घरच्यांनी शिकवून मेकॅनिकल इंजिनियर बनवलं आणि हा सगळं सोडून बी ग्रेड सिनेमाचा व्हिलन बनला

ऐंशी आणि नव्वदच दशक म्हणजे वेगळाच काळ असायचा. तेव्हाच्या  सिनेमा मध्ये खरी फायटिंग असायची. मिथुन, जग्गू दादा, सनी देओल, अनिल कपूर, सुनील शेट्टी,संजय दत्त असल्या तगड्या हिरोंचा तो काळ. व्हिलन देखील त्यांच्या तोडीस तोड असायचे. अमरीश पुरी, डॅनी, गुलशन ग्रोव्हर, प्राण, रणधीर सारखे व्हिलन दिसले तरी धडकी भरायची.

अशा व्हिलनच्या पाठीमागे पुढे एक चेहरा हमखास दिसायचा. तो काही खूप पहिलवान बॉडीचा, खुंखार डाकू टाईप दिसणारा नव्हता. अंग काठीने अगदी किरकोळ पण चेहऱ्यावर भाव मात्र हवसपूर्ण. तो दात काढून हसायला लागला की थिएटरमधल्या पोरी देखील आपला पदर सांभाळायच्या. रेप स्पेशालिस्ट म्हणून त्याला ओळखलं जायचं.

तो होता शिवा रिनदानी.

मूळचा गुजरातचा. खरं मुकेश रिनदानी. सिंधी कुटुंबात जन्मला. घरचा बिझनेस होता. टिपिकल बेपारी कुटुंब. मुकेश शाळेत हुशार आहे म्हणून घरच्यांनी त्याला शिकवायचं ठरवलं. सगळं घरदार कॉमर्स शिकत होतं आणि याला बारावी नंतर इंजिनीरिंगला घातलं. राजकोटच्या कॉलेजमध्ये गड्याने मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्याच्या अख्ख्या खानदानात कोणीही एवढं शिकलं नव्हतं.

आई वडिलांना वाटलं कि बेटा मुकेश आपल्या घराण्याचं नाव रोशन करेल पण या भिडूच्या डोक्यात वेगळंच चाललेलं. दिसायला गोरा होता, चित्रविचित्र तोंड करून दोस्ताना हसवायचा. कोणी तरी त्याला फुगवलं,

“लगा तू तर हिरो आहेस. पिक्चर मध्ये जायला पाहिजेस. बॉलिवूड मध्ये ट्राय कर.”

बॉलिवूडची मायानगरी त्याच्या स्वप्नात दिसू लागली. आपण पण बच्चन झालोय असं त्याला वाटू लागलं. बेटा मुकेश पेटून उठला. घरच्यांना कसबस समजावलं आणि बोऱ्याबिस्तर उचलून राजकोट वरून थेट मुंबईला आला.

पण मुंबई त्याला वाटलेली, पिक्चर मध्ये दिसते तशी नव्हती. कोट्यवधी लोक लोकलला लटकून स्ट्रगल करत आहेत, बच्चन व्हायचं म्हणून आपल्या सारखे लाखो रोज देशभरातून एंट्री करत आहेत हे त्याला लवकर समजलं. पण गडी मोठा चिवट होता. सिंधी रक्त होतं. प्रोड्युसर च्या ऑफिसमध्ये जाऊन हिरो नही सही कुछ छोटा मोटा रोल सही कुछ तो दे दो अस बार्गेनिंग करू लागला.

साई परांजपे यांच्या फारुख शेख दीप्ती नवलच्या चश्मेबद्दूर नावाच्या सिनेमात पापण्या मिटले तर विसरून जातील एवढ्या सेकंदापुरता दिसला. पण जिद्द हरला नाही. घरचे परत गुजरातला बोलवत होते पण याने नकार दिला. त्याची धडपड सुरूच होती. अखेर शशी कपूर मिथुनदाच्या घर एक मंदिर या सिनेमातून त्याची बोहनी झाली.

व्हिलनच्या गर्दीतला छोटासा रोल त्याला मिळाला. तिथून त्याची गाडी निकल पडी. 

त्याचा पुढचा सिनेमा होता जॅकी श्रॉफ सोबतचा मेरा जवाब. या पिक्चरच्या शुटिंगवेळी त्याची आणि जग्गू दादाची मैत्री जमली. जग्गू म्हणजे भिडूंचा भिडू. अपनी मर्जी का मालिक. कोणालाही कोणत्याही नावाने हाक मारायचा. त्याने आपल्या बेटा मुकेशला नाव पाडलं शिवा. तेव्हा पासून मुकेश रिनदानी हा शिव रिनदानी बनला.

कधी कयामत से कयामत तकमध्ये आमिर खानचा साडू बलवंतसिंग बनला तर कधी रोजा सिनेमा मध्ये वासिम खान. हम सारख्या सिनेमात कॅप्टन झटॅक बनला. खुद्द सुपरस्टार बच्चन, देवमाणूस रजनीकांत, डान्सर गोविंदा यांच्या हातून मार खायचं त्याला भाग्य लाभलं. विशेषतः मिथुन दा बरोबर त्याची जोडी चांगली जमली.

किती जरी झालं तरी सिंधी माणूस. रोल कसा आहे हे पाहण्यापेक्षा पैसे किती मिळत आहेत हे त्याच्या समोर मोठं उद्दिष्ट होतं. व्हिलनच्या रोल मध्ये टाईप कास्ट झाला होताच आता त्याने मोर्चा बी ग्रेड सिनेमाकडे वळवला. खुनी महल, जखमी औरत, सिंदूर और बंदूक, जंगल क्वीन सारख्या सिनेमात दिसू लागला.

त्यात पण हॉरर सिनेमा हि त्याची स्पेशालिटी होती.

तसही कुठल्याही सिनेमात रेप करायचं आणि मार खायचं एवढंच त्याच काम होतं, हिरो मारू दे किंवा भूत काय फरक पडणार होता? पैसे मिळाल्याशी मतलब. त्याने वीस वर्षात तब्बल २०० सिनेमे केले. भारतातल्या सगळ्यात आघाडीच्या हिरो हिरोईन सोबत तो झळकला. पैसे तुफान कमवले. पण कधी साईड व्हिलन पासून में व्हिलन होण्यापर्यंत देखील त्याची प्रगती झाली नाही.

बहुतांश सिनेमात त्याचं नाव शिवाचं असायचं पण या खेरीज मिस्टर झटॅक, कालू तगडा, सफेद घोडा अशी देखील त्याची नावे असायची. मिथुनच्या उटी इंडस्ट्रीचा तो महत्वाचा भाग होता. झी हॉरर शो सारख्या भुताच्या सीरियलमध्ये देखील शिवा चमकत असायचा.

दोन हजारच वर्ष उगवलं तस तस हे बी ग्रेड सिनेमांचे कल्चर कमी कमी होत गेलं. शिवासारख्या अभिनेत्यांचं मार्केटदेखील कमी झालं. २००६ सालच्या महिमा चौधरी सोबतच्या सौतन द आदर वूमन नंतर त्याने निवृत्ती घेतली.

२०१३ साली त्याने आपली दुसरी इनिंग सुरु केली. तो स्वतः दिगदर्शनात उतरला. ते हि त्याची स्पेशालिटी असणाऱ्या हॉरर सिनेमातून. गुलशन ग्रोव्हर, शक्ती कपूर, श्वेता भारद्वाज याना घेऊन रक्त नावाचा सिनेमा त्याने बनवला. याची स्टोरी देखील त्याने लिहिली होती. पण दुर्दैवाने हा सिनेमा चालला नाही. लोकांना वाटलं, आता हा डायरेक्टर बनला तो काय परत अभिनय करणार नाही.

तब्बल दहा वर्षे त्याला कोणतीच ऑफर अली नाही. अखेर २०१७ साली तो परत आला. साऊथ सिनेमांपासून ते टीव्ही सिरीयल पर्यंत सगळीकडे तो दिसतोय.  ‘रूद्र के रक्षक’ या सिरीयल मध्ये त्याने महाकाल चा रोल केला. याशिवाय काली चट्टान, डोंट वरी बी हॅप्पी सहित ७ सिनेमे त्याने साइन केले.

मागच्या वर्षी कँडी ट्विस्ट नावाच्या सिनेमाने त्याने पुन्हा एकदा दिग्दर्शनचा ट्राय करून बघितला, पुन्हा त्यात तो यशस्वी ठरला नाही. आता छोटे मोठे रोल करतोय, निवांत आहे. बच्चन बनायला मुंबईत आला होता, कमीत कमी हमी बडे मिया छोटे मियाँ सारख्या सिनेमात त्यांच्या हातून मार खायचं भाग्य मिळालं हे देखील काही कमी नाही याच समाधानात तो जगतोय.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.