स्कॉलर विरुद्ध कॉलर…

एक राजा होता. छत्रपतींचा वंशज. त्याने काय केलं तर इंग्रजाविरोधातला पहिला कायदेशीर लढा उभारला. आपला वकिल इंग्लडमध्ये पाठवला. पण पेशवाईमुळे त्यास यश आले नाही. तो नजरकैदेतच गेला. पण त्याचा वकिल त्याच्यासारखाच होता.

इंग्लडमध्ये आपली बाजू मांडताना तो म्हणाला,

राज्य जाईल याची धमकी कशाला देता? आम्ही राज्याची हाव कधीच धरली नाही.

त्या राजाचं नाव प्रतापसिंह राजे भोसले.

वकिलाच नाव रंगो बापूजी. पेशवाईच्या कारस्थानाचा बळी पडलेला हा राजा. पण पेशवाईपुढे मान न झुकवता लढला. बालपणात या राजाला इंग्रजांनी नजरकैदेत ठेवलं होतं. तेव्हा या राजाला त्यांच्या मातोश्री मध्यरात्री उठवत असतं. छोट्याशा दिव्यात लपून प्रतापसिंहराजे ग्रॅंथ वाचत. वेगवेगळ्या भाषांचे शिक्षण घेत. सवाई माधवराव होता तोपर्यन्त छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा होती.

प्रतापसिंह महाराजांच नेमक योगदान काय विचारलं तर आजच साताऱ्याच जलमंदिर हे प्रतापसिंहांनीच बांधलं. यवतेश्वर डोंगावर तलाव खोदून खापरी नळाने साताऱ्यात पाणी आणले ते प्रतापसिंहानी. नवा राजवाडा देखील त्यांनीच बांधला. छापखाने काढून ग्रॅंथसंपदा वाढवली ती प्रतापसिंह यांनीच.

सातारा संस्थानातील तरुण आणि तरुणींना लष्करी शिक्षणाची सुविधा देण्याची सुरवात केली ती देखील प्रतापसिंह महाराजांनी. या लष्करी शिक्षणात त्यांची स्वत:ची मुलगी गोजराबाई देखील होती. आपल्या कन्येला लष्करी शिक्षण देणारा हा राजा.

छत्रपती घराण्याचा मान. सातारच्या गादीचा मान म्हणजे नेमका काय हे सांगण्यासाठीच हे एक उदाहरण.

छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारसा कसा आहे हे सांगत असताना सुरवात करावी लागते ती छत्रपती संभाजी महाराजांपासून. “बाप से बेटा सवाई” हे वाक्य संभाजी महाराजांसाठी तंतोतत खरे ठरते. संभाजीराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रॅंथ लिहला. नाईकाभेद, नखशिखा, सातसतक असे ग्रॅंथ महाराजांनी लिहले. संभाजी महाराज जितके युद्धनितीत पारंगत होते तितकेच विद्वतेत देखील. दक्षिणेत जे सांभार खाल्ले जाते त्याचा शोध संभाजी महाराजांनी लावला होता. विचार करा.

एक राजा जो ग्रॅंथसंपदेत हूशार असतो, तोच युद्धनितीत पारंगत असतो आणि तोच राजा पाककलेत देखील निपुण असतो. त्यांच्या हूशारीचे दाखले आजही दिले जातात. 

शिवराय आणि संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच तंजावरमध्ये एक राजे होते.

खूप कमी मराठी माणसांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. सरफोजीराजे भोसले अस त्यांच नाव. त्यांनी १४ भाषा येत होत्या. जगभरातून आणलेली ३० हजाराहून अधिक पुस्तके त्यांच्या संग्रही होती. बर सांगण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे ते मोतीबिंदू ऑपरेशन करत. १६५२ साली जर्मनीमध्ये मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा शोध लागला होता. भारतातील काही निवडक व्यक्तिंना हे ऑपरेशन येत असत त्यात सरफरोजीराजेंचा समावेश होता. फक्त ऑपरेशन करण्यापुरतच त्यांच ज्ञान मर्यादित नव्हतं तर त्यांनी ऑपरेशनच डॉक्युमेंटेशन देखील करुन ठेवलं. आपल्या वैद्यकिय अभ्यासावर त्यांनी शरभैन्द्र वैद्य नावाचा ग्रॅंथ लिहला.

कर्नाटकी शास्त्रिय संगीताल त्यांनीच व्हायोलिन आणि सनईची ओळख करुन दिली. मराठीतला पहिला पाकशास्त्रातला ग्रॅथ त्यांनी लिहला. जहाजबांधणीचा कारखाना, स्त्री शिक्षण असे अनेक कार्य त्यांनी केले. 

हे झालं तंजावरच्या महाराजांच. तसेच कोल्हापूरचे शाहू महाराज.

तुम्हाला माहिती आहे का? देशभरातला पहिला होमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना शाहू महाराजांनी सुरू केला. शाळेपासून ऐकत आलेलो शिक्षणसक्ती, सामाजिक आरक्षण, राधानगरीचा तलाव, आंतरजातीय विवाह अशा कितीतरी गोष्टी शाहू महाराजांच्या नावावर आहेत.  दलित समाजातील युवकास हॉटेल काढून देवून त्याच्या हॉटेलात जावून रोज चहा पिणारे महाराज होते. महाराजांनी आपल्या कृतीतून अनेक गोष्टी सिद्ध केल्या.

छत्रपतींची गादी शौर्य आणि विद्वतेचं प्रतिक. छत्रपतींच्या आजूबाजूला नेहमी विद्वान लोक असत. कोणतिही तडजोड न करता त्यांनी विद्वतापुर्वक राजकारभार त्यांनी केला. गादीची प्रतिष्ठा म्हणजे कॉलर कधीच नव्हती. तर ती स्कॉलर अशीच होती.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.