रवांडा आणि युगांडा या देशांपेक्षाही भारताचा पासपोर्ट एवढा कमजोर आहे असं का म्हणतात?

पासपोर्ट एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट. दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठीही तुमचा पासपोर्ट बराच मॅटर करतो. तुम्ही कोणत्या देशातून येताय, तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री काय आहे यावर तुमची व्हिसा मिळण्याची शक्यता ठरते. त्यानुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे याची मग रँकिंगपण काढली जाते.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अशीच एक रँकिंग आहे. सगळ्यात ओरिजनल रँकिंग आम्हीच काढतो असं त्यांचं म्हणणं असतं.

२०२१ च्या तुलनेत या तिमाहीत भारताच्या पासपोर्ट सामर्थ्यात सुधारणा झाली आहे. हेनली पासपोर्ट निर्देशांकात भारत आता ८३व्या स्थानावर आहे. भारताचं रँकिंग गेल्या वर्षीच्या ९० व्या क्रमांकावरून सात स्थानांनी वर आले आहे. २०२० मध्ये भारताच्या पासपोर्टची रँक ८४ वर होती तर २०१६ मध्ये, माली आणि उझबेकिस्तानसह भारत ८५ व्या क्रमांकावर होता.

 भारताचा पासपोर्ट रवांडा आणि युगांडा या देशांपेक्षाही कमजोर आहे असं हे रँकिंग म्हणतंय.

या निर्देशांकात जपान आणि सिंगापूर यांनी टॉप केलंय.

जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताची रँकिंग या इंडेक्समध्ये मात्र नेहमी खालचीच असते. मग भिडूनं म्हटलं बघावं तरी नक्की मॅटर काय आहे.

तर तुमच्या पासपोर्टवरनं तुम्हाला किती देशात व्हिसा फ्री इंट्री करता येते किंवा व्हिसा-ऑन-अराव्हल (म्हणजे त्या देशात उतरल्यावर तुम्हाला व्हिसा देण्यात येतो) या सुविधेचा वापर करण्यात येतो यावरनं पासपोर्टचा दर्जा ठरतो.

म्हणजे या रँकिंगमध्ये टॉप करणाऱ्या जपानचा पासपोर्ट वापरून १९२ देशात व्हिसा न घेता फिरता येतंय. भारताचा कार्यक्रम मात्र इथंच गंडतोय. भारताचा पासपोर्ट वापरून फक्त ६० देशात व्हिसा फ्री किंवा व्हिसा-ऑन-अराव्हल ट्रॅव्हल करता येतंय. त्यातही तुर्की, थायलंड, मालदीव, कतार, इंडोनेशिया हे थोडेफार देश सोडले तर  इतर एवढे महत्वाचे देश नाहीयेत. 

तर देशाची आर्थिक परिस्तिथि, राजकीय स्थौर्य पाहून देश दुसऱ्या देशाच्या नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश करण्यास परवानगी देतात. पण भारतात या दोन्ही गोष्टी ठीक ठाक असताना विषय कुठे होतंय नेमकं हे बघितलं.

तर भारतातून स्थलांतरित होणाऱ्या लोंकांचं प्रमाण मोठं आहे. त्यात कौशल्य नसणाऱ्या आणि पोटा पाण्यासाठी दुसऱ्या देशात जाणाऱ्या लोकसंख्येचंही प्रमाण मोठं आहे. पण हे कौशल्य नसणारे लोकं ड्राइवर, पेंटर, बांधकाम कामगार बनून विकसित देशांच्या अर्थव्यस्थेत भर घालत असतात.

मात्र जर भारतासारख्या देशाला व्हिसा फ्री एंट्री दिली तर या देशातून लोंढेच्या लोंढे देशात येतील अशी भीती हे देश व्यक्त करतात.

विकसित देशांची विकसनशील देशांबद्दलची हि मानसिकता भारतीय नागरिकांना व्हिसा फ्री एंट्री नाकारते.

दुसरं एक कारण म्हणजे परस्पर करार करून दोन देश एकमेकांच्या नागरिकांना व्हिसा फ्री सुविधा देतात.

भारताचे असे करारही कमी आहेत.अनेक विकसित देश भारताबरोबर असे करार करण्यास अनुत्सुक असतात असं जाणकार सांगतात.

तसेच सुरक्षतेच्या कारणांवरून भारतही अनेक देशाच्या नागरिकांना त्यांचं बॅकग्राऊंड चेक न करता एंट्री देऊ शकत नाही. 

परिणामी ते देशही भारताच्या नागरिकांना व्हिसा फ्री एन्ट्री देत नाहीत. 

मात्र सरकारनं भारताचाही पासपोर्ट स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली आहे. तसेच भारतीय नागरिकांची विदेशात पर्यटनासाठी जाणारी संख्या पाहता आता अनेक देश भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री द्यायला तयार झालेत. 

त्यामुळं पैसा आल्यावर जसे माणसाचे दिवस बदलतात तसं भारतचेही होतील हीच अपेक्षा.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.