एकेकाळी स्पॉटबॉय असलेला रोहित शेट्टी तब्बूच्या साड्या इस्त्री करायचा…..
बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, लेखक, अभिनेते यांचा मोठा स्ट्रगल ऐकायला, वाचायला मिळतो. वॉचमनचं काम करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी असो किंवा हॉटेलमध्ये आचाऱ्याचं काम करणारा पंकज त्रिपाठी असो यांना बराच काळ संघर्ष करावा लागला नंतर मात्र लेट पण थेट कार्यक्रम झाला आणि त्यांच्या संघर्षाला यश मिळालं. असाच एक जबरदस्त किस्सा आहे बॉलिवूडचा मारधाडपट सिनेमांचा बादशहा असलेल्या लेखक, दिग्दर्शक रोहित शेट्टीचा.
बॉलिवूडचा सगळ्यात आघाडीचा दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीला ओळखलं जातं. सिंघम, गोलमाल, सिम्बा, चेन्नई एक्स्प्रेस अशा एक से बढकर एक फिल्म्स त्याने बॉलीवूडला दिल्यात. १९९१ मध्ये अजय देवगनच्या एका सिनेमामधून असिस्टंट डिरेक्टर म्हणून रोहित शेट्टीने काम करायला सुरवात केली. पुढे अजय देवगनसोबत त्याने भरपूर काम केलं. सुरवातीच्या काळात बराच संघर्ष रोहित शेट्टीच्या वाट्याला आला.
बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण रोहित शेट्टीचे वडील एम बी शेट्टी हे बॉलिवूडमध्ये अभिनेते होते. जेव्हा एम बी शेट्टी यांचं निधन झालं तेव्हा रोहित शेट्टी लहान होता. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि रोहित शेट्टीच्या आईला सिनेमामध्ये तात्पुरतं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करावं लागलं. वडिलांच्या निधनामुळे रोहित शेट्टीच्या घरची परिस्थिती इतकी बिघडली कि त्यांना राहतं घर विकावं लागलं होतं. घर विक्री झाल्याने रोहित आणि त्याच्या आईला आजी आजोबाकडे राहायला जावं लागलं.
रोहित शेट्टीची शाळा हि दहिसरपासून सांताक्रूझला होती. त्यामुळे येण्याजाण्यातच भरपूर पैसे खर्च होऊ लागले. त्यामुळे शाळेपेक्षा कमाई करण्यासाठीच काम करावं लागू लागलं. याच काळात रोहितची बहीण चंदा हि सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होती. तिच्या शिफारशीवरून रोहित शेट्टी कुक्कु कोहलीसोबत काम करू लागला. फुल और काटे या सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं.
१९९५ मध्ये हकीकत नावाचा एक सिनेमा बनत होता आणि त्याची हिरोईन होती तब्बू. हकीकत सिनेमासाठी रोहित शेट्टीने स्पॉटबॉयचं काम केलं होतं. सेटवर वस्तूंची देवाणघेवाण करणे, झाडू मारणे वैगरे अशी बरीच काम त्याने केली.
पण इथं रोहित शेट्टी हा स्पॉटबॉय होताच तेव्हा त्याने तब्बूच्या साडीला इस्त्री मारण्याचं सुद्धा काम केलं होतं. पुढे तब्बूने रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली गोलमाल रिटर्नमध्ये काम केलं. फक्त तब्बूच नाही तर काजोलचा स्पॉटबॉय म्हणून सुद्धा रोहित शेट्टीने काम केलं होतं.
आज घडीला रोहित शेट्टीचं बॉलिवूडमध्ये असलेलं मार्केट त्याच्या संघर्षाची साक्ष देतं. करोडोंमध्ये आज रोहित शेट्टीचे सिनेमे कमाई करतात. ज्या ज्या हिरोईनसाठी रोहित शेट्टीने स्पॉटबॉयचं काम केलं त्या त्या हिरोइनना घेऊन त्याने सिनेमे बनवले. बॉलिवूडमधल्या स्ट्रगलची हि रोहित शेट्टीची प्रेरणादायी गोष्ट आहे, जी आजही बॉलिवूडमध्ये चर्चिली जाते.
हे हि वाच भिडू :
- मध्यरात्री ३ वाजता सोनू निगम अजय अतुलच्या स्टुडिओबाहेर गाण्याची रिहर्सल करत होता…..
- अजय देवगणच्याही आधी विमलचे सगळ्यात पहिले ब्रँड अँबॅसिडर मिलिंद गुणाजी होते
- जेव्हा अजय-अतुलला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना हिंदी सिनेमा मिळवून दिला..
- गोलमाल सिनेमानंतर गायब झालेले संजय मिश्रा रोहित शेट्टीला ढाब्यावर काम करताना सापडले