बिबट्याला मारण्यासाठी प्रशासनात नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी कशा प्रकारे देण्यात येते..

नुकताच करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर यश आलं. बारामतीच्या हर्षवर्धन तावरे यांची टीम वनखात्या बरोबर गेले काही दिवस या बिबट्याच्या शोधात होती. या टीममधील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला.

बिटरगाव जवळील वांगी नं.४ रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.

नरभक्षक बिबट्या मारला गेला मात्र या निमित्ताने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

वाघ किंवा बिबट्या नरभक्षक झाला आहे हे कस ठरवलं जातं ?

त्याला मारण्यासाठी खाजगी शिकाऱ्याना परवानगी कशी दिली जाते? आपणही वाघ मारू शकतो का वगैरे वगैरे ?

साधारण १९७२ साली भारत सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा आणला आणि तेव्हा पासून वाघाच्या शिकारीवर बंदी आणण्यात आली. याच कायद्यात नरभक्षक वाघ व त्याला मारण्याच्या संबंधीचे नियम सांगितले आहेत.

नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीनुसार वाघ आणि बिबट्या हे परिशिष्ट १ मध्ये येणारे प्राणी आहेत. दोन्ही ही मार्जार कुळातले प्राणी सहसा अन्न म्हणून मनुष्यावर हल्ला करत नाहीत. म्हणूनच माणसावर हल्ला करणारे आणि नरभक्षक या दोन्हीत फरक सांगितला जातो. याचे नियम काय ?

वाघ फक्त तीनच कारणांनी माणसावर हल्ला करतो.

  1. वाघिणीने पिल्ले दिलेल्या भागात मनुष्य वावर सुरु तर
  2. झोपलेल्या वाघाच्या जवळ चुकून एखादा माणूस गेला तर
  3. वाघाकडे पाठ करून खाली वाकून काम करणाऱ्या व्यक्तीला प्राणी समजून त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते.

वाघ मनुष्याचे मृत शरीर देखील खात नाही. मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असेल तर वाघिण किंवा बिबट्याची मादी पिल्ले घालण्यासाठी जवळच्या ऊसशेताचा आडोसा घेत असते. त्यावेळी खाण्यासाठी शिकार मिळाली नाही तर पिल्लांसाठी ही मादी माणसांवरही हल्ला करते. या वाघिणीला नरभक्षक मानू नये असं या कायद्यात सांगितलं आहे.

पण जर नर वाघ किंवा बिबट्या गावाजवळ किंवा शेतात माणसावर दबा धरून हल्ला करत असेल तो नरभक्षकच असण्याची जास्त शक्यता असते. यातील मुख्य मुद्दा असा की नर असो किंवा मादी जर अचानक हल्ला न करता वाट बघून दबा धरून माणूस खाण्यासाठीच हल्ला करत असेल तर तो खात्रीपूर्वक नरभक्षक झाला आहे असं मानलं जातं.

बिबट्याच्या बाबतीत हा नियम मात्र थोडासा वेगळा आहे. बिबट्या हा मनुष्यवस्तीच्या आसपासच राहणारा प्राणी असल्यामुळे तो विशेषतः रात्री शिकारीच्या शोधात गावात घुसू शकतो व अचानक एखादी व्यक्ती समोर आली तर त्यांच्यावर हल्ला देखील करतो

पण जर बिबट्या माणसावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसत असेल तर तो नरभक्षक बनला आहे हे सिद्ध होते.

हे पुरावे कसे गोळा केले जातात?

या प्राण्याच्या फिरण्याच्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले जातात. त्याच्या पायांचे ठसे व इतर नोंदी वनखात्यातर्फे ठेवल्या जातात. प्राण्याचा वावर असलेल्या परिसरातून नागरिकांना तात्पुरते दूर हटवले जाते. गरज पडल्यास त्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून मदत घेतली जाते. प्राण्याचे ठसे, समितीचे पुरावे, प्रत्यक्ष दर्शन, प्राण्यांची विष्ठा आणि केस असे पुरावे गोळा करून, त्यांचे डीएनए विश्लेषण करून त्या आधारे नरभक्षक प्राण्याची ओळख पटवली जाते.

जर एखाद्या व्यक्तीचा वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे पण तो वाघ नरभक्षक  आहे याचे सबळ पुरावे समोर आले नसले तरी एका माणसाच्या मृत्यू नंतरही या प्राण्याला पकडण्याची तयारी सुरु करण्याचे आदेश वनखात्याला दिलेले असतात. यासाठी ट्रँक्विलाइज (भूल देऊन बेशुद्ध) करणे वगैरे उपाय करावे लागतात.

पण जर वाघ अथवा बिबट्या नरभक्षक झाला आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होत असेल तर ?

जर प्राणी नरभक्षक झाला आहे याचे सबळ पुरावे मिळत असले तर मात्र ताबडतोब त्या प्राण्याला नष्ट करण्याचे म्हणजेच मारण्याचे आदेश दिले जातात. याचं मुख्य कारण म्हणजे असा प्राणी खोल जंगला सोडून आल्यास पुन्हा तो भक्ष्याच्या शोधासाठी मानवी वस्तीत घुसू शकतो.

याचा अर्थ त्या वाघाला पकडण्याचे प्रयत्न थांबवले जातात असं होत नाही. पिंजरा लावणे किंवा ट्रँक्विलाइज करणे याचे प्रयत्न चालूच ठेवले जातात, फक्त तो सापडेल म्हणून वाट पाहण्याऐवजी जर संधी मिळाली तर त्याला थेट मारावे असा स्पष्ट उल्लेख या कायद्यात आहे.

मग वाघाला मारण्याचे आदेश कोणाला असतात ?

नरभक्षक प्राण्यांना मारण्याचे आदेश देण्याचे अधिकार राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना आहेत. त्यासाठी त्यांना हे आदेश देण्यामागील कारणे लिखित स्वरूपात नमूद करणं बंधनकारक आहे.

तर नरभक्षक वाघाला गोळ्या घालून ठार मारण्याचा अधिकार फक्त आणि फक्त अनुभवी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना असतो. वाघाच्या शिकारीसाठी याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून कायद्याने ही खबरदारी घेतली आहे. मात्र हा कायदा बनला तेव्हा वन खात्यातले अधिकाऱ्यांना देखील शिकारीचा अनुभव होता.

मात्र आता शिकारीच्या बंदीला जवळपास पन्नास वर्षे होत आल्यामुळे असे अनुभवी व्यक्ती वनखात्यातही नाहीत. शिवाय वरिष्ठ अधिकारी हे वयस्कर असल्यामुळे त्यांना चपळाईने शिकार करायला जमेलच असे नाही.

विशेषतः बिबट्या हा झाडावर व डोंगरात वावरत असल्यामुळे त्याला ठार करण्यासाठी तरुण शिकारी असणे गरजेचे असते. वाघ हा झाडांवर चढू शकत नाही. तो कुठे असेल याचा अंदाज बांधता येतो, मात्र बिबट्याचा नॅचरल अधिवास हा कुठेही असू शकतो त्यामुळे बिबट्याच्या शिकारीसाठी अधिक सतर्क असावे लागले.

अशी व्यक्ती विभागात नसल्यास इतर खाजगी शार्पशुटर किंवा शिकारी यांची मदत घेण्याबद्दल या कायद्यात सांगितलेले आहे. मात्र या शिकाऱ्यांना वाघाला मारण्याचा अधिकार फक्त राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक अधिकारी देऊ शकतात. 

म्हणजे सध्या वन विभागाने हर्षवर्धन तावरे व त्यांच्या टिमकडे ही जबाबदारी दिली होती. आत्ता यामध्ये अन्य कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीने बिबट्या मारला असता तर ते प्रकरण अनधिकृत झालं असत. वन विभागाने हर्षवर्धन तावरे व त्यांच्या टिमकडे दिली होती. या टिमचे जबाबदार व्यक्ती म्हणून धवलसिंह मोहिते पाटील होते. त्यामुळेच ही कारवाई योग्य असल्याचं वरिष्ठ अधिकारी सांगतात.

पण मुख्य मुद्दा राहतो तो म्हणजे अशा लोकांची निवड कशी केली जाते.

तर शुटींगचा अनुभव, पुरेस ज्ञान आणि ज्या प्राण्यांच्या शिकारीस बंदी नाही अशा प्राण्यांच्या शिकारीचा अनुभव अशा सर्व गोष्टींचे निकष लावून ही जबाबदारी सोपवण्यात येते. यासाठी विशिष्ठ असे नियम नसल्याचे अधिकारी सांगतात.

या कायद्यात आणखी एक नियम म्हणजे वाघाची अथवा बिबट्याची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला कोणताही पुरस्कार, बक्षीस शासनाकडून दिली जात नाही. वाघाला मारण्यासाठी लागणारी सगळी मदत मात्र दिली जाते. जर एखादा शिकारी परिस्थितीने गरीब असेल तर त्याला शिकारीच्या मोहिमेत लागणाऱ्या वस्तूंची मदत मात्र शासनाने करणे हे बंधनकारक असते.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Hitesh says

    जंगल तोडून माणूस जंगलात घुसणारा आणि मुळातच शिकारी असणार्‍या प्राण्यांना नरभक्षक ठरवून त्यांना ठार मारणारा माणूस निसर्गाचा मालक असल्यासारखं वागू लागलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.