खेसारी लालने सानियावर गाणं गायलं आणि त्याला जेलची शिक्षा भोगावी लागली….

भोजपुरी इंडस्ट्री हे एक भयानक आणि मजेदार प्रकरण आहे. या लोकांना जग काय करतंय याच घेणं नसतं. मस्तपैकी आपले सिनेमे बनवतात आणि आपल्या प्रेक्षकांना खुश करतात. निरहुआ, मनोज तिवारी, रवी किशन ही सगळी गॅंग म्हणजे भोजपुरी सिनेमाचा आत्मा आहे. पण तुम्हाला एक गोष्टर माहितीच असेल की बाकी भोजपुरी सिनेमे आपण तुरळक प्रमाणत बघतो पण भोजपुरी लोकगीतांचा नाद करायचा नाय भिडू..! करोडो मध्ये या भोजपुरी लोकगीतांना व्हीवज असतात.

बरं आपल्या मराठी लोकगीतांना पण व्हीवज असतात कारण आपल्याकडे लोकगीतांचा क्राऊड हा खेडोपाड्यातला आहे. कष्टकरी जनतेला दोन घडी विरंगुळा म्हणून मराठी लोकगीते श्रेष्ठ ठरतात. अश्लीलता हा खेड्यात विरंगुळा असतो तर शहरात याच्याकडे नाकं मुरडली जातात असो. भाषेला समृद्ध करणारं परफेक्ट माध्यम म्हणजे लोकगीते.

तर भोजपुरी लोकगीतांचा विषय चालला होता. रिंकिया के पापा, जिया तू बिहार के लाला, जिला टॉप लागेलु, मै आयी हूं युपी बिहार लुटने ही गाणी आपण बऱ्यापैकी ऐकलेली आहे. पण भोजपुरीमध्ये असं एक लोकगीत आलं होतं ज्यामुळे भोजपुरी सुपरस्टार खेसारी लालला तीन दिवस तिहाड जेलमध्ये हवा खावी लागली होती. काय होता नेमका विषय जाणून घेऊया.

खेसारी लालच्या ऍक्टिंगचे आणि गाण्याचे बरेच लोकं फॅन्स आहेत. पण एकेकाळी खेसारी लालने सानिया मिर्झा या भारताच्या सुप्रसिद्ध स्टार खेळाडूवर एक जबऱ्या गाणं लिहिलं पण त्याचा भुर्दंड त्याला असा खतरनाक बसला की तो तीन दिवस तिहाद जेलला डोक्याला हात लावून बसला होता. पण या गाण्यामुळे खेसारी लाल रात्रीतूनच फेमस झाला होता. या प्रकरणात मेन होतं गाणं ज्यामुळे हा एवढा राडा झाला होता. ते गाणं होतं

टेनिसवाली सानिया दुल्हा खोजले पाकिस्तानी, नथनीवाली सानिया दुल्हा खोजले पाकिस्तानी….

या गाण्याच्या दोनच दिवसानी खेसारी लालवर मानहानीचा दावा ठोकण्यात आला. सानिया मिर्झा पर्यंत हे गाणं गेलं होतं आणि तिने हे गाणं आपल्याला उद्देशून आहे म्हणून खेसारी लालवर केस केली होती. काही दिवस खेसारी लाल जेलमधून बाहेर आला तेव्हा तो प्रचंड फेमस झाला होता. अनेकांनी अंदाज लावला होता की सानिया मिर्झा याची क्रश असेल म्हणून गाणं केलं का काय ?

पण हा मॅटर इथंच संपत नाही झी टीव्हीच्या यादो की बारातमध्ये सानिया मिर्झा आलेली होती आणि अचानक ते गाणं म्हणत खेसारी लालची स्टेजवर इन्ट्री झाली आणि पब्लिकमधून टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या. तेच गाणं खेसारी लालने सानिया मिर्झा समोर गायलं आणि गोडीगोडीने हे सगळं प्रकरण निवळलं. असं हे लोकगीत होतं ज्यामुळे खेसारी लाल तर फेमस झालाच पण सानिया मिर्झाला सुद्धा दखल घेण्यास या लोकगीताने भाग पाडलं होतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.