शीख समुदायात नामदेव महाराजांना खूप मानतात, राष्ट्रपतींचा हा प्रसंगच पुरेसा बोलका आहे

पंढरपुरात तेव्हा संत नामदेव महाराजांच्या जन्मसप्तशताब्दीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांना बोलाविण्यात आले होते.

ग्यानी झैल सिंग यांचा शीख धर्माबरोबर तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ज्यू या सर्व धर्मांचा गाढा अभ्यास होता. संत नामदेवांची भजने गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यांनी देखील अभ्यासली होती.

ग्यानी झैल सिंग जेव्हा पंढरपुरात आले होते त्यावेळी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे तिथे पोस्टिंगला होते.

ग्यानी झैल सिंग यांनी राष्ट्रपतींच्या पंढरपूर दौऱ्यात काय घडले यासंदर्भात आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. 

संत नामदेव हे भारत भ्रमण करीत करीत पंजाबमधील ‘घुमान ‘या गावी गेले होते. भागवत धर्माचा प्रचार करीत तेअठरा वर्षे तेथे राहिले. त्या काळात संत नामदेव खुप लोकप्रिय झाले. पुढे संत नानक यांनी जेव्हा शीख धर्माची स्थापना केली. शीखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहेब आहे. ‘त्याच्यामध्ये नामदेवरायांचे  सुमारे ६१ अभंग आहेत. त्याला पंजाबीत,’ शबद’ असे म्हणतात .

प्रत्येक अभंग विविध रागदारीत गायला जातो. नामदेवांना पंजाबात बाबा नामदेव या नावाने ओळखतात. ग्यानी झैल सिंग यांच्या दृष्टीने बाबा नामदेव हे त्यांना गुरुनानक देव यांच्या इतकेच पवित्र होते. 

ग्यानी झैल सिंग जेव्हा पंढरपूरला पोहचताच विचारणा केली, बाबा नामदेवजी का मंदिर कहा है, हमे उनके दर्शन जाना है. कॅनव्हॉय मंदिराच्या महाद्वारात येऊन पोहोचला. ते अत्यंत उत्साहात गाडीतुन उतरले.

सगळ्या लोकांनी ग्यानी झैल सिंग यांना नामदेव पायरीपाशी आणले.

त्यांनी विचारले, संत नामदेव यांचे मंदिर कुठे आहे ? लोकांनी नामदेव पायरी कडे बोट दाखवून सांगितले की, हेच नामदेव महाराजांचे मंदिर आहे. हे बघितल्यावर त्यांना भयंकर राग आला ते म्हणाले  ‘क्या बाबा नामदेवजी का कोई मंदिर नही बनवाया, तुम लोगों ने’, आणि ते प्रचंड नाराज झाले, व सर्किट हाऊसला परतले.

त्यावेळी ग्यानी झैल सिंग याना समजावुन सांगण्यात आले की, नामदेवरायांनी व त्यांच्याअनेक कुटुंबीयांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. नामदेवराय हे विठ्ठलाचे उच्च कोटीतील भक्त असल्याने, त्यांना असे वाटत होते की, आपल्या मृत्युनंतरही पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी पडावी.

म्हणून मंदिराच्या पहिल्या पायरीशी नामदेव महाराजांनी समाधी घेतली आहे. जेणेकरून भक्तांची पायधूळ त्या पायरीवर पडेल.

अर्थातच नामदेव पायरीवर कोणी पाय ठेवत नाही. नामदेव पायरीला तुळशीपत्र वाहून ती ओलांडून भक्तजन वरच्या पायरीवर पाय ठेवतात व विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ही गोष्ट ग्यानी झैल सिंग यांना सांगण्यात आली तेव्हा त्यांचा राग थोडा शांत झाला. आणि ते मंदिर परिसरात परत आले. त्यानंतर त्यांनी नामदेवरायांच्या पायरीवर डोके टेकवले.

संत नामदेव यांच्या भूमीतून आले म्हटल्यावर घुमानला किती मान मिळतो हे राजेंद्र भामरे यांनी अनुभव सांगितले आहेत. 

२०१५ ला मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे घेण्यात आले. मी अमृतसरला विमानाने गेलो व तेथून कारने घुमान गेलो. तेथे जाताच  झब्बा वगैरे घालावा असे मनी असल्याने फ्रेश होण्यासाठी जागा शोधू लागलो.

तिथे तशी कोणतीच जागा न दिसल्याने एका फर्निचरच्या दुकानात आत शिरलो, मालकाला  म्हणालो,  येथे शर्ट बदलू का? यावर दुकानदारांने  विचारलं, तुम्ही कोठे आला आहात? सांगितले की, साहित्य संमेलनाला आलेलो आहे. त्यावर ते म्हणाले की ‘ऊपर जाव, उपर मेै रहता हूँ, घरमे कोई नही है, आप कपडे बदलके फ्रेश  हो सकते हो’. त्याप्रमाणे  मी कपडे बदलले व फ्रेश झालो. खाली आलो तोवर त्यांनी हॉटेलला चहा सांगून ठेवला होता.

मी नको म्हणताच ते म्हणाले की,’ नहीं नहीं ऐसा कैसा ,आप बाबा नामदेव के यहा आये हो, तो कुछ सेवा करने का हमें भी मौका दो. चहा झाल्यावर नोकराला त्यांनी सांगितले की, भैया को जहॉ बोले वहां मोटार सायकल पर छोड़ के आव. 

मी अवाकच झालो. दुसऱ्या दिवशी मी घुमानच्या जवळ माझा एक मित्र राहात होता त्याच्या घरी मुक्कामाला गेलो .तेथून परत येताना माझी तब्येत अचानक बिघडली, म्हणून मी बस मधुन उतरुन  रस्त्यात एका मेडिकल स्टोअरला गेलो, तेथे औषध, पाण्याच्या बाटल्या, इलेक्ट्रॉल पाकिटे इत्यादी विकत घेतले व मालकाला बिल बनवण्यास सांगितले.

मालकाने बिल बनवता बनवता मला विचारले, ‘आप कहॉ आये हो ? मी त्यांना साहित्य संमेलनाचे नाव सांगताच म्हणाले आप बाबा नामदेव के यहा आये हो हम आपसे बिल नहीं लेंगे, मी खूप आग्रह केला पण त्यांनी बिल तर घेतलंच नाही.

परत मला विचारले यहां से पंधरा किलोमीटरकी दुरीपर घुमान है वहा कैसे जाओगे ,मी म्हणालो की बस मिळेल किंवा एखादी टॅक्सी वगैरे करून जाईन त्यावर ते म्हणाले की यहां पर टॅक्सी वगैरे नहीं है. आणि ते स्वतः दुकानातून खाली उतरले व घुमानकडे जाणारे एका कारमध्ये मला बसवुन दिले. 

माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. काय हा संत नामदेवांचा पंजाबमधील महिमा व तेथील लोकांची श्रद्धा. 

घुमान या गावी बाबा नामदेवांचे मंदिर आहे . तेथेच त्यांची समाधी आहे अशी संपूर्ण पंजाब वासियांची श्रद्धा आहे. वास्तविक संत श्री नामदेवांची समाधी पंढरपुरात आहे.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.