काँग्रेसचं अध्यक्षपद गांधींकडेच राहू शकतंय कारण गांधी सोडून आहेच कोण?

राहुल गांधींची भारत जोडो यात्रेची देशभर चर्चा आहे. आज म्हणजे सात सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा चालेल.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मरगळलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचा राहुल गांधींचा हा प्रयत्न असेल असं या यात्रेबद्दल  सांगण्यात येत आहे. 

१५० दिवस म्हणजे जवळपास पाच महिने ही यात्रा चालेल. 

मात्र या यात्रेचं टाईमिंगसुद्धा इंटरेस्टिंग आहे. १७ ऑक्टोबरला म्हणजे राहुल गांधींची यात्रा जेव्हा मध्यावर आलेली असेल तेव्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. ह्यावेळी काँग्रेसला २४ वर्षांनंतर गांधी घरण्याबाहेरचा अध्यक्ष भेटणार का याच्या देखील चर्चा आहे. 

विशेषतः नाराज G-२३  यासाठी प्रयत्नशील असेल असं सांगण्यात येत आहे. चर्चा अशाही आहेत की गांधी घराण्याने दिलेल्या उमेदवारा व्यतिरिक्त शशी थरूर हे देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरू शकतात. 

पण काँग्रेसला गांधी घरण्याबाहेरचा पक्षाध्यक्ष भेटणार यावर देखील प्रश्नचिन्हच आहे. महत्वाचे म्हणजे जरी भेटला तरी तो काँग्रेस २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकीत फायद्याचा ठरेलच यांची शाश्वती नाहीये. याची महत्वाची कारणं बघायचं झाल्यास तीन महत्वाचे मुद्दे समोर येतात.

पहिलं म्हणजे पंतप्रधानपदाचा उमेदवार

“पुढील ३० ते ४० वर्षे भाजपचा काळ असेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल.” असं वक्तव्य अमित शहा यांनी जुलै महिन्यात हैद्रबादमध्ये झालेल्या भाजप कार्यकारणीच्या सभेत केलं होतं. थोडक्यात भाजपने देशभरात असंच वातावरण निर्माण करण्यास सुरवात केली आहे कि त्यांना इथून पुढे २ ते ३ टर्म कोणी हलवू शकणार नाही.

एवढा कॉन्फिडन्स असणाऱ्या भाजपशी लढून २०२४ मध्येच सत्ताबदल घडवून आणायचा असेल तर त्यानं मोदी वर्सेस हू ? म्हणजेच मोदी नाहीतर कोण? या प्रश्नच एक मजबूत उत्तर एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला द्यावं लागणार आहे.

म्हणजे थोडक्यात मोदींविरोधात एक प्रस्थापित नेतृत्वच पुढं आणावं लागेल.

२०२४ ला केवळ अठरा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असल्यानं काँग्रेसला एक नवीन नेतृत्व निर्माण करणं शक्य नाही. त्यामुळे आता सध्या गांधी फॅमिलीच नेतृत्व जे काँग्रेसने वर्षानुवर्षे मान्य केलं आहे त्यांनाच पुढे करून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणं भाग आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्या वयाचा फॅक्टर लक्षात घेता राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोनच गांधी फॅमिलीतील ऑप्शन काँग्रेसपुढे आहेत.

राहुल गांधींची जवळपास १५० दिवसांची भारत जोडो यात्रा यादृष्टीने एक महत्वाची स्टेप असू शकते. तर  गेल्या काही वर्षांपासून पक्षात ऍक्टिव्ह झालेल्या, अनेक आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या प्रियांका गांधी यांना पुढे करून मोदींविरोधात एक फ्रेश आणि आक्रमक चेहरा काँग्रेसकडून दिला जाऊ शकतो.

यावेळी निश्चितपणे भाजपकडून काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जाऊ शकतोय.

मात्र सत्ताधारी भाजपच्या या आरोपाला तितकीशी धार असेल का? यावर देखील प्रश्नचिन्ह असेल कारण आता दोन टर्मचा लेखाजोखा, त्यावरून होणारे आरोप, अनेक आश्वासने पूर्ण करण्यात आलेलं अपयश या मुद्यांना भाजपाला पहिल्यांदा तोंड द्यावं लागणार आहे आणि हे प्रश्न धारधारपणे विचारण्यासाठी, त्यांची चर्चा देशभर होण्यासाठी हे आरोपही मोठ्या व्यक्तींकडून झाले पाहिजेत. अशावेळी गांधी फॅमिली या इक्वेशनमध्ये परफेक्ट बसते.

अजून एक गोष्ट म्हणजे काँग्रेस अध्यक्षाला फक्त काँग्रेस पक्षालाच नाही तर युपीएला देखील नेतृत्व द्यायचे आहे. 

काँग्रेसची आजची अवस्था पाहता घटक पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाला प्रश्न करू शकतात. याचवेळी जर एक काँग्रेसचा गांधी फॅमिली बाहेरचा नेता जर काँग्रेस अध्यक्ष झाला तर युपीएतील इतर पक्ष त्याचं किती ऐकतील यावरही प्रश्नचिन्ह आहे. यूपीएचं अध्यक्षपद जरी काँग्रेसने इतर घटक पक्षांना द्यायचं म्हटलं तरी काँग्रेसला त्यांची युपीएवरची पकड आणि युपीएमधली बार्गेनिंग पॉवर मेंटेन ठेवण्यासाठी पुन्हा एक मजबूत आणि प्रस्थापित नेतृत्व लागेल जे गांधी फॅमिली देऊ शकते.

दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे 

गांधी फॅमिलीची लीगसी आणि त्यांची काँग्रेस पक्ष बांधून ठेवण्याची क्षमता 

स्वतंत्र्यानंतर काँग्रेसवर नेहरू -गांधी फॅमिलीचाच दबदबा राहिला आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ पक्षाचे नेतृत्व केले आहे.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘नेहरूंना मत हे काँग्रेसला मत’ असा नारा होता. जो पुढच्या काळातही  इंदिरा गांधी, राजीव गांधी ते सोनिया गांधी यांचा चेहरा समोर करूनच काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. आजही काँग्रेसचं नेतृत्व म्हटल्यावर काँग्रेस कार्यकर्ते  सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांचीच नावं घेतात. जेव्हा गांधी घराण्याबाहेरचे नेते काँग्रेसचे नेते झाले तेव्हा त्यांनी देखील त्यांची निष्ठा गांधी घराण्याशीच असल्याचं सांगितलं होतं. 

त्यामुळे काँग्रेस नेतृत्व आणि गांधी फॅमिली हे जवळपास इक्वेशनच झालं आहे. याठिकाणी काँग्रेसच्या इतिहासाचा जवळून अभ्यास करणारे रशीद किदवाई यांची एक कमेंट लक्षात घेण्यासारखी आहे. काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबा बाहेरचा माणूस करू शकतो का? यावर ते उत्तर देतात 

”थेरॉटिकली एस आणि प्रॅक्टिकली नो.”

अजून गोष्ट गांधी फॅमिलीला बांधून ठेवते ते म्हणजे पक्षाला बांधून ठेवण्याची त्यांची क्षमता. 

गांधींचं नेतृत्व उत्तेरत आणि दक्षिणेत अशा दोन्ही ठिकाणी मान्य केलं गेलं आहे. सोनिया गांधी रायबरेली बरोबरच कर्नाटकातील बेल्लारीमधून निवडून आल्या होत्या. राहुल गांधीसुद्धा उत्तर प्रदेशात अमेठीत पराभव झाला तरी केरळमधील वायनाडमधून लोकसभेत पोहचले.

 पक्षात किती गटबाजी असली तरी हायकमांडने दाखल दिल्यास त्यावर तोडगा निघतो असा काँग्रेसचा निर्णय घेण्याचा इतिहास राहिला आहे.

 हायकमांड ही गोष्ट प्रॅक्टिकली विचार केला तर सामूहिक नेतृत्व चालवू शकत नाही आणि अशावेळी एकाच व्यक्ती ज्याचं नेतृत्व पक्षातील सर्व नेत्यांना सर्वमान्य आहे तेच हायकमांड चालवू शकतात. G-२३ मधल्या नेत्यांनी मागणी केलेल्या सामूहिक नेतृत्वाचा ऑप्शनही भारतीय राजकारणात कधी चाललाच नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे. 

त्यामुळे इथेसुद्धा काँग्रेसला गांधी फॅमिलीचीच पुन्हा काँग्रेसला गरज लागते.

शेवटचा पॉईंट म्हणजे ‘टीना फॅक्टर”

TINA( there is no alternative ) म्हणजे दुसरा कोणता पर्यायच नाहीये ही टर्म २०१४ नंतर देशाच्या राजकरणात सारखी चर्चेत असते. देशात नरेंद्र मोदींना दुसरा कोणता पर्यायच नाहीये या संदर्भात ही टर्म वापरली जाते. मात्र काँग्रेसचा विचार केल्यास ही टर्म गांधी घराण्याला लागू होऊ शकते.

गांधी घरण्याबाहेरचा पक्षाध्यक्ष निवडीच्या जेव्हा चर्चा होत आहेत त्यामध्ये अशोक गेहलोत यांचं नाव सर्वात पुढे आहे त्याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक अशी नावं देखील असल्याचं सांगण्यात येतं.

मात्र यातील एक तरी नेता मोदींच्या विरोधात उभा राहील का प्रश्न पडतो.

 मोदी विरुद्ध गांधी हे जे न्यारेटीव्ह आहे त्याची जागा हे नेते भरून काढतील याबद्दल साशंकता आहे. तसेच गेहलोत वगळता वर्षानुवर्षे दिल्लीत रमलेल्या या सर्व नेत्यांचा जनाधार जवळपास नसल्यागत आहे. अशोक गेहलोत यांची देखील राजस्थानबाहेर पकड जवळपास नसल्यागतच आहे.

त्यातच इतर नेत्यांच्या हाती नेतृत्व गेल्यास त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्याला विरोध करू शकतात आणि पक्षात दुफळी माजू शकते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास अशोक गेहलोत केंद्रात गेल्यास सचिन पायलट गेहलोत यांची राजस्थनमधील ताकद कमी करण्याचा प्रयत्न चालू करतील तर गेहलोत पायलट यांचे दिल्लीतून पंख छाटण्याचा कार्यक्रम हाती घेतील.  

याबाबत अजून एक गोष्ट जी काँग्रेसच्या बाबतीत नेहमीच सांगितली जाते ती म्हणजे गांधी घराण्याने जनाधार असलेले नेते कधी काँग्रेसमध्ये जास्त मोठे होऊ दिले नाहीत. 

त्यामुळे शरद पवार, ममता बॅनर्जी हे नेते वेळोवेळी बाहेर पडत गेले आणि दरबारी नेत्याच्या साहाय्यानेच गांधी फॅमिलीने देशाच्या राजकारणाचा गाडा हाकला. त्यामुळे आज गांधी फॅमिलीला टक्कर देईल असा जनाधार असेलेला एकही नेता काँग्रेसकडे नाहीये. त्यामुळे आपोआपच काँग्रेसचं नेतृत्व गांधी फॅमिलीच्या हाती राहतं.

या सर्व कारणांमुळे सध्यातरी काँग्रेसकडे प्रॅक्टिकली बघायला गेल्यास गांधी सोडून दुसरा ऑप्शनच नाहीये आणि जरी गांधी फॅमिलीने दुसरा पक्षाध्यक्ष दिलाच तर काँग्रेस भाजपच्या घराणेशाहीच्या टीकेच्या ट्रॅपमध्ये अडकल्याचं दिसून येऊ शकतं. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.