रंगभूमीवर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा विनय आपटेंसारखा जिगरबाज माणूस धावून यायचा…
धमाल सिनेमा बऱ्याच लोकांनी किंवा असेल त्याच्या प्रत्येक सीनबद्दल तुम्हाला माहित असेल एक सीन होता बघा जेव्हा आदि आणि मानवला गोव्याला जायचं असतं तेव्हा एक साऊथ इंडियन माणूस भेटतो मुत्तुस्वामी वेणूगोपाल अय्यर आणि नंतर तो त्याचं नाव इतकं मोठं सांगतो की पोट दुःखेपर्यंत माणूस हसत राहतो. तो सीन आजवरच्या कॉमेडी सीन्सपैकी एक डेंजर सीन मानला जातो. तो मुत्तुस्वामीचा रोल केला होता एका मराठी माणसाने ते होते मराठी रंगभूमीवरचे प्रसिद्ध नट विनय आपटे.
नाटकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले मच्छिंद्र कांबळी यांच्यासाठी केलेल्या अफलातून या नाटकाद्वारे विनय आपटे यांनी महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर, सुनील बर्वे यांना रंगभूमीवर आणले आणि मराठी इंडस्ट्री अजूनच पावरफुल केली. अजूनही विनय आपटे यांची आठवण लोकांच्या मनातून जात नाही हीच त्यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल. पण त्यांच्या एकूण कार्याचा विस्तार बघितला तर कळून येते की हा किती मोठा माणूस होता.
आपल्या आवाजाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान मिळवलं. रंगभूमीवर त्यांच्या योगदानाबद्दल या सगळ्याच लोकांना आदर आहे आज आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया. 17 जून 1951 रोजी मुंबईत विनय आपटे यांचा जन्म झाला. भारदस्त आवाज, थेट भिडणारी नजर, सहज अभिनय ही विनय आपटे यांची ओळख. रंगभूमी, मालिका, चित्रपटांत वावरणाऱ्यांच्या ‘आपटे स्कूल’चे प्रणेते म्हणजे विनय आपटे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या विनय आपटे यांची सुरुवात झाली ती सत्तरच्या दशकात कॉलेजच्या रंगभूमीवर.
विनय आपटे यांच्या पुंडलिक शेट्टीवार, कुल वृत्तांत, अपुरी या एकांकिका गाजल्या. १९७२ साली त्यांचे दूरदर्शनच्या पडद्यावर आगमन झाले आणि रसिकमान्यतेची शाबासकी मिळवली. ‘गजरा’ची संकल्पना हिट झाली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्याहीपेक्षा गाजल्या त्या त्यांच्या लघुनाटिका.
विनय आपटे यांनी सुरुवातीला ‘भूमिका’ आणि कालांतराने ‘गणरंग’ या नाट्यसंस्था उभ्या केल्या. नाट्यकर्मी हे बिरुद खऱ्या अर्थाने सार्थ केलं. मित्राची गोष्ट, घनदाट, सवाल अंधाराचा, कुसुम मनोहर लेले, मी नथुराम गोडसे बोलतोय.. अशी एकापेक्षा एक नाटके त्यांनी केली. पार्ल्यातील त्यांच्या ‘गॉसिप ग्रुप’ने अनेक प्रायोगिक नाटके केली. आभाळमाया या मालिकेने मराठीत महामालिकांचा सिलसिला सुरू झाला.
त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जाणवायचा तो स्पेशल आपटे टच. कलाकर्मीने कोणतीही भूमिका अत्यंत समरसून कशी करायला हवी, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे त्यांनी केलेल्या भूमिका. स्वतः दिग्दर्शनामध्ये आत्यंतिक रस असूनही अरुण नलावडे या सहकारी मित्राने दिग्दर्शित केलेल्या ‘रानभूल’ नाटकात त्यांनी अप्रतिम अभिनय साकारला. एकांकिका, प्रायोगिक, हौशी, व्यावसायिक अशा सर्वच रंगभूमीवर काम केलेल्या आपटे यांनी मालिका आणि चित्रपटांमध्येही वेगळेपणा कायम राखला.
मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही त्यांनी केलेल्या भूमिकांमध्ये त्यांच्या अभिनयाचा सकस पोत होता. सत्याग्रह, एक चालीस की लास्ट लोकल, आरक्षण, इट्स ब्रेकिंग न्यूज, प्रणाली ही त्यांची काही उदाहरणे. नाटक व सिनेमामधील दिग्दर्शनाइतकाच त्यांच्या कामाचा पैस सिमित नव्हता, तर ‘अॅडिक्ट’सारख्या जाहिरात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नावाजलेल्या जाहिरातींचे दिग्दर्शन केले.
तंत्रज्ञानामध्ये वेगाने होत असणारे बदल रंगकर्मींना कळायला हवेत, यासाठी ते कायम आग्रही राहत. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यवाहपदाचा कारभारही त्यांनी दीर्घकाळ पाहिला. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना अमाप उमेद आणि प्रोत्साहन देण्यात ते तप्तर असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा पहाडी आवाज हे वैशिष्ट्य. दृकश्राव्य माध्यमांमध्ये स्वतःची जागा तयार करीत असताना त्यांनी आवाजाच्या या गुणवैशिष्ट्यांचाही नेमका वापर केला. आपल्या तत्त्वांसाठी आग्रही असणाऱ्या आपटेंना गुरुस्थानी मानणारे त्यांचे अनेक शिष्य केवळ चित्रसृष्टीतच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेले आहेत.
7 डिसेंबर 2013 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. ज्या ज्या वेळी रंगभूमीवर संकट आली तेव्हा तेव्हा विनय आपटे खंबीरपणे उभे होते. फॉरेनची पाटलीण, जोगवा यामध्ये विनय आपटे यांनी केलेला अभिनय म्हणजे न विसरण्याजोगा आहे. पण विनय आपटे जास्तीत जास्त रंगभूमीवर राहिले आणि 40 वर्षे ते सतत कार्यरत होते हे तितकंच विशेष.
हे ही वाच भिडू :
- मराठी रंगभूमीवर पहिली स्त्री नाटककार होण्याचा मान हिराबाईंना जातो….
- मराठी नाटकांचा ओरीजनल शो मॅन म्हणून सुधीर भट ओळखले जायचे….
- कर्नाटकचा हा नेता पंतप्रधानपदाची तयारी करत होता, देवेगौडांनी नंतर येऊन बाजी मारली..
- कर्नाटकातल्या अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरात पूर येतो, हे खरं आहे का ?