मुख्यमंत्री कोणीही असो दावोसमध्ये जातात अन् गुंतवणूक घेवून येतात, काय आहे दावोसमध्ये.?

स्वित्झरलँडबद्दल एक आपल्याला एक वेगळंच आकर्षण. यश चोप्रा यांच्या पिक्चरमध्ये जेवढा पण स्वर्गासारखा युरोप पाहिला तो स्वित्झरलँडमधलाच. डीडीएलजेमध्ये राज सिमरणचा रोमांस  स्वित्झरलँडमध्येच खुलला. 

मात्र आता पेपर वाचताना, टीव्ही बघताना स्वित्झरलँड सारखं ऐकायला मिळतं ते तिथं होणाऱ्या समिटमुळं. 

आता अशीच बातमी आली आहे दावोस समिटची. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक चालू आहे. त्यामध्ये महाराष्ट्रत ४ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे असं सांगण्यात येतंय. महाराष्ट्राकडून डावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे 23 सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये इंडोरामा, मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांचा समावेश आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनी पुण्यात डेटा सेंटर सुरू करणार आहे. त्यासाठी ३२०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

 राज्यातील नागपूर आणि कोल्हापूर या वस्त्रोद्योग केंद्रामध्ये इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड आदी प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या गुंतवणूक करणार आहे. 

इंडोनेशियातील आशिया पल्प अण्ड पेपर (एपीपी) कंपनी रायगडमध्ये जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

ही कंपनी लगदा आणि कागद उत्पादन करते. इंडोनेशियातील ही आघाडीची कंपनी आहे. त्याशिवाय, हॅवमोर आईस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यात आईस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करणार आहे. यासाठी मेमोरँडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग साइन करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत सद्या यासाठी दावोसमध्ये आहेत. 

फक्त महाराष्ट्रानेच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश यांनी देखील असे हजारो कोटींचे सामंजस्य करार केले  आहेत. याआधीही जेव्हा २०१८ , २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले होते तेव्हा त्यांनीही असे  सामंजस्य करार केले होते. 

त्यामुळं मग आम्हाला प्रश्न पडला की जात तो दावोसला जातोय तो हजार कोटींची डील कसा काय घेऊन येतोय?

तर सुरवात करू या मोठ्या समिट स्वित्झरलँडमध्येच का होतात यावरून. यामागील महत्वाचं कारण आहे स्विस न्यूट्रॅलिटी.  

स्विस न्यूट्रॅलिटी म्हणजेच स्विस तटस्थता हे स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र धोरणाच्या मुख्य तत्त्वांपैकी एक आहे.

ज्यानुसार स्वित्झरलँडने इतर राज्यांमधील सशस्त्र किंवा राजकीय संघर्षात सहभागी न होण्याचं बंधन घालून घेतलं आहे. हे धोरण स्वित्झर्लंडने स्वत:च स्वतःवर लादलेले आहे. बाह्य सुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच आणि देशांतर्गत शांतता वाढवण्यासाठी हे धोरण डिझाइन केलेले आहे.

आणि युरोपमधल्या इतर देशांनी पण हे धोरण मान्य केलं आहे. याचा फायदा असा झाला की एकतर स्वित्झरलँड कोणत्या मोठ्या संघर्षात सापडला नाही. 

त्यामुळं जेव्हा विरोधी देशांना एकत्र यायचं होतं त्यासाठी  स्वित्झरलँड हे तटस्थ लोकेशन पहिली पसंती राहिली.

त्यातच स्वित्झरलँडचं सौंदर्य, आल्पसची बर्फाळ शिखरं हे सोने पे सुहागा आहेत. स्वित्झरलँडचं लोकेशनही यूरोपमधील जी महत्वाचे देश आहेत त्यांच्यापासून अगदी मधोमध राहिलं आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे आंतरराष्ट्रीय परिषदा स्वित्झरलँडमध्ये होत असल्याने तिथं येणाऱ्या पाहुण्यांना राहण्याच्या सर्व सुविधा स्विस शहारत उपलब्ध झाल्या आहेत. 

याचमुळे अनेक महत्वाच्या जागतिक संस्थानची कार्यालये देखील स्वित्झरलँडमध्ये उघडली गेली. त्यामुळं संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक कामगार संघटना अशा मोठ्या संस्थांची ऑफिसेस तुम्हाला स्वित्झरलँडमध्ये उघडलेली दिसतील.

असंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरामचं हेड क्वार्टर स्वित्झरलँडमध्येच कॉलोनी येथे आहे. 

तर त्यांची जरवर्षी होणारी महत्वपूर्ण समिट दावोस या शहरात भरते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोराम काय आहे असा तुम्हला प्रश्न पडला असेल तर WEF ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी “जगाची स्थिती सुधारण्यासाठी” वचनबद्ध आहे असं या संस्थेची वेबसाइट सांगते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरामच्या दावोसमधील फ्लॅगशिप इव्हेंटमध्ये १०० हून अधिक वेगवेगळ्या देशांतील नेते आणि बिझनेसमन येतात.

त्यांच्यामध्ये जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी चर्चा होते. त्याचबरोबर जे नेते आलेले असतात ते तिथं आलेल्या बिझनेसमनना त्यांच्या देशात येण्याचं निमंत्रण देतात. भारतातील ज्या प्रमुख राज्यातील मुख्यमंत्री या ठिकाणी भेट देतात ते त्यांच्या राज्यबद्दल, राज्यात असेलेल्या सोयी-सुविधांबद्दल माहिती देतात.

त्यासाठी राज्यांचे वेगवेगळे स्टॉल देखील लावले जातात. मग पुढे नेते आणि  बिझनेसमन, मोठ्या कंपन्यांचे सीईओ यांच्यात चर्चा होतात. सरकारतर्फे कंपन्यांना  काही सवलती दिल्या जातात. यातूनच मग करोडोंचे सामंजस्य करार होतात. 

अनेकदा हे सामंजस्य करार असल्याने ते पाळलेच जातील याची शाश्वती नसते. 

त्यामुळं जेव्हा हजारो करोडोंच्या गुंतवणुकीचे आकडे जाहीर केले जातात त्यातली किती गुंतवणूक प्रत्यक्षात येते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.