जेव्हा फेसबुक, टिंन्डर नव्हतं तेव्हा पोरं पोरी शोधण्यासाठी शानची गाणी ऐकायची…

गाणी ऐकण्याचा शौक एकदा लागला तर प्रवासात, चालताना, झोपताना कुठेही कानात हेडफोन्स लावून एखादं गाणं ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. इतकंच काय, प्रवास दूरचा असेल आणि चुकून हेडफोन्स विसरलो असू, तर तो प्रवास खूप कंटाळवाणा होऊन जातो.

प्रत्येकाची गाण्याची स्वतःची एक प्लेलिस्ट असते. काही जणं काळानुसार जी गाणी नवी आणि ट्रेण्ड मध्ये असतील, ती गाणी ऐकतात. तर काही जणं मात्र काळ कितीही पुढे गेला तरी जुन्या गाण्यांमध्ये रमतात. जुन्या नव्या काळाला साक्षीदार असणाऱ्या अशाच एका गायकाची गाणी दर्दी कानसेनांच्या प्लेलिस्ट मध्ये हमखास सापडतील.

तो गायक म्हणजे शान. आज या शानदार गायकाचा वाढदिवस.

एक प्रसन्न चेहरा. तो जेव्हा हसतो तेव्हा त्याचे डोळे काहीसे बारीक होतात. आणि तो जेव्हा गातो तेव्हा दुःखाचाही एका वेगळ्या प्रकारचा आनंद साजरा करावासा वाटतो.

१९८९ साली वयाच्या १७ व्या वर्षी शान हिंदी सिनेसृष्टीत आला. आज २०२० सुरू आहे. आत्ता जरी शानने गाणी गाणं कमी केलं असलं, तरीही संगीतक्षेत्रात घडणारा मोठा बदल त्याने पाहिला आहे.

शानचा सदाबहार आवाज प्रत्येक काळात आपल्या सोबत राहिला. कधी ‘तनहा दिलं च्या रूपात शान आपल्या सोबत असतो, तर आयुष्य कसंही‌ असो, ‘आल इज वेल’ म्हणत शान आपल्याला आनंदाने जगायला शिकवतो.

शान, मोहित चौहान, केके या मंडळींनी एक काळ गाजवला आहे.

आत्ता या गायक त्रिकुटांची नवी गाणी इतकी ऐकायला मिळत नाहीत. पण तरीही यांनी करून ठेवलेलं काम हे इतकं क्लासिक आहे, की ते काम पुढच्या अनेक पिढ्या, हे किती प्रतिभावान गायक आहेत याची ओळख सांगत राहील.

शानने स्वतःच्या गाण्याची सुरुवात केली वयाच्या १७ व्या वर्षापासून.

शानचं मूळ नाव शंतनु मुखर्जी. शानच्या घरी संगीतमय वातावरण होतं. त्याचे आजोबा जहर मुखर्जी हे गीतकार होते. मानस मुखर्जी म्हणजे शानचे बाबा हे संगीतकार होते. तर शानची मोठी बहीण सागरिका ही गायिका.

शान १३ वर्षांचा असताना त्याच्या बाबांचं निधन झालं. त्यामुळे शानच्या आईने गायिका म्हणून काम मिळवायला सुरुवात केली. शानला लहानपणापासून घरातूनच संगीत आणि गायनाचे संस्कार मिळाले.

त्यामुळे याच वयात शानने जाहिरातीसाठी ज्या जिंगल असतात, त्या जिंगल्स गायला सुरुवात केली.

१९८९ साली नाना पाटेकर, अनिल कपूर यांची भूमिका असलेला विधू विनोद चोप्रा यांच्या ‘परींदा’ सिनेमातून शान गायक म्हणून प्रथमच सर्वांसमोर आला. या सिनेमात शानने गाण्यातली फक्त एक ओळ गायली. ‘कितनी है प्यारी प्यारी दोस्ती हमारी’ ही ती ओळ होती.

यानंतर शान आणि त्याची बहीण सागरिका या दोघांनी ‘मॅग्नासाऊंड’ या लोकप्रिय रेकॉर्डिंग कंपनीसोबत करार केला.

या करारानुसार Q – Funk हा पहिला अल्बम त्यांनी रिलीज केला. पुढे आर. डी. बर्मन यांच्या गाण्यांवर आधारित ‘रूप तेरा मस्ताना’ हा रिमिक्स अल्बम दोघांनी काढला. या दोन्ही अल्बमच्या लाखो कॉपिज विकल्या गेल्या.

शानला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती त्याच्या ‘तनहा दिल’ या अल्बमने.

२००० साली आलेल्या या अल्बममधील एका गाण्याचं संगीत सोडून बाकी सर्व गाणी शानने संगीतबद्ध केली होती. इतकंच नव्हे तर गाण्याचे शब्द शानच्या लेखणीतून उतरले होते. हा अल्बम हिट झाला.

शान लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला.

त्याच दरम्यान शानची बॉलिवुड मधली कारकीर्द जोरात सुरू होती. ‘दिल चाहता है’, ‘रेहना है तेरे दिल में’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘धूम’, ‘गोलमाल’ पासून अगदी २०१४ सालच्या आमीर खानच्या ‘पीके’ सिनेमापर्यंत अनेक सिनेमांमध्ये शानच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळते.

शानने अनेक इंटरनॅशनल म्युझिक बँड सोबत एकत्र येऊन गाणी गायली आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय असलेला बँड म्हणजे Blue. तसेच २००० ते २००६ साली टीव्हीवरील लोकप्रिय अशा ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचं निवेदन शानने केलं होतं.

शानची अनेक गाणी हिट झाली. त्यापैकी एक गाणं म्हणजे ‘निकम्मा किया इस दिल ने’.

२००२ साली आलेल्या तुषार कपूर, इशा देओल यांच्या ‘क्या दिल ने कहा’ या सिनेमातलं हे गाणं. या गाण्यादरम्यान घडलेला किस्सा. शानची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याला रेकॉर्डिंग करणं जमत नव्हतं. त्याने संगीतकार हिमेश रेशमियाला फोन करून सांगितलं.

शान तेव्हा लोकप्रिय गायक होता. त्यामुळे हिमेशला वाटलं की,

शान उगाच भाव खाऊन रेकॉर्डिंग करणं टाळत आहे.

हिमेशच्या मनातला गैरसमज दूर करण्यासाठी शान त्याला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये भेटायला गेला. शानचा आवाज आजारपणामुळे फाटला होता.

हिमेशला शानचा असा आवाज या गाण्यासाठी योग्य वाटला. त्याने शानला याच आवाजात गाणं गाण्याची विनंती केली.

शानने सुरुवातीला आढेवेढे घेतले. परंतु नंतर संपूर्ण फाटलेल्या आवाजात शानने हे गाणं रेकॉर्ड केलं. हे गाणं सुपरहिट झालं. पुढे जेव्हा शान हिमेशला रेकॉर्डिंग साठी भेटायचा तेव्हा हिमेश शानला तसाच आवाज काढण्याची मागणी करायचा.

संगीतक्षेत्रात नव्या काळात जे बदल झाले आहेत त्याबद्दल शानची स्वतःची अशी मतं आहेत.

एका मुलाखतीमध्ये शान म्हणतो,

“नव्या गायक – संगीतकारांनी कोणतं गाणं लोकप्रिय होईल याचा विचार करण्यापेक्षा कोणतं गाणं पुढे अनेक काळ टिकेल हा विचार केला पाहिजे. समजा तुमचं गाणं ट्रेंड जरी झालं तरी काही काळानंतर लोकं ती गाणी विसरतात. म्हणून आजही जुनी गाणीच रेडिओ वर वाजवली जातात. तुमच्या गाण्यामधला क्लासिकपणा जपणं, हे तुमच्या हातात आहे.”

शानने हिंदी, मराठी, नेपाळी, इंग्रजी, बंगाली, ओरिया, तामिळ, मल्याळम, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. शान केवळ भारतात नाही तर पाकिस्तानात सुध्दा तितकाच लोकप्रिय आहे.

शानने नेहमी स्वतःच्या गायनाकडे लक्ष दिले. त्याची कोणाशीही स्पर्धा नव्हती. असा या शानदार गायकाचं एखादं नवं गाणं लवकरच ऐकायला मिळो, याची सर्वजण आशा करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.