इ-कॉमर्स मध्ये टाटा लेट झालेत पण सुपरॲपमुळे एंट्री ग्रँड असणार आहे.

टाटांचा आज जवळपास सगळ्या क्षेत्रात दबदबा आहे. अगदी समुद्रातल्या मिठापासून हवेतल्या विमानापर्यंत टाटा समूह कार्यरत आहे. सुरवातीला स्टील पासून फॉर्मात आलेल्या टाटा उद्योगसमूह काळानुरुप बदल स्वीकारत गेला आणि नवनवीन उद्योगांत आपला जम बसवत गेला.

मग ते स्वातंत्र्यानंतर भारतात नवीन उद्योग समूह उभारून देशाच्या औद्योगिकरणाचा पाय घालणं असू दे की ९१ च्या रिफॉर्म्स नंतर फॉर्मात आलेल्या सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये टॉपला जाणं असू दे टाटा नेहमीच पुढे राहिले.

मात्र एक क्षेत्र असं होतं त्यात टाटांना पाहिजे तसं आपलं बस्तान बसवण्यात यश आलं नव्हतं ते म्हणजे इ-कॉमर्स. भारतातील ई-कॉमर्स उद्योगाचे बाजार मूल्य जे २०२१ मध्ये अंदाजे ८४ बिलियन यू.एस. डॉलर आहे ही ते २०२७ पर्यंत २०० अब्ज यू.एस. डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

आणि एवढी मोठी मार्केट साईझ असलेल्या या क्षेत्रात आता टाटांनी ग्रँड एंट्री घ्यायचं ठरवलं आहे.

आपलं स्वतःचं एक सुपर ॲप काढून टाटा ई-कॉमर्स सेक्टरमध्ये येणार आहेत. 

टाटा न्यू या नावाने सुपरॲप हे ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

द मिंटच्या ऑक्टोबर २०२१ च्या एका रिपोर्टनुसार टाटा सन्सने आपल्या महत्त्वाकांक्षी सुपर ॲप टाटा न्यू मध्ये किमान $२ बिलियन गुंतवण्याची आणि नंतर  बाहेरील गुंतवणूकदारांकडून अतिरिक्त $५ बिलियन जमा करण्याची योजना आखली आहे. 

तर पाहिलं हे सुपरॲप काय भानगड आहे आणि टाटांच्या सुपर ॲपमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा असतील हे बघू .

सुपरॲप हे एकाच छत्राखाली विविध सेवा देणार्‍या कंपनीने विकसित केलेला डिजिटल प्लॅटफॉर्म असतो. म्हणजे ऑल इन वन ॲप.  खरं तर या कॉन्सेप्टची खरी हवा झाली चीनमध्ये. मेसेजिंग ॲप म्हणून सुरू झालेलं चीनमधील वी चॅट (WeChat) ऑनलाइन पेमेंट्स, कॅब्स, शॉपिंग, फूड ऑर्डरिंग, कॅब इत्यादी सेवा देत सुपरॲप बनले. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर सुपरॲप म्हणजे डिजिटल मॉलच  समजा. मॉलमध्ये जश्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात तसं या ॲपमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर भेटतील.

सामान्यतः ज्या कंपन्या अनेक सेवा आणि उत्पादने ऑफर करतात ते अशा सुपरॲपद्वारे आपल्या सर्व सेवा एकत्र देण्याचा प्रयत्न करतात. 

चीननंतर अरबांच्या पश्चिम आशियात ही कॉन्सेप्ट तुफान चालली. इथे मात्र हा सुपरॲप चालवण्याचं मॉडेल वेगळं आहे.  रिअल इस्टेटमधल्या कंपन्या ज्यांचे स्वतःचे मोठे मॉल्स, हॉटेल्स आधीपासूनच होते ते या सेक्टरमध्ये उतरले. मग त्यांनी ग्राहकांची मोठी संख्या आणि त्यांची शॉपिंग करण्याची वारंवारता ऑनलाइन बिझनेसच्या लेन्समधून पहिली. त्यांनी मग डिस्काउंट आणि इतर उपाय वापरत आपला  ग्राहकवर्ग दुसरीकडे जाऊनच दिला नाही. आणि मार्केट तज्ज्ञांच्या अंदाजाने टाटादेखील हेच मॉडेल राबवण्याच्या तयारीत आहेत.

ऑनलाइन किराणा बिगबास्केट, ऑनलाइन फार्मसी 1mg ,इलेक्ट्रॉनिक्ससाठी क्रोमा, एअर एशिया आणि विस्तारासाठीच फ्लाइट बुकिंग,टाटा क्लीक जी टायटन आणि तनिष्क सारखी उत्पादने विकते तसेच स्टारबक्स यांच्या माध्यमातून टाटांचा तसा ऑनलाइन कस्टमर बेस आहे. त्याचबरोबर टाटा समूहाचा रिटेल आर्म ट्रेंट लिमिटेड जी वेस्टसाइड, झुडिओ, स्टार बाजार, लँडमार्क आणि झारा या ब्रँड अंतर्गत स्टोअर चालवते त्याचाही एक लॉयल कस्टमर आहे. आणि आता टाटा हे सुपरॲपच्या माध्यमातून सगळं एकत्र आणायच्या तयारीत आहे.

त्यासाठी टाटा स्वतःची ऑनलाइन पेमेंट सिस्टम देखील अनंत असल्याचं सांगण्यात येतंय. द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPIवर थर्ड पार्टी पेमेंट सर्विस पुरवठादार म्ह्णून टाटा  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजुरी घेत आहे.

म्हणजे या सुपरॲपच्या माध्यमातून टाटा ऑनलाइन पेमेंट या सेक्टरमध्येही पदार्पण करेल.

असंही टाटा समूहाला बँकिंग क्षेत्राचा  मोठा अनुभव आहे. 

१९१७ मध्ये, टाटांनी टाटा इंडस्ट्रियल बँकेची स्थापना केली, जी नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली . १९६९ मध्ये सर्व खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण होण्यापूर्वी कॅनरा बँकेमध्ये टाटाचा हिस्सा होता. आज टाटा कॅपिटल आणि तिच्या इतर  उपकंपन्या (ज्यापैकी एक NBFC आहे) व्यावसायिक कर्ज, ग्राहक कर्ज,टाटा कार्ड्स आणि इतर वेल्थ सर्विसेस देतं. 

म्हणजे सगळं गोळा बारूद रेडी आहे आणि टाटा आता हे सगळं एक सुपरॲपच्या माध्यमातून फायर करण्याच्या तयारीत आहे. तसं तर हा प्रोजेक्ट बराच लांबला आहे. मात्र मनी कंट्रोलच्या एका  आर्टिकलनुसार हे सुपरॲप जवळपास तयार आहे आणि ते सध्या टेस्टिंगसाठी टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांना वापरण्यस  देण्यात आल्याचं कळतंय.  

पण असा हा भारतातला पहिलाच प्रोजेक्ट असेल का? 

तर याआधी अनेक कंपन्यांनी असं सुपरॲप आणण्याचा प्रयत्न केला आहे. अलिबाबा ग्रुप गुंतवणूकदार असलेल्या  Paytm ने पेमेंट, तिकीट बुकिंग, गेम्स, ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग, कंझ्युमर फायनान्स इत्यादी सेवा एका ॲपमध्ये एकत्र आणल्या आहेत.

फ्लिपकार्ट ग्रुपच्या मालकीचे पेमेंट ॲप PhonePe ने Ola Cabs, Swiggy, Grofers, AJio, Decathlon, Delhi Metro, booking.com इत्यादी कंपन्यांशी करार करून या सेवा स्वतःच्या ॲपमधून ऑफर करण्यास सुरवात केली आहे.

 मात्र त्यांचा मॉडेल हे चीनच्या wechat सारखं आहे. तर टाटांच्या सुपरॲपचं मॉडेल यापेक्षा वेगळं असेल असं सांगण्यात येत आहे. 

बाकी आता या सगळ्यात आपल्याला काय भेटणार?

तर तुम्ही टाटांच्या वस्तूंचे लॉयल कस्टमर असाल  तर तुम्हला मोठे रिवॉर्ड देऊन टाटा या  त्यांच्या ॲपवर आणण्याचा प्रयत्न करेल आणि बाकीच्यांनाही जसं सुरवातीला जसं एकाधं डिलिव्हरी ॲप आपल्याला त्यांची सवय लागावी म्ह्णून सुरवातीला तुफान डिस्काउंट देतात तसंच ॲपवर देखील मिळेल असं सांगण्यात येतं. टाटांची ॲपवरील गुंतवणूक पाहता सुरवातीला तरी आपली चंगळ होईल अशी अशा करू.

बाकी आता हे ॲप आयपीएलच्या धामधुमीत लाँच होईल असं सांगण्यात येतंय. आयपीलच्या वेळीच  का म्हणत असाल तर आयपीएलचा स्पॉन्सर कोण आहे ते एकदा आठवा.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.