या पाकिस्तानी गावकऱ्यांनी केलय भारताच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान.

भाऊबंदकी कोणालाही सुटली नाही. आपल्या देशाला पण. पाकिस्तान नावाचा आपल्या बांधाशेजारचा भाउबंद गेली अनेक वर्ष आपल्या कुंडलीवर राहू बनून बसला आहे. याच्याबरोबरच्या भांडणात दोन्ही घराचं बरच नुकसान झालय. आपल्याला या भांडणाचा खर्च सोसण्याची ऐपत तरी आहे. पण ते रीन काढून सन साजरा करणारं अडेलतट्टू पाकिस्तान रस्त्यावर यायची पाळी आली तरी रोज काय ना काय तर विषय घेऊन भांडण काढतंय.

 क्रिकेटपासून अणुबॉम्ब बनवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपले वाद जगजाहीर आहेत. या दोन्ही भावांच्या भांडणात चीन, अमेरिका, रशिया ही बाहेरची माणस लई इंटरेस्ट घेऊन मजा बघत बसत्यात.

असो. आपण आता पर्यंत पाकिस्तानला बऱ्याचदा टोला दिला आहे. पण ते काय कधी सुधरत नाही. पाकिस्तानचं नाव जरी काढलं तरी आपल्यातल्या प्रत्येकाचं देशाभिमानी रक्त रागान खवळत. पण आपल्या पैकी किती जणांना ठाऊक आहे की आता सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या गावकऱ्यांनी पण मतदान केलंय.

लगेच छप्पन इंची छाती फुलवू नका. कारण हे पाकिस्तान म्हणजे ते नाही . हे आहे भारतातलं पाकिस्तान !!

श्रीनगर तालुक्यात आहे पाकिस्तान टोला. आता तुम्ही म्हणणार बरोबर आहे त्या फुटीरतावादी काश्मीर मध्ये हायच पाकिस्तान आम्ही whatsapp फोरवर्ड मध्ये वाचलं होतं. पण भावानो ते नव्हे. आम्ही सांगतोय ते पाकिस्तान आहे बिहार मध्ये.

पूर्णिया जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळपास ३० किलोमीटर वर आहे श्रीनगर प्रखंड या तालुक्यात आहे पाकिस्तान टोला .

या पाकिस्तान टोला मध्ये आणि खऱ्या पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी कॉमन आहेत. आपल्या पैकी काही हिरव्या काविळीने पिवळ्या झालेल्या दोस्तांच्या मनात पाप येणार तर तुम्हाला म्हणून सांगतो या गावात एक ही मुसलमान नाही. सगळे हिंदू आहेत. या गावात आणि पाकिस्तान मध्ये साम्य हे आहे की स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरी या दोन्ही ठिकाणी विकास पोहचलेला नाही.

होय. ऐकून आश्चर्य वाटेल शाळा हॉस्पिटल राहिलं लांबच अजूनही या गावात रस्तादेखील नाही.  

गावाची लोकसंख्या जवळपास १२०० आहे. यापैकी ३५० लोकांचं नाव मतदार यादीत आहे. सगळे संथाळ आदिवासी. त्यांच्याकडे नेते मोठे नेते मत मागायला येतात पण विकासकामे काही तिथे पोहचत नाहीत. काय कारण आहे माहित नाही. मुलांना शाळेला जायचं म्हटल तरी गावात साधी अंगणवाडी नाही. कोणी आजारी पडलं तरी प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. आजारी माणसाला उचलून लांब दहा बारा किलोमीटर दवाखान्यात घेऊन जावे लागते.

106380655 pakistantolakasarkariboard
सौजन्य- बीबीसी

या गावात आज जर आपण गेलो तर तिथे फक्त आणि फक्त गरिबी दिसेल. आज इंटरनेटच्या जमान्यात जग कुठल्या कुठे पोहचले आहे पण पाकिस्तान टोलामध्ये अजूनही टीव्ही पोहचलेला नाही आहे मोबाईल, ४जि वगैरे तर त्यांनी स्वप्नात देखील बघितलेलं नाही.

कोणाला विचारलं की तुमच्या गावाची अशी परिस्थिती का? तर तो गावकरी सांगतो,

“हमारे गांव का नाम पाकिस्तान है इसीलिये कोई हमारी मदद नही करता.”

पण या गावाचं नाव पाकिस्तान टोला पडलं तरी कसं?

सोळाव्या शतकात म्हणे पूर्वी इथून कोसी नदी वाहत होती. अतिशय सुपीक असं हे खोर होतं. नदीच्या तीरावर कापडाचा मोठा बिझनेस चालायचा.  पण काही कारणाने नदीच पात्रच गायब झालं. इथली सगळी गाव निर्मनुष्य झाली. जंगले वाढली.

जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा बंगालची सुद्धा फाळणी झाली. पुर्व बंगालला पुर्व पाकिस्तान म्हटल जात होतं. तर या पुर्व पाकिस्तान मधून काही कुटुंब तिथल्या दंग्यांना कंटाळून बिहारमधल्या या जंगलात राहायला आली. त्यांनी जंगले साफ केली आणि हा गाव वसवला. याच पुर्व पाकिस्तानच्या लोकांमुळे गावाला पाकिस्तान टोला म्हणल जाऊ लागलं. गावात आदिवासी संथाली लोकही राहायला आले. शेतीवाडी करू लागले.

पुढे जेव्हा इंदिरा गांधीनी पाकिस्तानपासून बांगलादेश तोडला तेव्हा ही बंगाली कुटुंबे आपल्या गावी परत निघून गेली. इथे उरली ती फक्त बिहारी अदिवासी संथाळ. 

आणखी एक सांगतो. भारतातल्या सर्वात जुन्या असलेल्या या पूर्णिया जिल्ह्यात फक्त पाकिस्तान टोला नाही तर तिथे असे अनेक टोला आहेत.  इथे श्रीनगर आहेच शिवाय लंका टोला, बंगाली टोला, शरणार्थी टोला, युरोपियन कॉलोनी,सिपाही टोला आहे. याच्या शेजारच्या अररिया जिल्ह्यात इराणी बस्ती सुद्धा आहे.  पण मिडिया मुळे प्रसिद्धी पाकिस्तान टोलाच्याचं वाट्याला आली आहे.

नुकताच पाकिस्तान टोलावाल्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानात भाग घेतला. फर्स्टपोस्ट या वृत्तसंस्थेशी बोलताना गुंथूर मुरुमुर नावाच्या पाकिस्तान टोलाच्या गावकऱ्याने मागच्या वेळी मोदींना मतदान केलेलं म्हणून सांगितलं.पण यावेळी कोणाला मतदान केलं हे सांगायला ते तयार नाहीत. यावेळी मिडियाने दिलेल्या प्रसिद्धीमुळे आता तरी विकास येईल अशी अपेक्षा तिथले गावकरी करत आहेत. बघू या पाकिस्तानचा तरी विकास होतोय का ते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.