ही करणी सेना नक्की काय करते ?

चित्रपटांमधून, कोणत्या राजकारण्यांकडून किंवा कोणाकडूनही हिंदू भावना दुखावल्या की, लढण्यासाठी अनेक संघटना तयार झाल्या आहेत. म्हणजे अगदी लीगल नोटीस पाठवणं, कायदेशीर कारवाई करण्यासाठीची तयारी करणं, न्यायालयात लढा लढणं इथपासून ते रस्त्यावर उतरून तोडफोड करायलाही या संघटनांचे कार्यकर्ते तयार असतात.

त्यापैकीच एक म्हणजे ‘करणी सेना’

ही करणी सेना सगळ्यात आधी चर्चेत आली ती २०१८ साली पद्मावत या चित्रपटाच्या वेळेस. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जातोय असं म्हणतं करणी सेना थेट चित्रपटाच्या सेटवरच घुसली होती. संजय लीला भन्साली दिग्दर्शीत हा चित्रपट अतिशय महागडा आणि खर्चिक प्रोजेक्ट होता.

या चित्रपटाच्या सेटवर घुसून करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. आणि त्यावेळी मग करणी सेना नावाची संंघटना अस्तित्वात आहे आणि ती आक्रमकही होऊ शकते हे सगळ्यांच्या लक्षात आलं.

करणी सेना नक्की काय आहे ते पाहुया.

या संघटनेचं नाव हे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना असं आहे. २०१६ मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली. समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून ही संघटना सुरू करण्यात आलीये. मुळात हिंदूना एकत्रित करून हिंदू धर्मासाठी आणि हिंदू धर्माच्या मान-सन्मानासाठी लढणारी ही संघटना आहे.

करणी सेनेची वेबसाईट ओपन केल्या केल्या पहिली ओळ दिसते ती, सनातन संस्कृती ही भारताची ओळख आहे असं लिहीलंय. याखालीच लिहीलंय की,

“आता पर्यंत हिंदू संघटित नसल्यामुळं मुघल, इंग्रजांनी हिंदूंवर राज्य केलं. पण आता हिंदूंना एक करण्यासाठी आणि अखंड भारताच्या स्वप्नासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना कार्य करत आलीये आणि करत राहील.”

या मजकुरावरून एकंदरीतच हे लक्षात येतं की, ही संघटना प्रखर आणि आक्रमक हिंदुत्व जपणारी संघटना आहे.

करणी सेना ही राजकीय संघटना आहे का? 

याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. पण, करणी सेना या संघटनेभोवती राजकारण मात्र अनेकदा फिरत राहतं. मुळात, जिथे ही संघटना जिथे सुरू झाली आणि अधिक कार्यरत आहे तिथे म्हणजे राजस्थानमध्ये या संघटनेचं राजकीय वजन आहे. संघटना स्वत: उमेदवार देत नसली तरीही संघटनेच्या पाठिंब्याने उमेदवारांचा फायदा होतो हे नक्की.

संघटनेमध्ये अधिकतर युवकांचा सहभाग आहे.

करणी सेना ही एक आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेमध्ये तरुण कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे.  त्यांच्या मते संस्कृतीला धक्का लागत असेल तर आम्ही शांत राहणार नाही.

संघटनेसाठी तरुण थेट रस्त्यावर उतरायला कसे तयार होतात?

एखादा विषय समोर आल्या नंतर संघटनेतर्फे तरुणांना ज्वलंत इतिहासाचा दाखला दिला जातो आणि मग आज आपल्यावर कश्याप्रकारे अन्याय होतोय हे दाखवून दिलं जातं. यामुळे तरुणांना वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय. चुकीचा इतिहास दाखवला जातोय. त्यामुळे तरुण आक्रमक भूमिका घेतात.

सुरूवातीच्या काळात राजस्थानपर्यंत ही संघटना मर्यादित असलेली ही संघटना आता संपुर्ण देशभरात पसरलीये.

ही आक्रमक आणि प्रखर हिंदुत्त्व जपणारी संघटना असल्याचे सांगितलं जातं.  ही संघटना महाराष्ट्रातही सक्रीय आहे. १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला करणी सेनेनं विरोध केला आहे. एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील  स्तंभाला अभिवादन कार्यक्रमावर बंदी टाकण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केलीये.

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या बाबतीत करणी सेनेचं नेमकं म्हणणं काय?

१ जानेवारी रोजी महाराष्ट्र करणी सेना ही कोरेगाव भीमा इथे येऊन जाणार आहे.  कोरेगाव भीमाची ही लढाई जातीय लढाई नव्हती, इंग्रजांना पुण्यावर कब्जा मिळवण्याकरता एक छोटीशी चकमक झाली होती. असं मत करणी सेनेचं आहे.

दरम्यान, करणी सेनेनं विरोध केल्यानंतर या दिवसाच्या समर्थनासाठी काँग्रेस, आरपीआय हे पक्ष मैदानात उतरलेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.