आई पंतप्रधान तर वडील राष्ट्रपती; अशी आहे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची पार्श्वभुमी…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतासह जगभरात अनेक चाहते आहेत. मोदींबद्दल कुणीही चुकीचं काही बोललेलं किंवा अपशब्द हा त्यांच्या चाहत्यांना अजिबात सहन होत नाही. असं असताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींवर टीका केलीये.

खरंतर, सध्या संयुक्‍त राष्‍ट्र संघात भारत विरुद्ध पाकिस्तान अशी शाब्दिक चकमक सुरू आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख ९/११ च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी ओसामा बिन लादेनला शह देणारा देश असा उल्लेख केला.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी प्रत्यूत्तर देण्याच्या नादात थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय…

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असलेले भुट्टो जरदारी म्हणाले,

“मी भारताला सांगू इच्छितो की, ओसामा बिन लादेन मेलाय… पण, गुजरातचा कसाई अजूनही जिवंत आहे… आणि भारताचा पंतप्रधान बनून बसलाय.”

या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे पडसाद भारतात दिसायला लागलेत. दिल्लीमध्ये मोदी समर्थकांनी पाकिस्तानच्या उच्चायोगासमोर आंदोलन करायला सुरूवात केलीये ही आंदोलनं आणखी तीव्र होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मोदींबद्दल इतकं मोठं वक्तव्य करणारे हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे सुद्धा राजकारणातले कच्चे खेळाडू नाहीयेत, मग ते नक्की कोण आहेत हे पाहुया…

तगडी राजकीय पार्श्वभुमी असलेला नेता…
मुळात, बिलावल भुट्टो यांची पार्श्वभुमी पाहिली तर, ते अतिशय मोठ्या राजकीय पार्श्वभुमीतून आलेत. त्यांचे वडील हे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आहेत तर, माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो या त्यांची आई आहेत. याशिवाय, पाकिस्तानं पंतप्रधान आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदं भुषवलेले जुल्फिकार अली भुट्टो यांचे ते नातू आहेत.

फक्त एकोणिसाव्या वर्षी बनले पक्षाचे अध्यक्ष…
बिलावल भुट्टो यांची आई बेजनीर भुट्टो यांची २७ डिसेंबर २००७ रोजी हत्या झाली त्यावेळी बिलावल यांचं वय केवळ १९ वर्ष होतं. अश्यातच आईचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाची जबाबदारी कुणी सांभाळायची हा प्रश्न असताना बेजनीर यांच्या मृत्यूच्या ३ दिवसांनंतर बिलावल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली.

२०१८ च्या निवडणुकीत पक्षाचं यशस्वी नेतृत्त्व केलं…
२०१८च्या निवडणुकीमध्ये बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तान पीपल्स पार्टीनं सर्वात आधी आपलं घोषणापत्र जाहीर केलं. या घोषणापत्राचं नाव होतं, “बीबी का वादा है, पाकिस्तान बचाना है”. या शीर्षकात बीबी चा अर्थ त्यांची आई आणि माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो असा आहे.

२०१३ च्या तुलनेत २०१८मध्ये पक्षाला मोठं यश मिळालं…
२०१८च्या निवडणुकीचा निकाल लागला अन् पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधमधला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आला तर, पाकिस्तानतला तीसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आला. या निवडणुकीत २०१३ पेक्षा ९ जागा अधिक मिळवत एकुण ४३ जागांवर विजय मिळवला.

२०१८ मध्ये पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये गेले…
२०१८ च्या निवडणुकीत त्यांनी एकूण ३ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यापैकी कराची दक्षिण आणि मलाकंद या दोन मतदार संघात त्यांचा पराभव झाला तर, लारकाना या मतदारसंघातून जवळपास पंच्याऐंशी हजार मतांनी ते विजयी झाले आणि पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये पोहोचले.

२०१९ मध्ये बनले मानव अधिकार समितीचे अध्यक्ष झाले…
मानव अधिकार समितीच्या अध्यक्षपदाची २०१९मधली निवडणूक बिलावल भुट्टो यांनी बिनविरोध जिंकली आणि ते मानवाधिकारांसाठी राष्ट्रीय असेम्बलीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बनले.

२०२२मध्ये सत्तापालटानंतर बनले परराष्ट्र मंत्री…
२०१८ मध्ये नॅशनल पार्लमेंटमध्ये पोहोचल्यानंतरही ते मंत्री झाले नाहीत. २०२२ मध्ये इम्रान खान यांच्या सरकारविरोधात उठाव झाल्यानंतर सत्ता पालटली अन् शहबाज़ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

शहबाज शरीफ हे ज्या राजकीय पक्षाचे आहेत त्या मुस्लिम लीग आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानी पीपल्स पार्टी यांच्यात एकमत नव्हतं. पण, २०२२ मध्ये सत्तापालटानंतर युती करून सत्ता स्थापन करण्यात आली आणि बिलावल भुट्टो हे वयाच्या ३४व्या वर्षी पाकिस्तानचे सर्वात तरूण परराष्ट्र मंत्री बनले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री एकमेकांच्या देशांवर टीका-प्रतिटीका करत होते इथवर ठीक होतं, पण आता बिलावल भुट्टो यांच्या या वक्तव्यानं भारतात संतापाची लाट उसळलीये आणि त्याचे तीव्र पडसाद उमटण्याचीही शक्यता आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.