निळूभाऊंनी केलेला प्रॅन्क दादांना चांगलाच महागात पडला होता……

मराठी सिनेसृष्टीत ग्रामीण बाज खऱ्या अर्थाने रुजवला तो अभिनय सम्राट निळूभाऊ फुले आणि विनोदाचा बादशहा दादा कोंडके यांनी. या दोन कलाकारांनी मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस आणले. अस्सल गावरान बाज आणि तितकाच सशक्त अभिनय निळूभाऊ आणि दादा कोंडकेंचा होता पण सुरवातीच्या काळात निळूभाऊंनी दादा कोंडकेंवर एक खतरनाक प्लॅन केला होता त्याबद्दलचा आजचा किस्सा.

दादा कोंडके आणि निळूभाऊ हे सुरवातीला एकत्र काम करायचे. सेवा दलाच्या कामात दादा कोंडके, निळू फुले आणि राम नगरकर हि मंडळी होती. सेवादलात अनेक मुलं हि श्रीमंत घरातली होती पण दादा कोंडके, निळूभाऊ आणि राम नगरकर हे आर्थिकरित्या गरीब होते. या गरिबीमुळे दादा कोंडके यांचं निळूभाऊ आणि राम नगरकरांशी चांगलंच जुळलं. 

जनता कला पथकाच्या तालमी तेव्हा जोरात चालायच्या आणि प्रयोगाचे दौरेसुद्धा भरमसाठ व्हायचे. या दौऱ्यांमधून दादांची मैत्री आणखी फुलत गेली. दादा कोंडके निळूभाऊंना प्रेमाने निळ्या म्हणायचे. बाहेरगावी या कला पथकांचे प्रयोग असले कि हि तिकडी सोबत असायची. बाहेरगावच्या कार्यक्रमांमुळे कार्यक्रमातील सगळी मुलं हि एकाच खोलीत झोपायची.

दादा कोंडके हे कला पथकात नवीन होते आणि निळूभाऊ हे स्वभावाने मिश्किल स्वभावाचे होते. निळूभाऊ सतत दादा कोंडक्यांच्या खोड्या काढायचे. असाच एकदा निळूभाऊंनी एक प्रॅन्क केला जो दादा कोंडकेंना आयुष्यभर लक्षात राहिला. निळूभाऊ हे खोडकर स्वभावाचे होते आणि ते दादांना त्रास द्यायची संधी सोडत नसायचे. 

एकदा असाच एक बाहेरगावचा दौरा कला पथकाचा होता. सेवा दलाचे प्रमुख होते भाऊसाहेब रानडे. निळूभाऊंनी रात्री मस्तपैकी बिडी फुकली आणि सगळा धूर हा दादा कोंडकेंच्या चादरीत सोडला, सगळी चादर धुराने भरून गेली होती. हळूहळू हा धूर चादरीच्या बाहेर जाऊ लागला आणि त्याचा वास खोलीभर दरवळू लागला.

हा वास बाहेर गेल्याने सेवा दलाचे प्रमुख असलेल्या भाऊसाहेब रानडे हे झडती घेण्यासाठी खोलीत आले, पाळीपाळीने त्यांनी सगळ्या मुलांच्या चादरींची झडती घेतली. निळूभाऊंनी बिडी विझवून बाहेर फेकून दिलेली होती आणि ते चादर तोंडावर घेऊन झोपले होते पण दादा कोंडकेंना याबद्दल काही एक कल्पना नव्हती ते आपले झोपले होते.

भाऊसाहेब रानडेंनी दादा कोंडकेंच्या चादरीतून धूर बाहेर येत असल्याचं पाहिलं आणि दादांच्या अंगावरून चादर काढून घेत त्यांच्यावर ओरडले. निळूभाऊ हे हसून मजा पाहत होते. भाऊसाहेब रानडेंनी या प्रकारची शिक्षा म्हणून दादा कोंडकेंना कला पथकातल्या १५ मुलांचे कपडे धुण्याची शिक्षा दिली. हि भयंकर फजिती दादा कोंडकेंच्या चांगलीच लक्षात राहिली. 

राम नगरकर आणि निळूभाऊ हि जोडी पुढे भरपूर गाजली. दादा कोंडकेंनीहि पुढे सिनेमात नाव कमावलं पण हा किस्सा दादा कोंडकेंनी त्यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रात लिहिला आहे आणि एक सुखद आठवण असल्याचं ते सांगतात.

निळु फुले आणि दादा कोंडके या जोडीला जास्त सिनेमे करायची संधी एकत्र मिळाली नाही पण या दोघांनी रंगभूमीवर आणि सिनेमा क्षेत्रात जी धमाल उडवली होती ती केवळ अतुलनीय होती. दादांचं विच्छा माझी पुरी करा आणि निळू भाऊंचा सखाराम बाईंडर हे त्याकाळी गाजलेले नाटकं लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.  

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.