त्रिमूर्ती सिनेमातला आगाशेंचा कोका सिंग हा आजवरचा सगळ्यात खुंखार व्हिलन होता…
मराठी सिनेमातला मास्टरपीस सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे सामना. या सिनेमात नटसम्राट श्रीराम लागू आणि अभिनयाचा बाप माणूस निळूभाऊ फुले या दोघांची रंगलेली जुगलबंदी प्रचंड गाजली होती. सामना बर्लिन फेस्टिव्हललासुद्धा जाऊन आला होता. सत्तरच्या दशकातला हा सगळ्यात जास्त गाजलेला सिनेमा म्हणून ओळखला गेला. पण या सिनेमातला एक डायलॉग भयंकर गाजला होता
मारुती कांबळेचं काय झालं ?
मोहन आगाशे यांच्या मारुती कांबळेने प्रेक्षकांना अस्वस्थ करून टाकलं होतं. मोहन आगाशे यांनी हि भूमिका अक्षरशः जिवंत केली होती. निळूभाऊ आणि श्रीराम लागू यांच्या व्यतिरिक्तही मोहन आगाशेंनी साकारलेला मारुती कांबळे कायमचा लक्षात राहून जातो. ४० वर्षाहून जास्त काळ सामनाला उलटला पण मोहन आगाशे यांच्या पात्राची जादू आजही तशीच आहे.
मोहन आगाशे हे अभिनय क्षेत्रात येण्याआधी डॉक्टर होते. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजात ते मानसोपचारतज्ञ् म्हणून काम पाहत असायचे. याच कॉलेजात शिक्षण घेऊन त्यांनी तिथेच नोकरी केली. रुग्णांसोबत त्यांचा सतत संवाद घडू लागल्यामुळे त्यांना मानवी मनाच्या अनेक छटा उलगडू लागल्या. याच काळात अजून दोन डॉक्टरांशी त्यांची भेट झाली आणि त्यांचं रुपेरी पडद्यावर पाऊल पडलं. ते दोन डॉक्टर होते जब्बार पटेल आणि सतीश आळेकर.
मोहन आगाशेंच्या अभिनयाची ताकद समोर आली ती घाशीराम कोतवाल या नाटकामुळे. या नाटकात आगाशेंनी साकारलेली नाना फडणवीसांची भूमिका महाराष्ट्रभर गाजली. हे एक वादळी नाटक ठरलं गेलं होतं. नाटक क्षेत्रात मोहन आगाशे यांनी प्रचंड काम केलं. काटकोन त्रिकोण हे एक आगळं वेगळं नाटक मोहन आगाशेंनी केलं होतं. अगदी सत्यजित राय यांनासुद्धा मोहन आगाशेंच्या अभिनयाने वेडं केलं होतं. नाटकातून पुढे ते सिनेमाकडे वळले आणि इथून त्यांनी खऱ्या अर्थाने आपली अभिनयशक्ती दाखवून दिली.
जैत रे जैत हा सिनेमा मराठीतला एक मोठा माईलस्टोन म्हणता येईल यात स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळूभाऊ अशी तगडी कलाकारांची फौज होती. आगाशेंनी साकारलेला नाग्या लोकांच्या मनात घर करून गेला. सिंहासन सिनेमातला बुधाजीरावसुद्धा भाव खाऊन गेला. मोहन आगाशेंचा कुठलाही रोल बघा आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.
त्रिमूर्तीमधील मोहन आगाशेंनी साकारलेला डेंजरस व्हिलन कोका सिंग तुफ्फान गाजला होता. बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली. सत्यजित रे, श्याम बेनेगल, गौतम घोष, मीरा नायर, जब्बार पटेल यांसारख्या दिग्दर्शकांबरोबरच सुभाष घई, राकेश ओमप्रकाश मेहरा अशा नाय जुन्या जाणत्या लोकांसोबतसुद्धा आगाशेंची केमिस्ट्री चांगली गाजली.
कथा दोन गणपतरावांची, भूमिका, आक्रोश, सदगती, एक होता विदूषक, गंगाजल, अपहरण, रंग दे बसंती, देऊळ, अस्तु, विहीर, निशाणी डावा अंगठा, कासव, देऊळ बंद अशा विविध सिनेमांमध्ये आगाशेंनी जबरदस्त काम केलं. मोहन आगाशेंनी मराठी, हिंदी बरोबरच बंगाली आणि मल्याळी सिनेमांमध्येसुद्धा काम केलं.
इतक्या प्रदीर्घ काळापासून रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या आगाशेंना १९९० साली पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. १९९६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन डॉ.मोहन आगाशेंना गौरविण्यात आले होते.
मोहन आगाशे सांगतात श्रीमंती मोजण्याची अनेक साधने आहेत. पैसे हे फक्त त्यातील एक आहे, जर आपले जीवनच जर समृद्ध नसेल तर आपण गरीबच आहोत.
एक उत्तम डॉक्टर आणि एक उत्तम नट अशी दोन्ही क्षेत्रे डॉ.मोहन आगाशेंनी गाजवली. अनेक रोल त्यानीं अजरामर केले. पण लोकांच्या मनात अगदी कमी वेळ असलेली मारुती कांबळेची भूमिका आणि जैत रे जैत मधील नाग्या हि दोन पात्र कायमचीच लक्षात राहिली.
हे हि वाच भिडू :
- फिल्मस्टार नर्गिसच्या प्रयत्नांमुळे निळू फुले श्रीराम लागूंचा सामना थेट बर्लिनमध्ये झळकला होता..
- घाणेकर, लागूंनी नाकारलेला सखाराम बाईंडर निळूभाऊंनी अजरामर केला….
- म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ नंतर देना बँकेने सिनेमांसाठी कर्ज देणं बंद केलं
- पाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता