेचं अभिमान गीत बनवलं. जे करुणानिधी यांनी लिहिलं होत.

हे गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्याने मराठी रसिकांना लगेचच आपलंस करून घेतलं. मराठी भाषिकांच्या जिभेवर हे गाणं होतं. गाण्याची लोकप्रियता बघून शेमारू या चॅनलने डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळीकडे हे गाणं प्रसिद्ध केलं. खाजगी रेडिओवरूनही मराठी गाणी वाजायला लागली.

११ मार्च २०१० साली टाटा इंडिकॉम नेटवर्कने ग्राहकांसाठी मराठी अभिमान गीत हि कॉलर ट्यून उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या लाईव्ह म्युझिक स्टेशनवरसुद्धा हे गाणं वाजवायला त्यांनी सुरवात केली.

कौशल इनामदार यांनी मराठी रसिकांच्या घराघरात हे गाणं पोहचवलं आणि मराठी भाषेची गोडी सगळ्यांना जाणवून दिली. खुद्द अमिताभ बच्चनने त्यांचं कौतुक केलं होतं.

आजवर अनेक उत्तम गाणी महाराष्ट्रावर , मराठी भाषेवर बनली पण भटांच्या लेखणीतून अवतरलेलं हे काव्य महाराष्ट्राचं अभिमान गीत झालं.

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरांत राहते मराठी

हे ही वाच भिडू :

 

1 Comment
  1. हरीश भा. कोहळे says

    बोल भिडु चे अभिनंदन व शुभेच्छा
    फक्त विनंती आहे तुम्हीच पाठपुरावा करू शकता
    सध्या आपलेच जवळे मंत्री आहे मराठी व उद्योग मंत्री देसाई साहेब
    (महाराष्ट्र राज्य)
    (दुरभाष्य केंद्रीय मंत्री यांना निवेदन आहे)
    प्रकाश जावडेकर ( बातम्या पाहणे बंद) आहे विनंती आहे

    डीश टु फ्री
    व्हिडिओकॉन डीश पण आहे (चार्ज ३५५वर)

    मा.भिडु टिम
    मुद्दा असा आहे की तुम्ही फ्रि कनेक्शन असो किंवा पैसे वाले

    मराठी गाणी आम्हाला २ चॅनेल वर पाहिजे १९७० ते २००५ तेपण ह्या लेखाला धरून व अ.अतुलदादाचे भक्तिमय

Leave A Reply

Your email address will not be published.