आशा भोसलेंना ठाऊक नव्हतं त्यांना चोरून गुलाब पाठवणारा शेजारीच बसलाय

आर. डी. बर्मन यांची गाणी जशी अनोखी होती तशीच त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा दिलचस्प होती. प्रत्येक गाणी मनापासून कंपोज करणारे पंचम दा, आशा ताईंच्या प्रेमात पडले. संगीत विश्व गाजवणाऱ्या या अवलियाने प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा खास गोष्ट केली होती.

कशी होती आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांची प्रेमकहाणी, जाणून घेऊ..

प्रख्यात संगीतकार एस. डी. बर्मन हे पंचम दां चे वडील. वडील संगीतात इतके मशहूर झाल्यावर पंचम दां ची पाऊलं या क्षेत्राकडे वळली नसती तर नवल. वयाच्या १७ व्या वर्षी पंचम दा यांनी आयुष्यातलं पहिलं गाणं कंपोज केलं. मुलाने संगीतबद्ध केलेलं हे गाणं एस. डी. बर्मन यांनी १९५६ साली ‘फंटूश’ सिनेमात वापरलं. आणि अशाप्रकारे पंचम दां चा सांगीतिक प्रवास सुरू झाला.

पंचम दां ची पहिली पत्नी रिटा पटेल. हा किस्सा सुद्धा काहीसा वेगळा. रिटा पटेल ही पंचम दां ची मोठी फॅन होती. रिटा ने तिच्या मैत्रिणीसोबत पैज लावली होती. ती पैज अशी,

“मी आर. डी. सोबत डेट वर नक्की जाईन.”

दार्जिलिंग मध्ये एके ठिकाणी ती पंचम दां ना भेटली. ती पैज जिंकली शिवाय तिने पंचम दां सोबत लग्न केलं. १९६६ साली दोघांचं लग्न झालं. परंतु काहीच वर्षांत १९७१ साली दोघांनी घटस्फोट घेतला.

परिचय सिनेमात असलेलं ‘मुसाफिर हु यारो’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. रिटा शी घटस्फोट घेतल्यानंतर एका हॉटेल मध्ये हे गाणं पंचम दां नी कंपोज केलं होतं.

घटस्फोट ही गोष्ट नाही म्हटलं तरी, दोघांना मानसिक त्रास देणारी असते. पंचम दां सारख्या माणसाला त्रास होणं साहजिक आहे. परंतु अधिक काळ स्वतःला त्यात अडकवून न ठेवता त्यांनी पुन्हा कामांना सुरुवात केली. दुसरीकडे आशाताई स्वतःच्या गायनाने भारतीय सिनेसृष्टी गाजवत होत्या. आर. डी. बर्मन यांनी आशाताईं सोबत सुद्धा अनेक गाण्यांवर काम केलं होतं.

खूपवेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या आत असणाऱ्या कलागुणांवर फिदा असतो. पंचम दा आणि आशाताई यांचं नातं सुद्धा असंच जोडलं गेलं.

याच काळात एक अज्ञात व्यक्ती आशाताईंना फुलांचा गुच्छ पाठवत असे. आशाताई घरी अथवा रेकॉर्डिंग ला जिथे कुठे असत, तिथे सुगंधी फुलं त्यांच्या स्वागताला हजर असत. ही फुलं कोण पाठवत आहे, या प्रश्नाचा उलगडा आशाताईंना होत नव्हता. एकदा आशाताई रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गेल्या होत्या. तिथे आर. डी. बर्मन आणि प्रसिद्ध गीतकार मजरुझ सुलतानपूरी उपस्थित होते. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीकडून फुलांचा गुच्छ आला.

“कोण रोज माझ्यासाठी ही फुलं वाया घालवत आहे”, असं म्हणत आशाताईंनी ही फुलं फेकून दिली.

आशाताईंच्या या कृतीवर आर. डी. बर्मन शांत होते. मजरुह साब म्हणाले,

“तुला फुलं पाठवणारा व्यक्ती माझ्या बाजूला बसला आहे.”

गेले अनेक महिने ज्या अज्ञात व्यक्तीकडून फुलं येत आहेत ते आर. डी. बर्मन आहेत या गोष्टीचा आशाताईंना उलगडा झाला. दोघांनी अनेक गाणी एकत्र केल्याने पंचम दा आशाताईंच्या आवाजाचे दिवाने होते. ते म्हणाले,

“आशा, फक्त तूच सुरांना समजू शकतेस. तू प्रयत्न जरी केलास तरी तुझे सुर भरकटू शकत नाहीत.”

आधीच्या लग्नाचा फार वाईट अनुभव आशाताईंना होता. परंतु त्या आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न करायला तयार झाल्या. आशाताई सुध्दा इतकी वर्ष आर. डी. बर्मन यांचं काम बघत आल्या होत्या. अखेर १९८० साली हे दोघे एकमेकांशी विवाहबद्ध झाले.

आयुष्याच्या उत्तरार्धात पंचम दांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. त्यांना अचानक कामं मिळणं कमी होऊ लागलं.

१९८८ साली हार्ट अटॅक आल्याने लंडनच्या हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. आणि ४ जानेवारी १९९४ साली आर. डी. बर्मन काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी संगीतबद्ध केलेला सिनेमा ‘1942 – अ लव्ह स्टोरी’ सुपरहिट झाला. त्यातली गाणी लोकांच्या ओठांवर रेंगाळू लागली.

पण या गाण्यांमागचा किमयागार मात्र लोकांनी केलेलं कौतुक ऐकायला हजर नव्हता. आर. डी. बर्मन यांना या काळात आशाताईंनी भक्कमपणे साथ दिली. दोघांनी एकमेकांच्या सहवासाचा प्रत्येक क्षण आनंदात अनुभवला. प्रेम असावं तर असं !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.