३ हजार, ६५ हजार की लाखो; महामोर्चामध्ये नक्की किती जण सहभागी होते?

१७ डिसेंबरला महाविकास आघाडीनं मुंबईत महामोर्चा काढला, प्रचंड जनसमुदाय उसळला, महाराष्ट्रभरातले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आले, भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी पासून ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत मोर्चा झाला…

शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले या बड्या नेत्यांनी भाषणं केली… भाषणांमध्ये सरकारला टार्गेट केलं, राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी केली आणि मोर्चा संपला…

मोर्चा संपला आणि राजकारण सुरू झालं…

कशाचं राजकारण तर गर्दीचं राजकारण… म्हणजेच मोर्चाला किती गर्दी होती मोर्चात सहभागी झालेल्यांची आकडेवारी काय होती याचं राजकारण…

तर बघुया मोर्चातली गर्दी नेमकी कशी मोजतात? मीडियाकडे गर्दीचा आकडा कुठून येतो, महाविकास आघाडीच्या मोर्चाला नेमकी किती गर्दी झालेली आणि महामोर्चाच्या गर्दीवरून राजकारण का सुरूये…

आधी बघुया नेमकं हे गर्दीचं राजकारण सुरू कसं झालं…

तर, मोर्चा संपल्यावर देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाबद्दल बोलताना मोर्चाचा उल्लेख नॅनो म्हणजेच लहान मोर्चा असा केला. त्यानंतर संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्वीट केला ज्यात मोठा जनसमुदाय मोर्चा करताना दिसतोय आणि त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!’ असं म्हणून टोला लगावला.

ही झाली टीका-प्रतिटीका पण यानंतर भाजपकडून आरोप झाले की राऊतांनी टाकलेला व्हिडीओ हा मराठा क्रांती मोर्चाचा आहे. त्यामुळं राऊतांवर पुन्हा टीकेचा भडिमार सुरू झाला… मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राऊतांवर टीका केली.

फडणवीसांनी ‘तपास केला जाईल’ अशी प्रतिक्रिया दिली.

यावर राऊतांनी

“मराठा मोर्चा ही सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे… महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती…”

असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय खरा पण आता या गर्दीवरून राजकारण बऱ्यापैकी तापलेलं दिसतंय.

आता हे जे काही राजकारण सुरूये त्याला गर्दीचं राजकारण म्हणायला हरकत नाही.

आपण आधी बघुया गर्दीत सहभागी झालेल्यांचा आकडा पोलिस कश्याप्रकारे ठरवतात… तर, याबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली… त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एखादा मोर्चा, रॅली किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या एकूण नागरिकांची संख्या मोजण्यासाठी पोलिस डेन्सिटी बेस्ड् काऊंटींग या पद्धतीचा वापर करतात

डेन्सिटी बेस्ड् काऊंटींग म्हणजे काय तर…

घनतेवर आधारित हा फॉर्म्युला आहे. ज्या ठिकाणी मोर्चा आहे त्या ठिकाणची एकूण क्षमता किती आहे आणि त्यापैकी किती क्षमता व्यापली गेलीये किंवा मग पूर्ण क्षमता भरली असेल तर, त्या ठिकाणी नागरिकांची घनता पाहून अंदाजे एक आकडा ठरवला जातो.

मग ही आकडेवारी पोलिस स्वत: जाहीर करतात का? तर नाही… मुळात पोलिस ही जी आकडेवारी काढतात ती मीडियासाठी किंवा पब्लिक डॉमेनमध्ये जाहीर करण्यासाठी नसतेच. ही आकडेवारी काढल्यानंतर पोलिस ती थेट गृहमंत्रालयाला पाठवतात. अशी माहिती निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

मग, मीडियामध्ये दाखवतात ती आकडेवारी कोणती असते?

हा प्रश्न सहाजिकच येतो. त्याचं उत्तर आहे सूत्र. म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा आकडा अमूक अमूक आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे, फक्त महाविकास आघाडीच्याच मोर्च्याबद्दल नाही तर, कोणत्याही मोर्चा किंवा आंदोलनातील मीडियामध्ये दाखवलेला आकडा हा पोलिसांनी दिलेला अचूक आकडाच असेल याबाबत खात्री देता येत नाही.

त्यामुळे १७ तारखेच्या मोर्चाला किती गर्दी झालेली या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येणं शक्यच नाही. पण, काही मीडिया हाऊसेसने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही ६५,००० इतकी आहे. पण, पुन्हा एकदा पोलिसांनी स्वत: ही आकडेवारी जाहीर केली नसल्यानं ती पूर्णपणे विश्वासार्ह नाही.

याच आकडेवारीवरून महाविकास आघाडीकडून मात्र सरकारवर निशाणा साधला जातोय.

मीडियामध्ये आलेली ही ६५,००० ची आकडेवारी ही गृहमंत्री देवंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर पोलिसांनी दिलीय असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. मिटकरींनी असाही दावा केलाय की, महाविकास आघाडीच्या महामोर्चाला तब्बल दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झालेले.

नवनीत राणांचा अजब दावा…

तर याऊलट अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी तर, महामोर्चाला फक्त तीन हजारांचीच गर्दी जमलेली असा दावा केलाय. “महाविकास आघाडी कडून काढण्यात आलेला महामोर्चा नसून हे नौटंकी मोर्चा आहे. ठाकरे सरकार गुंडशाही सरकार होतं” अशी टीकाही राणांनी केली.

आता फडणवीसांचं वक्तव्य असेल, राऊतांचं ट्वीट असेल, मीडियामधली आकडेवारी किंवा मग मिटकरींचा दावा असेल. हे सगळं सुरूये ते गर्दीच्या राजकारणासाठी. बरं ही गर्दी जास्तीत जास्त होती असं दाखवण्याचा प्रयत्न का केला जातो तर मोर्चा, रॅली, आंदोलनं या गोष्टी जितक्या सरकारला प्रश्न विचारण्यासाठी केल्या जातात तितक्याच शक्ती प्रदर्शनासाठीही केल्या जातात आणि जितकी जास्त गर्दी तितकी जास्त शक्ती हे समीकरण तर आहेच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.