जिनिव्हा करारामुळे भारतीय पायलट अभिनंदन यांची सुटका होणे खरोखर शक्य आहे का?

भारत पाकिस्तान सीमेवरील स्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. आज पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास गेलेल्यापैकी एक भारतीय मिग २१ विमान पाकिस्तानी भूमीवर बेपत्ता झाले. पाकिस्तानने दावा केला की या विमानाचा पायलट  अभिनंदन वर्थमान हा आमच्या ताब्यात आहे. त्यांनी त्याचा एक व्हिडीओ सुद्धा रिलीज केला.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे अधिकृतरित्या मान्य केले की एक भारतीय लढाऊ विमान आणि त्याचा वैमानिक गायब झाला आहे.

यानंतर व्हिडिओच्या सत्यासत्यतेबद्दलच्या चर्चेस सुरवात झाली. जर विंग कमांडर अभिनंदन खरोखर पाकिस्तानच्या ताब्यात असतील तर काय? हा प्रश्न उभा राहिला.

याच दरम्यान एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांचे एक ट्विट सध्या व्हायरल झाले आहे. यात त्यांनी पाकिस्तानला जिनिव्हा कन्वेन्शनच्या तिसऱ्या कलमाची आठवण करून देऊन कैदेत असलेल्या भारतीय पायलटला मानवतेची वागणूक दिण्याचे कर्तव्य पार पडले पाहिजे असे म्हटले आहे.

यावरूनच सध्या जिनिव्हा कन्वेन्शन म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना सतावत आहे आणि या करारानुसार खरोखर अभिनंदन वर्थमान यांची सुटका होऊ शकते का?

आत्तापर्यंतचा जगातला सर्वात भीषण युद्ध म्हणजे १९३७ ते १९४५ दरम्यान लढले गेलेले दुसरे महायुद्ध. या महायुद्धानंतर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. करोडो लोकांवर या युद्धाचा परिणाम झाला. या महायुद्धानंतर अशी वेळ पुन्हा जगावर येऊ नये यासाठी काही करार करण्यात आले त्यापैकी सर्वात महत्वाचा करार म्हणजे १९४९ सालचा जिनेव्हा करार.

जिनिव्हा करार मुख्यतः युद्धकाळातील तह , जखमी झालेले सैनिक व युद्धकैद्यांचे मुलभूत अधिकार याबद्दलचे नियम स्पष्ट करतो. आजवर जवळपास १९६ देशांनी या करारावर सही केली आहे. यात भारत पाकिस्तान हे दोन्ही देश असून आपल्याला जिनेव्हा कराराचे पालन करणे बंधनकारक आहे.

काय आहे जिनिव्हा कराराचा तिसऱ्या कलाम?

  • युद्धात सहभागी नसलेले नागरिक , जखमी झालेले अथवा शस्त्र खाली ठेवलेले सैनिक यांना मारता अथवा जखमी करता येणार नाही. त्यांच्याशी विरोधी राष्ट्राने माणुसकीने वागवले पाहिजे.
  • जखमींवर योग्य उपचार झाले पाहिजेत. त्यांच्या जीविताचे रक्षण झाले पाहिजे.
  • युद्धकैद्यांना धमकावले जाता येणार नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून आपली ख्याली सांगण्याचा अधिकार दिला आहे.
  • युद्धकैद्यांवर खटला चालवला जाऊ शकेल अथवा त्यांना योग्य न्यायिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांना कोणतीही शारीरिक अथवा मानसिक यातना देता येणार नाही.

यासाठी काही नियम ही सांगितले जातात.

शत्रू देशातील सैनिक जर सापडला तर तो आपल्या पूर्ण गणवेशात असावा(अंडर कव्हर असू नये), त्याने विचारल्यावर आपले नाव, आपला हुद्दा सांगावा. हे जर नियम त्या सैनिकाने पाळले असतील तर जिनेव्हा करारानुसार त्याच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे विरुद्ध देशाला अनिवार्य आहे.

जो देश या करारावर सही करूनही या कलमांचे पालन करत नाही त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी कारवाई करण्यात येते.

पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय पायलटनी आपले नाव अभिनंदन वर्थमान, हुद्दा विंग कमांडर आणि सर्विस नंबर २७९८१ इत्यादी गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. यामुळेच पाकिस्तानने ते जिनेव्हा कराराच्या तिसऱ्या कलमानुसार त्यांना माणुसकीने वागवणे अपेक्षित आहे.

भारतसरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पाकिस्तानच्या ताब्यात असलेले पायलट हे अभिनंदन वर्थमान हेच आहेत हे मान्य केले आहे आणि त्यांनी पाकिस्तान कडे अभिनंदन यांच्या सुरक्षितपणे सुटकेची मागणी देखील केली आहे.

यापूर्वी देखीलं कारगिलच्या युद्धावेळी नचिकेता हे भारतीय पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते त्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली होती. यावेळी सुद्धा तसेच घडावे व विंग कमांडर अभिनंदन वर्थमान सुखरूपपणे भारतात परतावेत अशो प्रार्थना संपूर्ण देशातील नागरिक करत आहेत.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.