या पुणेकर माणसाने “ताजमहल नव्हे तेजोमहल” हे पिल्लू सोडून दिलं…
देशात जनता पक्षाचं सरकार आलं होतं. पुढे कट्टर हिंदूत्व धारण केलेले लालकृष्ण अडवाणी तेव्हा माहिती व प्रसारण मंत्री होते. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. माणूस क्लास वन ऑफीसर. त्यात कुठे कुठे संपादक वगैरे राहिलेला. जून्या काळात आझाद हिंद सेनेचा सैनिक, बर नुसता सैनिक नाही तर सुभाषबाबुंच्या सोबत एकत्र राहिलेला व्यक्ती. असा माणूस भेटायला आला की त्याला वेळ देणं क्रमप्राप्त असायचं. असाच वेळ तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री लालकृष्ण अडवाणींनी त्यांना दिलेला.
ठरल्याप्रमाणे बैठक झाली, बोलणी झाली आणि तो व्यक्ती म्हणाला,
ठिक आहे पण ताजमहल हा हिंदू राजाने बांधलेली वास्तू आहे असा काही इतिहासकारांनी दावा केलेला असून त्याबद्दल संशोधन सुरू आहे अस तर तुम्ही बातमीपत्रात सांगा….
यावर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,
असलं काहीही आम्ही करणार नाही, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत..
असाच एक दूसरा प्रसंग…
खुशवंतसिंग अटलबिहारी वाजपेयींची मुलाखत घेत होते. मुलाखतीत खुशवंतसिंग यांना वाजपेयींना प्रश्न केला. पु. ना. ओक यांच्या संशोधनाविषयी तुमचं काय मत आहे..?
यावर जराही वेळ न घालवता वाजपेयी म्हणाले,
आम्हाला त्यांची मते मान्य नाहीत…
वरच्या दोन्ही किस्स्यांमधून तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल की विषय ताजमहलचा आहे. पुन्हा एकदा ताजमहल का तेजोमहल हा विषय चर्चेत आला आहे. साहजिक विषय चर्चेत आली की आठवण येते ती पुण्यातल्या या माणसाची…
या माणसाने ताजमहल नसून तेजोमहल हा सिद्धांत मांडला, खरतर याला पिल्लू सोडणं म्हणावं लागेल. या माणसाचं नाव पु.ना. ओक अस्सल पुणेकर असा हा माणूस. त्यांनीच लोकांना अजून कामाला लावलं आहे…?
सर्वांत पहिल्यांदा ताजमहल हे हिंदू धर्माच तेजोमहल आहे हा सिद्धांत मांडणारे व्यक्ती म्हणून ओक ओळखले जातात. फक्त ताजमहल या विषयावर त्यांचे सिद्धांत थांबले नाहीत तर ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनिती, सौदी अरेबियात विक्रमादित्याची सत्ता, अजपती वरून इजिप्त, अंगुली वरून इंग्लड अशा विविध संकल्पना त्यांनी मांडल्या होत्या…
तर हे पु.ना.ओक कोण होते…?
पु.ना. ओक यांच्या थेअरी ऐकून तुम्हाला ते कोणीतरी साधे गृहस्थ वाटत असतील, प्रसंगी चेष्टा देखील करु वाटेल पण त्यांची एकंदरित कारकिर्द पाहील्यानंतर चेष्टेपुरता त्यांचा विषय घ्यावा अस नक्कीच नाही.
पु.ना.ओक यांचा जन्म इंदोरचा. १९१७ सालचा. आग्रा येथून ते एम.ए झाले. नंतर वकिली करुन ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्रोफेसर झाले. दूसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ते लष्करात भरती झाले. इथे ते अधिकारी होते. पुढे जपान्यांनी जे युद्धकैदी केले त्यामध्ये ओक होते. या युद्धकैद्यांची सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना निर्माण केली आणि ते या आझाद हिंद सेनेचा भाग झाले.
आझाद हिंद सेनेसोबत त्यांनी अनेक कारवाया केल्या. आझाद हिंद सेनेच्या व्हिएतनाममधील फ्री इंडिया रेडीओचे ते संचालक होते. या दरम्यान नेताजींच्या ऑफीसमध्येच ओक बसत असत. यावरूनच त्यांचा आवाका लक्षात येतो. ओक प्रत्यक्ष मैदानात देखील सक्रीय होते. दूसरे महायुद्ध संपले त्या काळात ओक आपल्या सहकार्यांसोबत कलकत्ता जवळ येवून पोहचले होते.
त्यानंतर ओक दिल्लीत राहू लागले. स्वतंत्र भारतात ते हिंदूस्थान टाईम्स व स्टेट्समन या दैनिकांच्या संपादक विभागात काम करत, पुढे केंद्र सरकारच्या माहिती व नभोवाणी मंत्रालयात ते क्लास वन ऑफिसर म्हणून कार्यरत राहिले.
निवृत्तीनंतर ते युनायटेड स्टेट्स इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक म्हणून काम करू लागले. या काळात इतिहास संशोधन करुन वेगवेगळे सिद्धांत मांडू लागले.
याच दरम्यान त्यांनी ताजमहल नव्हे तेजोमहलचा सिद्धांत ११८ पुरावे देवून सादर केला. त्यांनी त्यांचा हा प्रबंध ऑल इंडिया हिस्ट्री कॉंग्रेसच्या १९६३ च्या अधिवेशनात मांडला. तिथून जी चर्चा सुरू झाली ती आजतागायत चालू आहे.
त्यांच्या मते ताजमहल मध्ये एकूण सात मजले आहेत तर एकच मजला उघडा का? लोकांसहीत अभ्यासकांना देखील तिथे का जावून दिले जात नाही. जे बांधकाम करून खोल्या बंद करण्यात आल्या त्या इंग्रजांनी केल्या. ताजमहलमध्ये मूर्ती, हिंदू सजावट कशाला. त्यांच्या मते कार्बन टेडिंग केल्यानंतरही ही बिल्डिंग किती जूनी याचा अंदाज बांधता येवू शकतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरी मांडून त्यांनी सातत्याने तेजोमहलचा दावा मांडला. मात्र सत्तेत कॉंग्रेस असो की भाजप दोन्हीही पक्षांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत त्यांना उडवून लावल्याचं दिसतं. या सर्व गोष्टींवर त्यांनी एकूण चौदा पुस्तके लिहली. सध्याचे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुरातत्व विभागाने देखील २०१७ मध्ये त्यांचा तेजोमहलचा सिद्धांत फेटाळून लावला.
हे ही वाच भिडू.
- ना हिंदूंचा, ना मुस्लीमांचा. ताजमहल तर इटलीचा..? काय आहे ही थेअरी
- आग्र्याच्या ताजमहालचा वापर मराठयांनी घोड्याचा पागा म्हणून केला होता.
- ताजमहल विकणाऱ्या नटवरलालनं न्यायाधीशांना मात्र एक रुपयालाच फसवलं.
- इंग्रजांनी २ लाखात ताजमहल विकला होता, पण पुढे एक घोळ झाला.