मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिलेलं गुवाहाटीतलं कामाख्या मंदिर काळ्या-जादुसाठी चर्चेत असतं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार आज गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं आहे. या देवीवर आमची श्रद्धा आहे. म्हणून दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

जादूटोण्यासाठी आणि काळ्या जादूसाठी कामाख्या देवी प्रसिद्ध असल्याच्या अनेक कथा चर्चेत असतात.

या कामाख्या देवीच्या इतिहास, परंपरा आणि प्रथा काय आहेत. हे कामाख्या देवीचं मंदिर आसामच्या गुवाहटीमध्ये आहे. ता देवीच्या मंदिराच्या काही चालीरीती भारतातल्या इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. 

एकीकडे मासिक पाळीतील स्त्रियांना देवपूजा करायला मनाई असते आणि दुसरीकडे कामाख्या देवीचं मंदिर हे असं मंदिर आहे जिथं योनीची पूजा केली जाते.

दरवर्षी आषाढ म्हणजेच जून महिन्यात कामाख्याजवळील ब्रह्मपुत्रा नदी लाल होते. या गोष्टीचा संबंध काही लोकांच्या मान्यतांमध्ये या काळात देवीला मासिक पाळी येते असा देखील लावण्यात येतो. 

या देवीला देवीला पाळी आली कि ३ दिवस हे मंदिर बंद ठेवलं जातं, तीन दिवसात मंदिराचा गाभारा लाल होतो म्हणून देवीचे भक्त देवीच्या पाळीच्या दिवसात देवीच्या योनीची मूर्ती लाल कपड्याने झाकून ठेवतात. मंदिर उघडल्याच्या नंतर भक्तांना ते लाल पाणी प्रसाद म्हणून दिलं जातं जे खूप पवित्र मानलं जातं. पण या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे आढळले नाहीत.

कामाख्या मंदिराची अजून एक प्रथा जरवर्षी चर्चेत येत ती म्हणजे इथं दिला जाणारा प्राण्यांचा बळी.

देवीसाठी दिल्या जाणाऱ्या रेड्याच्या बळीमुळे याआधीही वादंग निर्माण झाले आहेत. प्राण्यांचा बळी देण्याची ही प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे.

याचबरोबर बकरी, कबूतर आणि बदके यांसारख्या प्राणी आणि पक्ष्यांचा बळी देण्याची प्रथा देखील मंदिरात आहे.  बकरी, बदक, कबुतराचे मांस म्हणून मंदिरातून बाहेर पडणारा प्रसाद सर्वाना वाटला जातो. पण म्हशीच्या बलिदानातून मिळणारा प्रसाद डोंगरात राहणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांमध्ये वाटला जातो असं सांगण्यात येतं.

गुवाहाटी शहरात 7,032 हेक्टर राखीव जंगले आहेत आणि ती 14 टेकड्यांवर पसरलेली आहेत. जंगलाच्छादित टेकड्यांवर असंख्य आदिवासी गावं देखील आहेत.

गुवाहाटीमधील टेकड्यांवर राहणार्‍या जमाती म्हणजे बोडो, कचारी, राभा, लालुंग, कार्बी आणि गारो. राज्यातील अनेक जमाती आणि वांशिक गटांमध्ये मांस हे सर्वात प्रिय अन्न म्हणून ओळखले जाते कारण ते त्यांच्यासाठी दूध आणि तृणधान्ये यासारख्या प्रथिनांच्या स्त्रोतांपेक्षा सहजपने उपलब्ध आहे.

२०१८ मध्ये बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा याने देखील या मंदिराला भेट दिली होती तेव्हा त्याने देखील मंदिरात रेड्याचा बळी दिला होता असा आरोप झाला होता. 

त्यावरून गायक झुबीन गर्ग याने मंदिरातील प्राण्यांचा बळी देण्याची मागणी केली होती आणि याला मंदिराच्या पुजाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता.

हे मंदिर प्रथम कधी बांधले गेले याची ठोस माहिती उपलब्ध नाहीये आणि अशी कोणतीही नोंद नाही ज्यावरून हे कळू शकेल की मूळ कामाख्या मंदिर कधी बांधले गेले असावे. काही संदर्भ सांगितले जातात की, मूळ कामाख्या मंदिर चौथ्या-पाचव्या शतकात बांधले गेले असावे. हुसेनशाही घराण्याच्या काही सुभेदारांनी हे  मंदिर पाडल्याचे देखील संदर्भ आहेत. 

तर काही संदर्भ १५१५ ते १६३५ पर्यंत कोच घराण्याने आसामवर राज्य केले होते तेंव्हाचा मिळतो. राजा विश्व सिंग हे पहिले कोच राजा होते त्यांनी कामाख्या मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे काही शिलालेख मंदिरात आढळतात. 

हिंदू पौराणिक कथांमध्ये या मंदिराचे मोठे महत्व आहे. 

काही प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये,कामाख्या हे कालीचे एक रूप असल्याचं बोललं आहे तर काही ग्रंथांमध्ये  कामाख्या ही शिवाची पत्नी सतीचे रूप मानले जाते.

पौराणिक कथेनुसार, शिवाची पत्नी सती हिने आपल्या वडिलांनी आपल्या पतीचा अपमान केला म्हणून संतापात यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली होती. सतीच्या आत्मदहनाने शिवाला खूप दुःख झाले. दुःखाच्या आणि रागात शिवाने जगाचा विनाश व्हावा म्हणून तांडव सुरु केलं. आणि ते थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं.

भगवान विष्णूच्या ‘सुदर्शन चक्राने’ माता सतीच्या शरीराचे तुकडे झाले. सतीच्या शरीराचे अवयव जेथे पडले तेथे तेथे शक्तीपीठे तयार झाली. त्यात देवीच्या शरीराच्या योनीचा भाग आसाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राग्ज्योतिषपूरमध्ये पडली, अशी आख्यायिका आहे.  

आणि म्हणूनच देशातल्या एकूण १०८ शक्तिपीठांपैकी महत्वाचे १८ शक्तीपीठ मानले जातात, त्यातील एक म्हणून या कामाख्या देवीच्या मंदिराला मान आहे. गुहेसारखे दिसणाऱ्या मंदिराचे गर्भगृह हे कामाख्या मातेच्या गर्भासारखे असल्याचे मान्यता आहे. 

विशेष म्हणजे मंदिरात नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे माता देवी किंवा पवित्र योनीची प्रतिमा नेहमी ओलसर असते.

या मंदिरात अनेक सण साजरे केले जातात परंतु अंबुवाची मेळा आणि दुर्गा पूजा हे सर्वात प्रसिद्ध सण असल्याचं मानलं जातं. त्यातला सर्वात प्रसिद्ध म्हणजे अंबुवाची जत्रा. कामाख्या देवीच्या मासिक पाळीच्या दिवशी अंबुवाची उत्सव साजरा केला जातो. या अंबुवाची मेळामध्ये मोठ्या संख्येने भक्त येत असतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.