एकही शब्द न बोलता चर्चेत कसं राहायचं हे रश्मी ठाकरेंना चांगलंच माहितीये…

१७ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या महामोर्चानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. महाविकास आघाडीनं काढलेला हा मोर्चा नावाप्रमाणेच ‘महा’ होता. संपुर्ण राज्यभरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

या मोर्चामागचं मुख्य कारण होतं ते, ‘राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला महापुरूषांचा अपमान.’ याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. मुख्यत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्यानं महापुरूषांचा अपमान होत असल्यानं त्यांची पदावरून हकालपट्टी करावी ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

या सगळ्या विराट मोर्चामध्ये एक अशी व्यक्ती सामिल झाली होती जी पुर्वी कोणत्याच मोर्चात दिसली नव्हती…

त्या व्यक्तीचं नाव म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे!

रश्मी ठाकरे या पहिल्यांदाच एखाद्या मोर्चात सहभागी झालेल्या आपल्याला दिसल्या.आता त्या याआधी कधी मोर्चात सहभागी झाल्या नव्हत्या म्हणजे त्या राजकारणापासून दूर होत्या का? तर तसं नाहीये. शिवसेनेत राजकीय फूट पडून राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रश्मी या बऱ्याचदा चर्चेत आल्या.

रश्मी ठाकरे यांचं नाव आजवर शिवसेनेत फूट पडल्यावर , ठाण्यातल्या नवरात्रौत्सवात असेल किंवा मग आजच्या मोर्चात असं बऱ्याचदा पुढे आलंय.

मीडियासमोर फारसं न बोलताही चर्चेत राहतात रश्मी ठाकरे…

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मध्यस्थी करायला रश्मी ठाकरे:

२१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन सूरतला निघून गेल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून पक्षातल्या नेत्यांना पाठवून आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होतेच, पण त्याचवेळी रश्मी ठाकरे यांनी स्वत: फोनवरून आमदारांशी चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

आमदारांना परत बोलवण्यासाठी रश्मी ठाकरेंचा भावनिक गेम:
याशिवाय आमदारांची मनधरणी होत नाही म्हटल्यावर रश्मी ठाकरेंनी आमदार पत्नींशी संपर्क केला होता. त्यांची मनधरणी करून आमदारांना परत बोलवण्याच्या बाबतीत त्यांनी चर्चा केली होती अश्याही बातम्या तेव्हा समोर आल्या होत्या.

नवरात्रौत्सवात शिंदेंच्या ठाण्यात पोहोचल्या रश्मी ठाकरे:
ठाण्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते होऊन गेलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील नवरात्रौत्सव हा शिवसेनेसाठी मोठा आणि मानाचा असल्याचं म्हटलं जातं. आनंद दिघे यांच्या यांच्या नंतर एकनाथ शिंदे हे या नवरात्रौत्सवाचं आयोजन करताना दिसत आलेत.

यंदाच्या वर्षी शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देवीचं दर्शन घ्यालया जाणं, हे देवीचा आशीर्वाद मिळवण्यापेक्षा जनतेच्या मनातलं स्थान राखण्यासाठी आणि आणखी मोठं करण्यासाठी गरजेचं होतं. नेमक्या याच गोष्टीचा पुरेपूर विचार करून सप्टेंबर महिन्यात रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन टेंभीनाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं. यासोबतच, आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावरही त्या जाऊन आल्या.

आता, त्या ठाण्यात जाऊन आल्या खऱ्या. पण, मीडियाशी त्यांचा झालेला संवाद हा जेमतेम ५-६ ओळींचाच झाला असेल. असं असलं तरीही त्या दिवशी साधारण ६-७ तास तरी मीडियाचं लक्ष रश्मी ठाकरेंवरून हललेलं नव्हतं.

दीपाली सय्यद यांनी पक्ष सोडतेवेळी केलेली टीका:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला नेतृत्व असलेल्या दीपाली सय्यद यांनी सत्तापालट झाल्यानंतरही बराच काळ पक्षात काम केलं. त्यानंतर मग त्यांनी पक्षाची साथ सोडली. पण पक्षाची साथ सोडताना त्यांनी रश्मी ठाकरेंवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरला. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या,

“मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत याची खंत रश्मी वहिनींना जाणवतेय. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे हे चिल्लर आहेत. खऱ्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत”

हा आरोप दीपाली सय्यद यांनी केला खरा, पण त्याचा परिणाम असा झाला की, मीडियाचं जितकं कव्हरेज दीपाली सय्यद यांना मिळालं तितकंच किंवा त्यापेक्षा किंचीतच जास्त हे ‘रश्मी ठाकरे’ या नावाला मिळालं.

कालच्या महामोर्चामध्ये अनपेक्षित हजेरी:
काल महाविकास आघाडीने मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे अनेक बडे नेते उपस्थित होते. असं असलं तरीही… अनपेक्षितरित्या उपस्थिती लावलेल्या अन् कार्यकर्त्यांसह पायी चाललेल्या रश्मी ठाकरे यांनी मीडियासमोर मार्केट खाल्लं.

आजवर चर्चेत राहिल्या असल्या तरी काल पहिल्यांदाच रश्मी ठाकरे या रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या. त्यामुळे, त्यांच्या कालच्या सहभागाचा संबंध हा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी केलेल्या महिला मुख्यमंत्री संबंधित वक्तव्याशी जोडला जातोय.

दरम्यान, रश्मी ठाकरे या आगामी काळात शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील असं म्हटलं जात असलं तरी त्यावर ठामपणे भाष्य करणं सध्यातरी कठीण आहे. तरीही कालच्या त्यांच्या मोर्चातील सहभागावरून त्या आता सक्रीय राजकारणात दिसल्या तर नवल वाटायचं काही कारण नसावं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.