नाडी परीक्षण करणाऱ्या पुण्यातला स्टार्ट-अपला भारत सरकारचा पुरस्कार मिळाला आहे

हजारो वर्षांपासून चालून आलेल्या आयुर्वेदातील नुक्से आजपण दैनंदिन आरोग्याच्या तक्रारींवर उपयोगी आहेत. सुश्रुताने तर पार प्लास्टिक सर्जरी पर्यंतची प्रक्रिया लिहून ठेवल्याचं सांगितलं जातं . मात्र बऱ्याच वेळा आयुर्वेदाबद्दल एक तर चढवून सांगितलं जातं किंवा त्याची खिल्ली उडवली जाते.

मात्र ज्यांनी त्याचा नीट अभ्यास केला त्यांनाच आयुर्वेदाचा खरा सार कळला.

नाडीपरीक्षण ही आयुर्वेदात सांगितलेली अशीच एक महत्वाची प्रक्रिया.आयुर्वेद वैद्य रुग्णाचे मनगट पकडून वात, कफ आणि पित्ताचे परीक्षण करतात. मात्र देशात जे सुमारे ५ लाख आयुर्वेदिक तज्ज्ञ अथवा डॉक्टर आहेत त्यांच्यापैकी फार कमी डॉक्टरांना अचूक नाडी परीक्षण करता येते.  हीच निकड बरोबर ओळखली पुण्याचे संशोधक डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी.

डॉ. जोशी यांनी आयुर्वेद तज्ज्ञ व आयुर्वेद डॉक्टरांसाठी, आयुर्वेद आणि विज्ञानाचे यातील दरी कमी करत ‘नाडी तरंगिणी’ हे नाडी परीक्षण करणारे अत्याधुनिक यंत्र तयार केले आहे.

या यंत्रानं नाडी परीक्षण दोन मिनिटात होते आणि पुढच्या काही सेकंदात त्या परीक्षणाचा रिपोर्ट तयार होतो. मग हा रिपोर्ट डॉक्टरांना मोबाइल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहता येतो.डॉ. जोशी यांनी मुंबईमध्ये इंजिनीअरिंग केल्यानंतर आयआयटीमधून एमटेक आणि पीएचडी केली आहे. याशिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) संशोधनही केले आहे. या ठिकाणी १३ वर्षांपासून डॉ. जोशी यंत्र विकसित करण्यासाठी संशोधन करीत होते.

डॉ. जोशी यांना त्यांचे वडील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जे. बी. जोशी यांनी असे यंत्र तयार करण्याची आयडिया दिली होती.

डॉ. जोशींनी तयार केलेली ही उपकरणं सध्या बारा देशात वापरली जात आहेत. तसेच याच्या आधारे एक लाख लोकांची शरीर व आरोग्य तपासणी करण्यात आल्याचा डेटा त्यांच्याकडे आहे. 

डॉक्टर जोशी यांच्या याच कामाची आता भारत सरकारनं दखल घेतली आहे. भारतीय औद्योगिक विश्र्वात नाविन्यपूर्ण संशोधन व विकास करणार्‍या तरुण संशोधकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्टार्ट-अप इंडिया अवॉर्ड’ हा पुरस्कार डॉ अनिरुद्ध जोशी यांना जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इ.सन २०१६ मध्ये ही योजना सुरू केली होती.

त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे. एकविसाव्या शतकात देशाचे सामर्थ्य वाढविणार्‍या आणि जगभर उपयोगी पडू शकणार्‍या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

भारतातून २१७७ आलेल्या अर्जातून ४६ जणांना हा स्टार्ट-अप इंडिया अवॉर्ड जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये आपल्या पुण्याच्या डॉ. अनिरुद्ध जोशी यांचा समावेश आहे ही महाराष्ट्रासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे.  बाकी जुनं ते सोनं हे खरं आहे मात्र ते सोनं शोधायची नजर आपल्याकडे पाहिजे हेच खरं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.