कलेक्टर बनायला आलेल्या यामी गौतमला फेअर अँड लव्हलीच्या ॲडने हिरॉईन बनवलं…

मागच्या पाच-दहा वर्षांत टीव्हीला एक जाहिरात कायम दिसायची ती म्हणजे फेअर अँड लव्हली क्रीमची. नंतर नंतर रेसिझमवरून फेअर अँड लव्हलीला बऱ्याच शिव्या खायला लागल्या तो मुद्दा वेगळा. त्या ॲडला खरं मार्केट मिळालं ते त्या मॉडेलमुळे आणि ती मॉडेल फेमस झाली फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीमुळे.

ती मॉडेल होती फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून फेमस झालेली यामी गौतम.

जाहिरात किती प्रभावी असू शकते याचाच हा नमुना होता आणि नंतरच्या काळात या फेअर अँड लव्हली गर्लने बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे सगळ्यांचीच मने जिंकली. तर जाणून घेऊया यामी गौतमचा हा फेअर अँड लव्हलीची जाहिरात ते बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास.

यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये २८ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला होता. घरात आजोबा सोडून इतर कुणालाही नाटक, सिनेमा यांच्याविषयी गोडी नव्हती.

चंदीगड मध्ये नाटक सुरू करण्याचा प्रघात यामी गौतमच्या आजोबांनी सुरू केला होता आणि आजोबांसोबत बालकलाकार म्हणून यामी गौतम नाटकात भाग घ्यायची. पण एका घटनेमुळे तिच्या अभिनय क्षेत्राला अजूनच पुश मिळाला.

आधीच यामी अभ्यासात हुशार होती, वर्गात कायम टॉप करायची आणि खुद्द यामीचं स्वप्न होतं की आपल्याला कलेक्टर होऊन देशाची सेवा करायची आहे आणि साहजिकच होतं मुलीचं इतकं मोठं स्वप्न असल्याने घरच्यांनाही तिला सपोर्ट केला. पंजाब युनिव्हर्सिटी मधून यामी गौतम आयएएस करण्याच्या तयारीला लागली.

वडिलांचे एक मित्र एकदा त्यांच्या घरी आले होते, त्या गृहस्थांची पत्नी टीव्हीवर सिरियल्समध्ये काम करत होती. आणि यामी गौतम त्यांना चहा देण्यास गेली तेव्हा वडिलांच्या मित्राने यामीला सांगितलं की तुझा फेस कट चांगला आहे आणि तू थेटर जॉईन करायला हवं.

जाता जाता त्या गृहस्थाने यामीच्या आईकडून यामीचे काही फोटो मागवून घेतले आणि मुंबईतल्या मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसला ते फोटो पाठवून दिले.

या फोटोग्राफ्स पाठवण्यामुळे लवकरच एक संधी चालून आली ती म्हणजे टीव्हीवर चांद के पार चलो हा बंगाली शो सुरू होणार होता. तिथं यामी गौतमने ऑडिशन दिली आणि ती सिलेक्ट झाली आणि या सिरियलनंतर सलग तीन नव्या सिरियलमध्ये यामीला कास्ट करण्यात आलं. आता ज्यावेळी या सिरीयल सुरू होत्या त्या वेळी ॲड करण्याच्या ऑफर्ससुद्धा यामीला येत होत्या. तेव्हाच एकॲड आली जी यामीला रातोरात फेमस करून गेली.

अनुराग बसू हे एक ॲड शूट करणार होते, ती ॲड होती फेअर अँड लव्हली या क्रीमची आणि त्यासाठी योग्य चेहरा म्हणून त्यांनी यामी गौतमला सिलेक्ट केलं आणि अनुराग बसुनी आपल्या हटके शैलीत ही ॲड शूट केली आणि काही दिवसांमध्येच यामी गौतम जाम फेमस झाली.

फेअर अँड लव्हली आणि ब्रिझा सोप या दोन जाहिरातींमुळे यामी गौतम घराघरात पोहचली. या पॉप्युलरीटीमुळे यामीला जास्तच फायदा झाला आणि सुजित सरकारने यामीला पहिला सिनेमा ऑफर केला तो होता विकी डोनर.

2010 मध्ये आयुष्यमान खुरानासोबत पडद्यावर यामी गौतमने दमदार पदार्पण केले. नंतर मग आयएएस बनण्याचा नाद यामी गौतमने सोडला आणि पूर्णवेळ सिनेमाच करू याकडे लक्ष वळवले. नंतर तेलगू ,कन्नड सिनेमांमध्येसुद्धा यामी गौतमने काम केलं. बॉलिवूडमध्ये ॲक्शन जॅक्सन, काबिल, सनम रे, सरकार 3, बदलापूर मध्ये दिसली.

आजसुद्धा यामी गौतम फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून ओळखली जाते, लाजरी बुजरी असणारी ही मुलगी आज बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींना टक्कर देते आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.