त्या रात्री मुंबईच्या सर्वात मोठ्या डॉनची इतकी धुलाई झाली कि तो शहर सोडून पळून गेला..

मुंबई अंडरवर्ल्ड म्हणल्यावर आजही डोळ्यापुढं रक्तरंजित घटना, निष्पाप लोकांचे डोळ्यासमोर गेलेले जीव, प्रचंड आर्थिक हानी अशा अनेक घटनांनी मुंबई खिळखिळी होत चालली होती.

दररोज मुंबईत नवीन नवीन डॉन तयार होत अतोनात नुकसान करत आणि आपलं वर्चस्व सिद्ध करत असत.

या गुंडाना आळा घालायचं काम मुंबई पोलीस शर्थीने करत असे, पण त्यात यश काय येत नसे. त्याकाळी मुंबईत वरदराजन या तामिळ डॉनचं वर्चस्व होतं. चेन्नईवरून येऊन तो हमाल म्हणून सुरवातीला काम करू लागला होता . पुढे हाच हमाली करणारा पोरगा मुंबईचा पहिला हिंदू डॉन म्हणून उदयास आला.

हा आजचा किस्सा आहे डॉनच्या पलायनाचा.

स्वतःला मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणवून घेणारा वरदराजन मुंबई सोडून पळाला म्हणण्यापेक्षा एका धडाकेबाज पोलीस ऑफिसरच्या टॉर्चरला वैतागून पळाला. ते पोलीस ऑफिसर होते वाय सी पवार.

वाय. सी. पवार यांच्या आक्रमक कारवाईने भले भले गुंड अचानक गायब होऊ लागले होते. गुन्हेगारीवर आळा घालण्याचं काम वाय सी पवार यांनी केलं. मुंबईत राजरोसपणे चालणारे अवैध धंदे, टोळीयुद्ध, काळा बाजार यांना त्याकाळी ऊत आला होता आणि तेव्हा एंट्री झाली वाय सी पवार यांची.

चेंबूरमध्ये छोटा राजन हा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा पण त्याच्याही आधी जंगी आणि भव्य दिव्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची सुरवात केली ती वरदराजनने. अवाढव्य खर्च, भले मोठे मंडप, जोरदार वाजणारी गाणी अशा मोठ्या स्तरावर हे गणपती उत्सव साजरे होत.

यात अमिताभ बच्चन, जया बच्चन हे आवर्जून आरतीला हजर राहत असे.

यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असे आणि त्याचा त्रास सामान्य लोकांनाही होत असे. हा प्रकार पाहून वाय सी पवारांनी आपला मोर्चा वरदराजन कडे वळवला. सगळ्यात आधी वाय सी पवारांनी वरदराजनच्या वाढत्या मंडप आकाराची सूचना अतिक्रमण विभागाला देऊन ती कमी केली. कोर्टाकडे याची तक्रार दिली.

वरदराजनला याबद्दल काहीच माहिती नव्हते, अचानक हा प्रकार घडल्याने तो गोंधळून गेला. वाय सी पवार यांनी थेट मंडपासमोरच एक छोटेखानी पोलीस चौकी उभी केली. हा प्रकार वरदराजनला आवडला नाही. त्याने त्या पोलीस चौकीचे आणि पवारांचे फोटो काढून कोर्टात याचिका दाखल केली पण पवारांनी अधिकृत रित्या परवानगी घेतली असल्याने कोर्टाने वरदराजनची मागणी धुडकावून लावली.

शेवटी वैतागून वरदराजनला सगळी रोषणाई, सगळा थाट कमी करावा लागला, मंडपाचा आकार कमी करावा लागला. पण वाय सी पवार हे गप्प बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी हळूहळू वरदराजनच्या मुसक्या आवळायला सुरवात केली.

वरदराजन हा अगोदर क्रूर होता तो त्याच्याविरोधात पोलिसांना जो तक्रार करील त्याला बेदम चोप द्यायचा , त्याचे हाल हाल करायचा. त्यामुळे वरदराजनचा त्रास सहन करण्याशिवाय सामान्य लोकांकडे दुसरा पर्याय नसायचा. पोलिसही त्याला टरकून असायचे.

पण वाय सी पवारांनी शेवटी राजनला बेड्या ठोकल्या आणि मुंबईच्या डॉनला पहिल्यांदा गजाआड केले. तिथे त्याला रात्रभर तळमळू दिले, सामान्य लोकांना विनाकारण त्रास देण्याचे परिणाम त्याला भोगू दिले. मग शेवटी वाय सी पवार स्वतः कोठडीत गेले.

वरदराजनला नाव विचारलं त्यावर त्याने गुर्मीने उत्तर दिले कि वरदा भाई, पवारांनी त्याला खडसावले कि तुझ्या बापाने हेच नाव दिलंय का तुला, बापाचं नाव सांगायला लाज वाटते का ? संपूर्ण नाव सांग. मग वरदराजनने पूर्ण नाव सांगितले वरदराजन मुनीस्वामी मुदलियार. बरेच प्रश्न विचारून त्याला त्याच्या अवैध कामांविषयी माहिती विचारून घेतली.

कोठडीत पवारांनी डॉनचा सगळा माज उतरवला, रात्रभर त्याला टॉर्चर केलं. त्याला पुरता नामोहरम केला. कशीबशी सुटका झाल्यावर वरदराजनने सुमडीत आपला बाडबिस्तरा घेतला आणि तो थेट चेन्नईला जाऊन पोहचला.

दुसऱ्या दिवशी वाय सी पवारांवर कौतुकाचा वर्षाव झाला. सगळीकडे त्यांच्याच नावाची चर्चा होती. एका बहादूर ऑफिसरने मुंबईच्या डॉनला धडा शिकवला फक्त धडाच नाही शिकवला तर पळवून लावला. पुढे चेन्नईमध्येच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेपासून लोकांमध्ये वाय सी पवार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पोलिसवाला म्हणून प्रसिद्ध झाले. आणि अंडरवर्ल्डने मात्र पवारांचा धसकाच घेतला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.