गोऱ्यागोमट्या तनुजाची मुलगी अशी दिसते?

तनुजाची मुलगी सिनेमात येणार हे गौतम राजाध्यक्ष यांच्या लेखातून कळलं. हळू हळू तिचे फोटोज् छापून यायला लागले…

ही?? तनुजा दी फिल्म स्टार ची मुलगी??? (तुषार कपूरला बघून असा शॉक बसला होता.जितेंद्र चा पोरगा?)

हिरॉईन गोरीच हवी हा बॉलिवुडच्या प्रेक्षक आणि निर्मात्यांचा समज स्मिता पाटील, दीप्ती नवल यांनी कधीच तोडला होता. दाक्षिणात्य नायिकाही लोकांना आवडू लागल्या होत्या. पण ही अत्यंत अजागळ वाटणारी, सावळी, गबदुल, ढापणी. कुठे स्मार्ट तनुजा कुठे हे ध्यान. एकच गोष्ट बरी होती तिची. तिचं नाव.

काजोल…

गौतम राजाध्यक्षांची ती मानस कन्या होती. वेडे कुरूप पिल्लू असं एकदा ते स्वतःच म्हणाले होते. त्यांना खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून. इतक्या की तिच्या पहिल्या सिनेमाची कथा पटकथा लिहायला ते स्वतः बसले होते. बेखुदी मध्ये तनुजाची मुलगी काजोल आणि शर्मीलाचा मुलगा सैफ अली खान असणार होता. सनी देओल सुद्धा असणार होता. खूप उत्सुकता होती. पण कसा कोण जाणे सैफला नारळ देण्यात आला. बेखुदी कधी आला गेला कळलं नाही. इतका वाईट बनला होता .

पण ही मुलगी .. स्पार्क होता ..आई, आज्जी, मावशी… काका, बाबा… पाच एक टक्के बॉलिवुड तर घरातच होतं.

“बेखुदी” संपवून ही पोरगी परत शिक्षण पूर्ण करणार होती. सोळा अठरा वर्षांची असेल. पण बॉलिवुडचा रंग ज्याला चढला तो तिथेच अडला. काजोलला पुढचा सिनेमा सुपर डूपर हिट मिळाला. बाजीगर. शाहरुख खानच्या आयुष्यातला मैलाचा दगड. यात शिल्पा शेट्टी ही नवी मुलगी काजोलची मोठी बहीण झाली होती. शाहरुख बरोबरच इंडस्ट्री ने या दोघांची नोंद घेतली.

काजोलच वैशिष्टय हे की नायिकेला लागणाऱ्या शरीर सौष्ठव आणि रूढ सौदर्य या पेक्षा तिच्या तेज तर्रार अभिनयाची बॉलिवूडने लगेच चर्चा करायला सुरुवात केली. तिला उधार की जिंदगी, ये दिल्लगी असे सिनेमे मिळाले. भारतीय प्रेक्षकांना आवडेल अशी दणकट, गच्च फिगर होती काजोलची. पण त्याही पेक्षा तिचा अभिनय गच्च असायचा. तिच्या सावळ्या वर्णाला अजिबात मॅच न होणाऱ्या मांजरी डोळ्यात कधीच लबाडी दिसत नसे. एक प्रखर प्रामाणिक तेज होतं त्या नजरेत.

सिमरन आपल्या बापाला इतकी घाबरत असते की राजला गच्चीवर येऊन भेटून मला पळवून ने अशी विनंती करते… इतकं रामायण होऊन राज पंजाबवरून परत चाललाय. ट्रेन पकडली आहे त्याने. सिमरन चं मनगट मात्र तिच्या कठोर पित्याच्या वज्र मुठीत बंदिस्त आहे आणि तिच्या डोळ्यात फक्त आर्त विनंती आहे. बाप आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही हे माहीत असूनही काजोलचा लुक एक सेकंदही ढळत नाही.

काजोलने वाईट काम केलं आहे. पाट्या टाकल्या आहेत असा एकही सिनेमा अद्याप नाही. ती ते करूच शकत नाही याची एक प्रेक्षक म्हणून आम्हाला ही खात्री असते. ९० च्या ज्या दशकात आयटम साँगची प्रथा उदयास आली. जेव्हा माधुरी, श्री सारख्या नायिका स्वतः आयटम साँग्ज करू लागल्या त्यात काजोल सारखी वाईट डांसर फक्त आपल्या नावावर प्रेक्षक खेचत होती हे सत्य आहे. गुप्त, करन अर्जुन, इश्क, दुश्मन, प्यार तो होना ही था.

मला वैयक्तिक ती कुछ कुछ होता है (तुझे याद न मेरी आयी यात अंजलीच्या वेदनेबरोबर आपण इतके समरस होतो त्याला, आपल्या भावना राहुल दूर जाताना कळलेली टॉम बॉय अंजली काजोल सोडून इतर कुठलीही अभिनेत्री करूच शकत नाही.), फना (अप्रतिम, अप्रतिम), आणि इश्क (साधा, गोड रोल) या मध्ये खूप आवडली आहे…

ती प्रचंड फटकळ, जजमेंटल आणि शीघ्रकोपी आहे म्हणतात. तिचं वाचन अफाट आहे. इंग्रजी, हिंदी, बंगाली आणि मराठी चौफेर. हजरजबाबी अशी की साक्षात शाहरुख तिला घाबरतो. वस्तुनिष्ठ, परखड, बेधडक असली तरी अजय देवगण शी लग्न झाल्यावर आपला संसार तिने उत्तम सांभाळला आहे. एकदा ती म्हणाली होती,

बंगाली बापाकडून भडक माथा आणि मराठी आईकडून आपल्या मुळाशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती माझ्यात आलीय.

करण जोहर आणि शाहरुख यांचं आपल्या सिंघम कारभाऱ्याशी फारसं पटत नाही हे माहीत असूनही आपली मैत्री हा आपला वैयक्तिक मामला असतो हे ठळक दाखवून देणारी आजची मुलगी आहे ती. तेच करण ने अजय बरोबर व्यावसायिक कारस्थानं करताच नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायको सुद्धा आहे ती.

मी खरंतर अजिबात फॅन नव्हतो हिचा कारण लोकांना अपमानित करण्याचे काजोलचे किस्से होते. पण काजोलच्या फक्त नावातच काजळी आहे. प्रत्यक्षात मात्र आहे ती लखलखती वीज.. आपले डोळे दिपवून टाकणारी. कोण हीचा फॅन नसेल?

गौतम राजाध्यक्ष यांच्या या कुरूप, वेड्या पिल्लाला आणि फरिदा जलाल यांच्या लाडक्या कजलोला वाढदिवसाच्या काजल का टीका लावुन शुभेच्छा!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.