जावेद अख्तर म्हणत होते यात फ्लॉप होण्याचे सगळे गुण आहेत पण लगान सुपरहिट झाला
बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर सिनेमांचा बोलबाला असतो. हे सिनेमे बक्कळ कमाई करतात, कमाई करणं सोडा पण त्यातही पिरियड फिल्मचा खर्च किती असतो याच गणित त्यांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना चांगलंच माहिती असतं.
ऐतिहासिक आणि पिरियड फिल्म बनवणाऱ्यांच्या यादीत आशुतोष गोवारीकर हे नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. गोवारीकरांनी एक भव्यदिव्य सिनेमा बनवण्याचा ट्रेंड आणला होता. त्यापैकीच एक होता लगान. या लगान बद्दलचा आजचा किस्सा.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान हा किती मोठा ब्लॉक बस्टर सिनेमा होता हे सगळ्या भारताला माहिती आहे. आमिर खानच्या करियरमधला टॉपचा सिनेमा म्हणून सुद्धा लगानकडे बघितलं जातं. पण या सिनेमाचे गीतकार असलेले जावेद अख्तर हे सुरवातीला म्हणाले होते कि,
लगान हा बकवास सिनेमा आहे. हा सिनेमा बनूच शकत नाही याच्या सगळ्या शक्यता त्यांनी आशुतोष गोवारीकर, आमिर खान यांना ऐकून दाखवल्या होत्या.
हा सगळा प्रसंग खुद्द जावेद अख्तर यांनी आमिर खान सोबत असताना एका कार्यक्रमात सांगितला होता. तेव्हा आशुतोष गोवारीकर यांनी सिनेमाची स्क्रिप्ट जावेद अख्तर यांना ऐकवली तेव्हा ते विचारात पडले कि काय स्क्रिप्ट आहे हि, आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये गाणी लिहायची आहेत ? लगानमधलं कुठलंही गाणं घ्या त्यामध्ये १००-१५० लोकं नाचत असतात तर इतक्या लोकांचं एकत्र येणं यावर कुठलं गाणं असू शकतं.
पाऊस येतोय, देवा आम्हाला वाचव हा सगळा प्रकार जावेद अख्तर यांना त्रास देऊन गेला. पण जावेद अख्तर यांनी पूर्ण प्रयत्न केला होता कि काहीही झालं तरी लगान सिनेमा बनला नाही पाहिजे. ज्यावेळी जावेद अख्तर यांनी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा ते आशुतोष गोवारीकरांना म्हणाले कि तू हा सिनेमा बनवतो आहेस म्हणजे असं उदाहरण सेट करतोय कि सिनेमात कुठल्या गोष्टी नको असतात. सिनेमात काय काय नाही करायला पाहिजे.
त्यावेळी गावातल्या सिनेमांना मार्केट नव्हतं लगान गावातला सिनेमा होता. धोतरातला हिरो कोणाला आवडला असता ? पण लगानमध्ये आमिर खान धोतर बंडीत होता. क्रिकेट हा सगळ्यात स्लो गेम आहे तोसुद्धा लगानमध्ये वापरला गेला. तेव्हा ब्रिटिश सिनेमे लोकांना आवडत नव्हते यात ब्रिटिश लोक होते. अशा सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सिनेमात भरलेल्या होत्या.
या सगळ्या गोष्टी जावेद अख्तर यांनी आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या टीमला सांगितल्या. पुढे आमिर खान हिरो असल्याचं जावेद अख्तर यांना कळल्यावर त्यांनी आमिर खानला हा सिनेमा करू नको म्हणून सांगितलं. पण जावेद अख्तर यांच्या सगळ्या शक्यता लगानच्या टीमने सिरीयस घेतल्या नाही आणि सिनेमा शुटिंग करायला सुरवात केली.
या सिनेमाच्या क्रिकेट कॉमेंट्री साठी अगोदर अमीर खान याने अमिताभ बच्चनला विनंती केली होती. पण अमिताभ बच्चन यांनी हे सांगून नकार दिला कि ज्या ज्या सिनेमांना मी माझा आवाज नरेटर म्हणून वापरला आहे ते सगळे सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. शेवटी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा काढता पाय घेतला.
पुढे लगान हा बेस्ट म्युझिकल अल्बम म्हणून पुढे आला. ए आर रेहमानचं संगीत आणि जावेद अख्तर यांचं गीतलेखन यामुळे भरपूर प्रसिद्धी आणि चर्चा लगान सिनेमाची झाली. मिलियनमध्ये लगान सिनेमाचा म्युझिक अल्बम आणि त्याच्या कॅसेटची विक्री झाली. बॉक्स ऑफिसवर लगानने तुफ्फान कमाई केली होती.
एकेकाळी जावेद अख्तरने फ्लॉपचा शिक्का मारलेला हा सिनेमा सगळ्या शक्यतांना नाकारून सुपरहिट झाला होता.
हे हि वाच भिडू :
- सलीम जावेदने जादूची कांडी फिरवली आणि फ्लॉप होणारा सिनेमा सुपरहिट झाला.
- जावेद अख्तरने रागाच्या भरात निम्मं सोडलेलं गाणं समीरने पूर्ण केलं आणि इतिहास घडला
- जावेद अख्तरनीं आपल्या खासदार फंडातली सगळी रक्कम मुंबईच्या नाल्यांवर खर्च केली होती.
- लगान, दिल चाहता है आमिरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले, किरण देखील त्याचा पार्ट होती.