रबरी लिंगावर लावून नाही दाखवायचं तर कंडोम वापरायला कसं शिकवायचं

आपण वयात येत होतो तेव्हा टीव्हीवर एक कंडोमची एक जाहिरात येत होती. त्यातल्या एक कॅरेक्टरला मर्दासारखी कब्बडी खेळ म्हटल्यावर ते ..कंडोम ..कंडोम.. कंडोम.. कंडोम असं म्हणत रेड टाकतं आणि आणि पुढची पूर्ण टीम बाद करतं. आणि मग 

मर्द है तो खुलके बाद करो. जो बोला वही सिकंदर … 

असं म्हणत ती जाहिरात संपते. आता जाहिरात तशी फनी होती. शाळेत पीटीच्या तासाला कब्बडी खेळताना रेड टाकताना आम्हीही जाहिरातीची कॉपी केली. आणि त्यामुळंच अगदी शाळेत असताना आम्हाला कंडोम काय असतं हे कळल्याने खुश.

पण या ज्ञानाचा खरा ‘कस’ निघणार होता जेव्हा थेअरीच्या दुनियेतून प्रॅक्टिकलमध्ये यावं लागणार होतं. आणि अपेक्षेप्रमाणे खऱ्या आयुष्यात जसं शाळेतलं ज्ञान कमी पडतं तसंच इथपण झालं.

त्यात मित्रांनी कुणाला सांगू नको या अटीवर सांगितलेल्या सत्य घटना तुम्हाला पण त्याच अटीवर सांगतो.

रात्री पाक २ वाजता मित्राचा फोन आला होता. झोपेत असल्यानं पार २-३ मिस्डकॉल पडेपर्यंत उचलला नव्हता. पण शेवटी थांबतच नाही म्हटल्यावर रागातच फोन कानाला लावला.

”पश्या ऐक की एक सिन झालाय रे”

” झोपेत फोन उचललाय, काय फालतुगिरी न करता लवकर सांग ”

”पश्या कंडोम फाटला रे…”

त्याचं वाक्य संपायच्या आधीच असलं हसायला आलं विचारू नका. त्याला पुढं काहीतरी सांगायचं होतं पण बालिश बुद्धीचा मी काय हसणं सोडत नव्हतो. शेवटी मी सिरियसली घेत नाही म्हटल्यावर त्यानं फोन ठेवला. त्यानं फोन ठेवला असलं तरी माझं हसणं थांबत नव्हतं.

सकाळी मात्र जेव्हा तो मित्र पुढे आला आणि नीट विषय ऐकला. तेव्हा प्रकरण किती गंभीर आहे ते कळलं. तोंड आल्याचे सिम्प्टम्स टाकल्यावर तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान करणाऱ्या गुगलवर जेव्हा याचं उत्तर शोधलं तेव्हा तर अजूनच विषय गंभीर झाला. त्यात विषय एवढा नाजूक की बाहेर कोणाला सांगायची पंचाईत. शेवटी एका मित्राच्या आरोग्यसेवक असलेल्या पप्पांना विषय सांगितला आणि मग त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तणाव मिटला.

असाच किस्सा झाला होता जेव्हा अजून एका बहाद्दरानं काय रिस्कच नको म्हणत डबल प्रोटेक्शनच्या नावाखाली एकावर एक कंडोम चढवत फजिती करून घेतली होती.

हे दोघंपण आमच्यासारखेच टीव्हीवर कंडोम कंडोम ची जाहिरात बघून ‘मै .. मुझे सब आता है’ च्या अविर्भावात कामगिरीवर गेलेले.

पण हे झालं जे वापरतात त्यांचे किस्से. जे वापरत नाहीत त्यांचं काय. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार 

”९५% भारतीय पुरुष कंडोमच वापरत नाही”

अशी बाब भारत सरकाराच्या २०१८ च्या नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्वे ४ (NFHS -4) मध्ये दिसून आली होती. त्यामुळं मग संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०२८ पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार, असले रिपोर्ट बघून घाबरलेलं सरकार लोकांना पार घरपोच सेवा देऊन इत्यंभूत माहिती देत त्यांना कंडोमचा वापर करायला सांगण्यास पुढे येतं.

आणि सगळ्यात महत्वाचा रोल सांभाळतात आशा वर्कर्स. 

Accredited Social Health Activist म्हणजे आशा कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिलांचं, खेडोपाडी राहणाऱ्या लोकांना आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचवणं हे प्रमुख काम असतं. महिलांना प्रसूतीबद्दलची माहिती देणे, गर्भनिरोध आणि लैंगिक आजारांबद्दल माहिती पुरवणे हे सुद्धा काम आहे हे आशा कर्मचाऱ्यांचा प्रमुख कामांपैकी एक असतं.

आत याच कामासाठी त्यांना देण्यात आलेल्या टूल किटमुळं आशा वर्कर्स हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. 

कंडोमचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सरकारनं रबराची लिंगसदृश्य एक वस्तू आशा वर्कर्सना देण्यात येणाऱ्या टूलकिटमध्ये दिली आहे. यामुळं आशा सेविकांना लैंगिक माहिती अधिक सहजरित्या सांगता येइल असा या टूलकिट मागील उद्देश असल्याचं सांगण्यात येतंय.

यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मात्र अगदी लिंगपिसाट म्हणत सरकारवर टीका केली आहे.

 

यावरच काही माध्यमांनी, ‘खळबळ माजली आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ अशा मथळ्याखाली बातम्या छापल्या आहेत.

मात्र अनेक आशा कर्मचाऱ्यांनी, ‘हा त्यांच्या कामाचाच भाग आहे’ असं म्हणत या विषयाला वेगळं महत्त्व दिलेलं नाही.

बोल भिडूने याबद्दल आशा कर्मचाऱ्यांना याबाबत विचारलं, तेव्हा त्यांनी यामुळं लोकांना निरोधाचं महत्त्व समजवून सांगणं अजूनच सोपं होणार आहे असं सांगितलं. अनेकवेळा आम्ही लोकांना माहिती देताना फक्त माहिती वाचून दाखवायचो; आता मात्र ते प्रत्यक्षरित्या दाखवताही येईल असंही म्हटलं आहे.

तसंच आशा कर्मचारी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीनं आपलं म्हणणं मांडत होत्या. 

अशा साधनांमुळे खजिल व्हायला होणार नाही का? या प्रश्नावर एका आशा कर्मचाऱ्यानं सरळ नाही असं उत्तर दिलं. कारण भरपूर वेळा निरोधाबद्दल माहिती सांगणं हे काम वन टू वन होत असतंय. आशा वर्क्सरचा बऱ्यापैकी संवाद हा स्त्रियांशीच असतो आणि तो ही खाजगीरित्या, त्यामुळे मोकळेपणानं त्यांना सर्व माहिती देता येते.

तसंच भारतासारख्या देशात पुरुष मोठ्या प्रमाणात कंडोम घालण्यास नकार देतात, तेव्हा स्त्रियांनाच यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. अशावेळी अशा साधनांमुळे स्त्रियांना कंडोमच्या वापराबाबत प्रात्यक्षिक दाखवणं सोपं होणार आहे असं ही आशा सेविकांचं म्हणणं होतं.

लेखाच्या सुरवातीला संकटमोचक ठरलेल्या काकांनाही आम्ही याबद्दल विचारलं. तेव्हा काकांनीही असंच मत व्यक्त केलं. फक्त सरकारी नियमांची भीती आहे असं म्हणत काकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. काकांची प्रतिक्रिया होती,

रबरी लिंगावर लावून नाही दाखवायचं तर कंडोम वापरायचं कसं शिकवायचं?

काका पुढे सांगतात अनेकदा कंडोमच्या पाकिटावरही मजकूर हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये असतो, त्यामुळं अनेक पुरुषांनाही कंडोमचा नक्की कसा वापर करावा याबद्दल शंका असतात. त्यामुळे त्यांनादेखील निरोधचा वापर करताना कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत हे सांगण्यासाठी हे टूल महत्वाचं ठरू शकतंय.

म्हणजे या टोटल विषयावरून निष्कर्ष  काय काढायचा असं म्हटलं, तर सरकारनं जो टूलकिटमध्ये रबरी लिंग वाटण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे फायदेच जास्त आहेत. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.