तामिळनाडूतल्या या गावात आजही दिवाळी साजरी केली जात नाही कारण सुद्धा तसच ए….

दिवाळी म्हणल्यावर चार पाच गोष्टी आपल्याला पटकन आठवतात म्हणजे त्यात मोती साबण फिक्स असतोय, फटाके,नवे कपडे,उटणे,रांगोळ्या, सोनपापड्या वैगरे असं बरंच काय काय. म्हणजे सण उत्सवांमध्ये दिवाळी या सणाची वाट प्रत्येक माणूस बघत असतो कारण हा दिव्यांचा सण, प्रकाशाची उधळण करणारा सण मानला जातो. म्हणजे दिवाळी आली की सगळ्या देशात धुमधाम असते पण तामिळनाडूमध्ये दोन गावं अशी आहेत की जे दिवाळी साजरी करत नाही. तिथं ना उत्सवाचं वातावरण असतं ना फटाके फोडले जातात. आता सणावाराला सुद्धा हवा नाय करायची मग कधी करायची पण या मागे एक प्रेरक कारण आहे जाणून घेऊया.

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यामध्ये एस मांपट्टी आणि कोल्लूकुडीपट्टी या दोन गावांमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही. इथं ना फराळ वाटला जातो ना फटाके फोडले जातात. याच्यामागे एक कारण आहे ते म्हणजे कोल्लूकुडीपट्टी या गावाच्या जवळच वेटांगूडी नावाचं पक्षी अभयारण्य आहे म्हणून तिथले लोकं दिवाळी साजरी करत नाही आणि फटाकेही पेटवत नाहीत.

या गावाला पक्ष्यांची विशेष गोडी आहे. पक्षी हेच त्या विभागाची विशेषता मानली जाते. पक्ष्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून तिथल्या गावकऱ्यांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि गेली कित्येक वर्षे ते तो नियम पाळत आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की इथं फक्त स्थानिकच पक्षी येत नाही तर बाहेरूनही पक्षी येतात आणि तो त्यांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे त्यांची पर्यावरणाच्या दृष्टीने काळजी घेण्याची जबाबदारी ही सगळ्या गावाची असते म्हणून इथं फटाके आणि दिवाळी वर्ज्य आहे.

तेथील जिल्ह्याचे वन अधिकारी संपथलाल गुप्ता सांगतात की तिथं ऑक्टोबर आणि मार्चच्या दरम्यान ग्रे हॉर्न, डारटर्स, स्पूनबील्स, व्हाइट आयबीस, आशियन ओपन बिल स्टोर्क्स, लिटिल कॉरमोरेंट, लिटिल इग्रेट, कॅटल इग्रेट आणि फ्लेमिंगो सारखे अनेक पक्षी येतात. आता ही झाली कोल्लूकुडीपट्टी गावाची गोष्ट, याही पेक्षा वेगळी गोष्ट दुसऱ्या गावाची आहे.

एस मांपट्टी गावाची गोष्ट म्हणजे इथं बऱ्याच वर्षांपासून दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जायची. दिवाळी साजरी करायला लोकं गावातील सावकरांकडून पैसे कर्जाऊ घ्यायचे. पण कर्ज काढून सण साजरे करण्याची सवय अंगलट येऊ लागली आणि त्या कर्जाचं व्याज देता देताच गावकरी नाकीनऊ येऊ लागले आणि कर्जाचा डोंगर वाढू लागला. तेव्हा त्यांनी आपल्या कुलदैवतासमोर त्यांनी कधीच दिवाळी साजरी न करण्याची शपथ घेतली. तेव्हापासून इथं कोणीच दिवाळी साजरी करत नाही. असं सांगण्यात येतं की 1958 सालापासून या गावात एकदाही दिवाळी साजरी केली गेलेली नाही.

बघा असे पण गावं आहेत जे दिवाळी साजरी करत नाही कारणसुद्धा तशी आहेत. तामिळनाडू मधली ही दोन गावं सोडली तर जवळपास सगळा देशच दिवाळीत सोनपापड्या चे बॉक्स गिफ्ट म्हणून पाठवण्यात आणि फटाके फोडण्यात बिझी असतो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.