आकडेवारी सांगते, लिलावात खेळाडूंना गब्बर केलेली एकही टीम प्लेऑफला गेलेली नाय…
आयपीएलचा शेवटचा टप्पा आजपासून सुरू होईल. राजस्थान रॉयल्स किंवा गुजरात टायटन्सपैकी एक टीम थेट फायनलला जाईल. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या विजयामुळं प्लेऑफचं तोंड बघितलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला आणि लखनौ सुपर जायंट्सला दोन्ही मॅचेसमध्ये जिंकणं गरजेचं आहे. या चार टीम्स पुढं गेल्या आणि सहा मागे राहिल्या.
मागे राहिलेल्यांमध्ये तशी मोठी नावं होती, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद… आतापर्यंतच्या १४ आयपीएलपैकी १३ विजेतेपदं ज्या टीमकडे आहेत त्या टीम्स बाहेर पडल्यात.
भल्याभल्यांनी यंदाच्या आयपीएलला अस्मान बघितलंय. लय जण तर म्हणाले, ‘यावेळची आयपीएलच गंडलीये.’
याची सुरूवात कुठून झाली, तर मेगा ऑक्शनमधून. म्हणजे दरवर्षी कसं पाच-सहा प्लेअर्सची देवाण घेवाण व्हायची, तसं न होता यावर्षी जास्तीत जास्त चार प्लेअर्स स्वतःकडे ठेवायचे आणि बाकीच्यांची आयात करायची असा पॅटर्न ठरला. पार फाफ डू प्लेसिस, मोहम्मद शमी, डेव्हिड वॉर्नर, युझवेंद्र चहल अशी बडी नावं ऑक्शनमध्ये होती.
पण सगळ्यात जास्त पैसे कुणी छापले तर, ईशान किशननं. जास्त म्हणजे किती? तर १५.२५ कोटी. त्याच्या खालोखाल नंबर लागला, दीपक चहरचा आणि त्यानंतर श्रेयस अय्यरचा.
मध्यमवर्गीय माणूस आपल्या जिंदगीत कधी बघू शकणार नाही, एवढे पैसे एका लिलावात कमवणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आयपीएलमध्ये काय दिवे लावले हे बघुयात.
१. ईशान किशन
कुणी इमॅजिनही नव्हतं केलं, इतके पैसे ईशानला एका आयपीएलमुळं मिळाले. त्याच्यासाठी मुंबईनं इतका पैसा ओतला, की त्यांच्याकडे इतर प्लेअर्सला बोली लावायला पैसेच उरले नाहीत. पण ईशान किशननं मोजलेला प्रत्येक पैसा वाजवला का? तर म्हणायला गेलं तर नाही. या सिझनमध्ये ईशाननं १४ मॅचेसमध्ये ४१८ रन्स केले, सरासरी होती ३२.१५.
आता आकडेवारी बघितली, तर मुंबईकडून सर्वाधिक रन्स ईशानचेच आहेत, पण हे गणित ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ असं आहे. कारण बाकी मुंबईची बॅटिंग ढेपाळलेली आहे. ईशान किशन ज्या स्फोटक बॅटिंगसाठी, पहिल्या बॉलपासून समोरच्या बॉलिंगवर तुटून पडण्यासाठी ओळखला जातो. ते मात्र यंदा फ्लॉप गेलं, काही मॅचेसमध्ये त्याची चमक दिसली खरी.. पण तोवर प्लेऑफची सिमरन ट्रेनमध्ये बसून मुंबईपासून लांब गेली होती. ईशान चालला असता, तर चित्र वेगळं दिसलं असतं…
२. दीपक चहर
चेन्नईचा लक फॅक्टर गंडायची सुरुवात दीपकच्या दुखापतीपासून झाली. पॉवरप्लेमध्ये हमखास विकेट मिळवून देणारा आणि स्विंगवर समोरच्याला गंडवणारा बॉलर म्हणून चेन्नईनं दीपकसाठी १४ कोटी मोजले होते. त्याला केंद्रस्थानी ठेऊन, बाकीचे बॉलर्स घेतले, पण दुखापतीमुळं दीपक चहर आयपीएलमधून एकही मॅच न खेळता बाहेर पडला.
३. श्रेयस अय्यर
कोलकात्यानं अय्यरला आपल्या टीममध्ये घेऊन कॅप्टन केलं आणि त्यासाठी मोजले १२.२५ कोटी. कोलकात्याकडून सगळ्यात जास्त रन्स त्यानंच केले. पण यावेळी चर्चेत राहिला तो श्रेयस अय्यरचा स्ट्राईक रेट. फक्त १३४ च्या स्ट्राईक रेटनं यावेळेस अय्यर खेळला. थोडक्यात टुकूटुकूच. टीम सिलेक्शनबद्दलही चर्चा झाली.
भावनेच्या भरात कोलकात्याच्या संघमालकांबद्दल केलेली वक्तव्यही गाजली. या सिझनला अय्यरची मैदानाबाहेर जितकी चर्चा झाली, तितकी मैदानात झाली असती, तर कोलकाता नाईट रायडर्सचं नाव टॉप फोरमध्ये नक्की दिसलं असतं.
४. लियाम लिव्हिंगस्टोन
किंमत किती होती, तर साडे अकरा कोटी. किंग्स इलेव्हन पंजाबलाही टॉप फोरमध्ये येण्यात अपयश आलं असलं, तरी लिव्हिंगस्टोननं मात्र आपलं नाणं वाजवून दाखवलं. सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत त्याचं नाव सहाव्या नंबरला आहे. विशेष म्हणजे ४३७ मधले ३२० रन्स सिक्स आणि फोरच्या रूपात आलेत. वर भावानं ६ विकेट्सही काढल्या.
उडत्या ऐवजी बुडत्या पंजाबला लिव्हिंगस्टोनचे पैसे वसूल झाले, याचाच काय तो मानसिक आधार असेल.
५. शार्दूल ठाकूर
लॉर्ड ठाकूरला दिल्लीनं १० लाख ७५ हजार दिले. ठाकूर व्हॅल्यू फॉर द मनी ठरला खरा, पण विकेट्सच्या यादीत १५ घेऊन त्याचा नंबर पार १९ वा लागला. ठाकूर तसा बॅटिंगही करतोच, पण यावेळी एक मुंबईची मॅच काढून देण्याव्यतिरिक्त त्याची ‘लॉर्डगिरी’ गरशी दिसलीच नाही.
ठाकूर इतकेच पैसे वनिंदू हंसरंगा आणि हर्षल पटेलसाठीही मोजले होते. या दोघांच्या बॉलिंगनं मात्र कमाल केली. हंसरंगानं २४ विकेट्स घेत आरसीबीला प्लेऑफच्या आणि स्वतःला पर्पल कॅपच्या शर्यतीत कायम ठेवलंय. दुसऱ्या बाजूला हर्षल पटेलनंही १८ विकेट्स खोलल्यात आणि तेही स्वतःची बहीण गेल्याचा आघात पचवून.
जरा डीप जाऊन बघितलं, तर ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या टॉप ५ प्लेअर्सपैकी, एकाच्याही टीमला यंदा प्लेऑफ्स गाठता आलेले नाहीत. उलट नव्या पोरांना घेऊन उतरलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायन्ट्सनं हवा केली.
लिलावात सगळ्यात जास्त खर्च केलेली मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडलेली पहिली टीम ठरली.
दुसऱ्या बाजूला उमरान मालिक, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक यांनी लिलावात कमी पैसे मिळूनही आयपीएलमध्ये इतका कहर केला की, त्यांना थेट टीम इंडियामध्ये बोलावणं आलं. त्यामुळं बोली मोठी लागूनही कुणाचं नाव चाललं, तर कुणाचं गंडलं.
पुलाखालून आयपीएलची सगळी लीग स्टेज वाहून गेलीये, मेगा ऑक्शनमध्ये काय गंडलं आणि काय नाही याच्यावर टीम मिटींग्सही होतील. त्यामुळं पुढच्या सिझनला आत्ता गब्बर झालेल्या कार्यकर्त्यांचा ठाकूर होतोय की नाही? हे बघायला वर्षभर वाट पाहावी लागणारे.
हे ही वाच भिडू:
- आयपीएलच्या राड्यात पुजारा कुठंय? गडी कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा बदला पूर्ण करतोय…
- आयुष्यात दोस्त का पाहिजे… हे दिनेश कार्तिकचा कमबॅक बघून समजतं
- पैसा लावला सगळ्यांनी, पण क्रिकेटमधला धंदा फक्त शाहरुख खाननंच ओळखलाय