खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर नवज्योतसिंग सिद्धू देखील ५ दिवस गायब झाले होते….

पै. सुशील कुमार… भारताला दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू. जगात देशाचं नाव त्यानं अभिमानानं उंचावलं. पण सध्या एका गोष्टीमुळे आपले करियर अक्षरशः बरबाद करून बसला आहे. दिल्लीतील छत्रसाल मैदानावर झालेल्या मारहाणीत सागर राणा या पैलवानाचा मृत्यू होतो आणि सुशील कुमार जवळपास २० दिवस गायब होता. त्यानंतरचा इतिहास आपल्या समोरच आहे.

सध्या सुशील कुमारला खुनाच्या गुन्हात भारतीय दंड संहिता कलम ३०२ या कलमांतर्गत अटक केली आहे, तो दोषी कि निर्दोष हे न्यायलयच ठरवेल. पण ३३ वर्षापूर्वी एका खेळाडू बाबत असाच प्रसंग उभा राहिला होता.

या खेळाडूच नाव म्हणजे भारताचा सिक्सरकिंग नवज्योत सिंग सिद्धू.

केवळ क्रिकेटर म्हणूनच नाही तर समालोचक, यशस्वी राजकारणी म्हणून सिद्धूने आपली ओळख निर्माण केली आहे. पण १९८८ मध्ये एका मृत्यू प्रकरणात सिद्धू यांचे नाव आले होते. खुनाचा गुन्हा दाखल होऊन पंजाब पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती.

थोड फार क्रिकेट खेळणाऱ्या सरदार भगवान सिंग यांना वाटायचे की आपला मुलगा मोठा क्रिकेटर व्हावा. त्यासाठी त्यांनी सिद्धूला चांगले प्रशिक्षण दिले. सिद्धूची मेहनत कामी आली. १९८१ मध्ये पंजाबच्या रणजी टीम मध्ये सिद्धूला जागा मिळाली.

२ वर्ष रणजी खेळल्यानंतर १९८३ मध्ये त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत त्यांना खेळण्याची संधी देखील मिळाली. मात्र त्यांना संधीचे सोने करता आले नाही. वेस्ट इंडीज विरोधात दोन टेस्ट मॅच मध्ये केवळ ३९ रन काढता आले.

सिद्धू वर माध्यमामधून मोठ्या प्रामाणात टीका झाली. त्यानंतर ते भारतीय टीम मधून बाहेर झाले. सिद्धूचं करियर संपले अशा चर्चा सुद्धा होत होत्या. स्ट्रोकलेस क्रिकेटर म्हणून सिद्धूवर लेख सुद्धा लिहिण्यात आला होता.

या लेखानंतर सिद्धू पेटून उटले. त्यांना तीन वर्ष टीमच्या बाहेर ठेवले होते. मात्र, रणजी सामन्यात सिद्धूने मारलेल्या सिक्सरची चर्चा होत होती. १९८७ मध्ये पहिल्यांदा भारतात वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले होते. भारतीय संघात नवज्योत सिंग सिद्धूला स्थान देण्यात आले.

या वर्ल्ड कप मध्ये सिद्धूने चांगले प्रदर्शन केले. सर्वाधिक सिक्स मारले. भारतीय संघ सेमीफायनल मध्ये हारला. मात्र सिद्धू यांची भारतीय संघात जागा फिक्स झाली होती. ते स्टार म्हणून उदयाला आले होते. आणि अशातच तो दिवस उगवला.

२७ डिसेंबर १९८८

नवज्योत सिंग सिद्धू हे पतियाळा येथे  जिप्सीतून जात असतांना सिग्नलवर थांबले होते. सिग्नल सुटल्यावरही त्यांची गाडी पुढे गेली नाही. यावरून मागे कार मध्ये थांबलेल्या गुरुनाम सिंह आणि त्यांचे भांडण झाले. रागात नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुनाम सिंह यांना मारहाण केली आणि पुढे निघून गेले.

सिग्नलवर थांबलेले लोक गुरुनाम सिंह यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. मात्र रस्त्यातच त्याचा जीव गेला. या प्रकरणात नवज्योत सिंग सिद्धू यांचे नाव घेण्यात आले. त्यानंतर पंजाब पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र अटकेच्या आणि कारवाईच्या भीतीने सिद्धू ५ दिवस गायब झाले. यावेळी एका सुप्रसिद्ध भारतीय खेळाडूने त्यांना आपल्या घरी लपवून ठेवलं असल्याचं सांगितलं जातं.

मात्र ५ दिवसांनी सिद्धूला अटकही झाली.

पतियाला येथील सत्र न्यायालयात नवज्योत सिंग सिद्धू विरोधात खटला भरण्यात आला. ११९९ मध्ये खटल्याचा निकाल लागला. सिद्धू आणि गुरुनाम एकमेकांना ओळखत नाही. मारहाणी दरम्यान कुठलेही शस्त्र वापरले नाही. रागातून झालेली मारहाण होती असे मानून सत्र न्यायालय सिद्धूला खुनाचा गुन्हा कमी करून त्यांची निर्दोष मुक्तता करते.

मात्र त्यांचे संकट इथे टळत नाही. सत्र न्यायालयाच्या विरोधात पंजाब सरकारने २००२ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. २००६ मध्ये उच्च न्यायालयाचा निकाल लागला त्यात नवज्योत सिंग सिद्धूला ३ वर्षाची शिक्षा सुनावली गेली.

यावेळी सिद्धू केवळ खेळाडू नव्हते, तर अमृतसर मधून ते खासदार झाले होते. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. ११ जानेवारीला त्यांची रवानगी कारागृहात झाली. दुसऱ्या दिवशी त्यांना सर्वोच्य न्यायालयातून जामीन मंजूर झाला होता. त्यावेळी भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांनी त्यांची बाजू मांडली होती.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली. त्यामुळे सिद्धू हे पोटनिवडणुकीत उभे राहू शकले आणि निवडून देखील आले.

त्यानंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालय नवज्योत सिंग सिद्धूची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

यावेळी सर्वोच्य न्यायालय पुन्हा एकदा सांगते की नवज्योत सिंग सिद्धू आणि गुरुनाम सिंह हे एकमेकांना ओळखत नाहीत. भांडणात कुठलाही शास्त्राचा उपयोग झाला नाही, त्यामुळे खुनाच्या गुन्हा ऐवजी दुखापत पोहचविल्या बद्दल १ लाखाच्या दंडची शिक्षा सुनावण्यात येत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू १ लाख रुपयांचा दंड भरून मोकळे झाले. मात्र, गुरुनाम सिंह यांच्या मुलाने सर्वोच्य न्यायालयात अपील केले असून त्यावर अजूनही सुनवाई झालेली नाही. गेली ३३ वर्ष हे भूत नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मानगुटीवर बसून आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.