विरप्पनने हिरोचं अपहरण केलेलं, सोडवण्यासाठी खुद्द रजनीकांत गेलेला…?

एक काळ होता जेव्हा भारतीय प्रशासन आतंकवादी, दहशतवादी, नक्षलवादी लोकांपेक्षा लुटारू आणि दरोडेखोर लोकांनी ग्रासलेलं होतं. तो काळ होता 70-80 चा जेव्हा डाकू, दरोडेखोर लोकांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमे लिहिले जात होते. या डाकू लोकांनी आपली दहशत इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवली होती की मोठमोठे राजकारणी, सेलिब्रिटी लोकं धास्तावले होते.

या डाकुंमधे एक डाकू होता विरप्पन. 

दशकाहुन अधिक काळ आपली दहशत विरप्पनने बसवली होती.चंदन तस्करीचा राजा म्हणून विरप्पनचा दबदबा साऊथमध्ये तर होताच शिवाय त्याचा दरारा हा उत्तर भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता. केंद्र सरकारसुद्धा त्याच्या कारवायांमुळे दबावात आलेलं होतं. त्याला कोणी पकडू शकलेलं नव्हतं आणि प्रयत्न करणंसुद्धा घातक होतं. केंद्र सरकार वैतागलेल्या अवस्थेत होतं आणि विरप्पनपुढे हतबल झालेलं दिसत होतं.

विरप्पनच्या दहशतीचा अंदाज आपण याच गोष्टीवरून लावू शकतो की एकदा 2000 सालामध्ये कर्नाटकचे सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांना किडनॅप केलेलं आणि कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारने हजारो प्रयत्न करूनही विरप्पन समोर त्यांना हार मानावी लागली होती. तेव्हा राजकुमार यांचं अपहरण झालं, त्यांना सोडवायचे सगळे प्रयत्न झाले पण निष्फळ ठरले. पण इथं एक ट्विस्ट होता.

बऱ्याच लोकांना माहिती नसेल की इतर लोकांप्रमाणेच विरप्पनसुद्धा रजनीकांतचा मोठा चाहता होता. राजकुमार याना सोडवण्यासाठी विरप्पनने अट ठेवली की जेव्हा तुम्ही माझी रजनीकांत सोबत भेट घालून द्याल तेव्हाच मी राजकुमार यांना सोडण्याबद्दल विचार करील. विरप्पनची ही अट लोकांना मोठी रिस्क वाटत होती. काय केलं पाहिजे, भेट द्यायला हवी की नको यावर बऱ्याच चर्चा झाल्या.

शेवटी विरप्पनने ही अट एका पत्रकाराला दूत बनवून रजनीकांतकडे पाठवली.

दैनिक जागरण या वृत्तसंस्थेच्या नुसार रजनीकांतने राजकुमार यांचा जीव वाचवायचा ठरवलं आणि एका चार्टर फ्लाईट मधून कर्नाटकात एका गुप्त ठिकाणी पोहचला. तिथं पोलिसांच्या गाड्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. तिथं पोहचल्यावर पत्रकारासोबत रजनीकांत एका बुलेटप्रूफ गाडीतून विरप्पनच्या भेटीला गेला.

राजकुमार यांना सोडवण्याच्या मिशनला रजनीकांत रवाना झाला. विरप्पन सोबत भेटीगाठी झाल्यावर राजकुमार यांच्या सोडवणुकीची चर्चा झाली. नंतर जेव्हा राजकुमार विरप्पनच्या तावडीतून सुटून आले तेव्हा त्यांच्या सुटका होण्याच्या मार्गात रजनीकांतने मोठी भूमिका बजावली होती.

आता ही बातमी खरी की खोटी कधी समोर आलं नाही.

इतकं मात्र खरं की रजनीकांतने राजकुमार यांच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले होते, विरप्पन त्याच्या भेटीसाठी उत्सुक होता आणि रामगोपाल वर्मा यांचं ऐकायचं झालं तर विरप्पनने त्याच्या अपहरणाचा प्लॅन बनवला होता.

विरप्पनच्या भेटीला मात्र रजनी गेला नाही कारण त्याला वाटलं की जर आपण राजकुमार यांच्या सुटकेसाठी गेलो आणि विरप्पनने त्यांना सोडलं नाही तर आपला कसला मोठा अपमान होईल. फक्त या एका कारणासाठी तो तिथे गेला नाही पण राजकीय दबाव मात्र त्याने जरूर आणला.

दक्षिण भारतामध्ये रजनीकांतला देव मानतात, त्याच्या अनेक साहसकथा तिकडे प्रचलित आहेत. यामध्ये राजकुमार यांच्या सुटकेचे प्रयत्न पण सामील आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.