आचार्य तुषार भोसले कोण आहेत? त्यांना आचार्य ही पदवी कोणी दिली ?

राज्य सरकारने राज्यातील मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी दिली आहे. या पालख्या बसमधून जातील आणि यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

यावर वारकरी सांप्रदाय बाजूलाच राहिला, भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्यातच जोरदार घमासान सुरु झालंय.

हा वाद सुरु झालाय आचार्य तुषार भोसले यांच्या वक्तव्यांमुळे, ते म्हणतायतं

यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे.

सातत्याने आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी, भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे आचार्य तुषार भोसले नक्की आहेत तरी कोण ?

तसेच ते वारकरी संप्रदायाचे व अध्यात्मिक क्षेत्रातील आचार्य आहेत, असे सांगितले जातं होतं. त्यांना आचार्य ही पदवी कोणी दिली याबाबत ही एक वाद उफाळून आला होता ? काय होता वाद 

१८ मे २०२० रोजी सकाळ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,

सोशल मिडीयावर एक चर्चा रंगली होती. यात आचार्य तुषार भोसले यांचे खरे नाव हे तुषार भोसले नसून तुषार शालीग्राम पितांबर असल्याची जोरदार चर्चा झाली होती. तसेच ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

यावर वारकरी संप्रदायातील आचार्य काय विषय असतो? हा प्रश्न समजून घेण्यासाठी बोल भिडूने वारकरी संप्रदायाचे अभ्यासक विचारवंत, ह. भ. प. सचिन पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हंटले,

वारकरी संप्रदायात आचार्य अशी कोणती ही पदवी दिली जात नाही. किंबहुना वारकऱ्यांमध्ये कोणत्याही पदव्या दिली जाण्याची प्रथा नाही. ह.भ.प. महाराज किंवा बुवा ह्या सुद्धा पदव्या नाहीत. संतसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या, प्रवचनकाराला, कीर्तनकाराला आदराने या शब्दांचा प्रयोग करतात.

या वादाचे शंका निरसन करण्यासाठी बोल भिडूने माहिती थेट आचार्य तुषार भोसलेंशी संपर्क करून माहिती घेतली. तेव्हा त्यांनी आपल्या एकूणच प्रवासाबद्दल माहिती दिली.

भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत तुषार भोसले.

आचार्य तुषार भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक होते. त्यानंतर ते आज अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म शिक्षण नाशिक जिल्ह्यातलं. शाळीग्राम पितांबर भोसले आणि विमल भोसले या दाम्पत्यांच्या पोटी आचार्यांचा जन्म झाला.

काव्यतीर्थ असे वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज यांच्याजवळ त्यांनी वेदांचे शिक्षण घेतले. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणूनही ओळखले जातात. वयाच्या १७ व्या वर्षी आचार्य भोसलेंनी अखंड ३६५ दिवस प्रवचन देण्याचा विक्रम केला होता.

त्यांनी पुढचे शिक्षण मुंबईच्या भारतीय विद्याभवन येथून घेतले.

या संस्थेत २०१२ साली त्यांनी अद्वैत वेदांतात ‘शास्त्री’ अशी पदवी मिळवली. आणि २०१४ साली ‘आचार्य’ ही पदवी मिळवली. थोडक्यात “शास्त्री” व “आचार्य” या पदव्या त्यांनी संपादित केल्या आहेत.

यापूर्वीही अनेकदा त्यांनी मंदिर, वारीच्या प्रश्नांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांशी त्यांचे वाद गाजले आहेत.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मोदींच्या या पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हटले की,

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं कर्जाने ताब्यात घ्यावं

यावर चव्हाणांना लक्ष्य करताना आचार्य भोसले म्हंटले होते की,

पृथ्वीराज चव्हाणांचं डोकं ठिकाणावर आहे का? देवस्थानं खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही?

इतकंच नाही तर ते पुढं म्हणाले,

एवढीच जर तुम्हाला सरकारची काळजी आहे, तर तुम्ही ज्यांची हुजरेगिरी करता त्या तुमच्या नेत्यांना सांगा. सोनिया गांधींना सांगा त्यांची संपत्ती सरकारला द्यायला. त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रांना, पी. चिदंबरमला, सुरेश कलमाडीला सांगा. सामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांनी घरात पुरुन ठेवला, त्यातला रुपया देण्याची त्यांची नियत नाही आणि लोकांनी श्रद्धेनं देवस्थानांना, मंदिरांना दान दिलेली संपत्ती तुम्ही ताब्यात घ्यायला सांगता ? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही.

त्यानंतर,

जितेंद्र आव्हाडांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची विठ्ठलाशी केली होती. यावर तुषार भोसलेंनी टीका केली होती.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना विठ्ठलाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही जोपर्यंत ते राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी खुलासा व्यक्त करत नाही.

थोडक्यात आचार्य तुषार भोसले हे वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार असून संत साहित्याचे गाढे अभ्यासक व व्याख्याते आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ते प्रखर हिंदुत्ववादी नेते ही आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.