ST कर्मचारी बंगल्यात घुसले चप्पल व दगडफेक : नेमकं काय घडल सिल्व्हर ओकवर..?
एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने आज हिंसक वळण घेतले. दुपारी तीन च्या दरम्यान एसटी कर्मचारी अचानकपणे शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडकले. अचानक आलेल्या या आंदोलकांनी शरद पवार यांच्या घराबाहेर जमून घोषणा देण्यास सुरवात केली.
पोलीस बंदोबस्त कमी असल्याने या आंदोलकांनी बंगल्याचे गेट ढकलून आत घुसण्यास सुरवात केली आणि बंगल्यावर चप्पल व दगडफेक करण्यास सुरवात केली. मोठ्या प्रमाणात जमाव असल्याने या जमावाला समोर जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त अपुरा होता.
दरम्यानच्या काळात आंदोलकांपैकी काही महिला या उष्माघातामुळे बंगल्यासमोरच चक्कर येवून पडल्या. दूसरीकडे सुप्रिया सुळे तातडीने घराबाहेर आल्या व या जमावाला समोर गेल्या. सुप्रिया सुळे हात जोडून माझी तुमच्या सोबत बोलायची तयारी आहे. मी तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी आली आहे. आपण बोलूया म्हणून हात जोडून विनंती करु लागल्या.
जमाव बोलण्यास तयार नसल्याने त्या मी घरी जावून माझ्या आई, वडील व मुलाला भेटून येते असे सांगून बंगल्यामध्ये गेल्या. माध्यमांमधून बातम्या सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गर्दी करण्यास सुरवात केली.
सुप्रिया सुळे पुन्हा घराबाहेर आल्या. दरम्यानच्या काळात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे व सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील मोठ्या पोलीस फाट्यासह सिल्व्हर ओकवर हजर झाले.
सुप्रिया सुळे जमावासमोर जाताच जमावांपैकी काहींनी जय श्रीराम चे नारे देण्यास सुरवात केली तसेच उपस्थित माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी, शरद पवार हाय हाय, एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्येला शरद पवार अजित पवार जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.
पोलीस बंदोबस्तात आंदोलकांना ताब्यात घेवून आझाद मैदानाच्या दिशेने घेवून जाण्यात असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे…
माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत असताना सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलीसांचे आभार मानले आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणतिही अनुचित गोष्ट न करता घरी जाण्याची विनंती केली.
या आंदोलनांमागे कोणाचा चेहरा…?
एसटी कर्मचारी उत्स्फुर्तपणे आले होते की कर्मचाऱ्यांना कोणी भडकवले होते याबाबत चौकशी होईल अस सांगण्यात आलं. उपस्थित पत्रकारांनी आंदोलकांना तुम्ही वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून आला आहात का असा प्रश्न विचारताच त्यापैकी एकाने यात वकिलांचा काही संबंध नाही, ते आमच्यासाठी कोर्टात लढत आहेत अस सांगितलं.
शरद पवारांच्या बंगल्यावरच का आंदोलनासाठी आलात या प्रश्नावर महाविकास आघाडीचे निर्णय तेच घेत आहेत, तेच सरकारचा चेहरा आहेत असा दावा आंदोलनकांनी केला व त्यासाठीच शरद पवारांच्या बंगल्यावर आलो आहोत हे माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केलं.
कोर्टाने आंदोलकांच्या बाजूने निर्णय दिला काल गुलाल उधळण्यात आला आणि आज आंदोलन कसे घडले..?
काल कोर्टाचा निर्णय आल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर गुलाल उधळण्यात आला. कोर्टाने दिलेल्या निर्णयात एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यन्त कामावर रुजू व्हावे, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळावी, ३०० रुपये प्रमाणे ३० हजार कोव्हिड भत्ता मिळावा, अशा प्रकारचे कर्मचाऱ्यांच्या बाजूचे निर्णय देत बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवण्याची गरज आहे असा रिमार्क देखील दिला होता.
यानंतर आंदोलन यशस्वी झाले अशी घोषणा करत गुणरत्न सदावर्ते यांनी गुलाल देखील उधळला तरिही आज या आंदोलनाने हिंसक रुप का घेतले अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कोण काय म्हणाले…?
जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही अतिशय अचानक व दुर्देवी घटना घडली आहे. जेष्ठ नेत्याच्या घरावर असा हल्ला करणं ही काळजीची गोष्ट आहे. यात इटेलिजन्स च फेल्युअर कुठं झालं हे शोधून काढू. यासंदर्भात पोलीस आयुक्त व सह आयुक्तांना सुचना दिल्या आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
काल कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आज अचानक असा हल्ला करणं हे ठरवून केल्यासारखं आहे याच्यामागे कुठलीतरी अज्ञात शक्ती असल्याशिवाय अस घडणार नाही.
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
कुणाच्या घरावर जावून आंदोलन करणं, एकीकडे आंदोलन यशस्वी झालं म्हणून आनंद केला जात होता आणि आज हा हल्ला. हा हल्ला अतिशय दुर्देवी आहे. हे ठरवून झालेलं आहे, हे प्रि प्लॅन्ड आहे अस मला वाटतं. पोलीस तपासात गोष्टी समोर येतील.
- धनंजय मुंडे
माझ्या घरावर जो हल्ला झालेला आहे तो अत्यंत दुर्देवी आहे
- सुप्रिया सुळे
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंकित करणारी ही गोष्ट आहे. हे कृत्य अत्यंत दुर्देवी आहे.
- संजय राऊत.
हे ही वाच भिडू
- शरद पवार अध्यक्ष होतील पण UPA ची ताकद पहिल्यासारखी राहिली आहे का..?
- शरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का?
- सुप्रिया सुळेंना मिळालेला संसदरत्न अवॉर्ड एपीजे अब्दुल कलाम यांच्या डोक्यातली संकल्पना आहे