मशागत न केलेल्या जमिनीतही उन्हाळी पीकं बहरू शकतात; विश्वास बसेल का हो?

भारतातील अनेक तरुण आता व्यवसायांकडे, नोकरीकडे वळताना दिसत असले तरी ‘शेतकऱ्याचा मुलगा’ म्हणून मिरवण्याचा एक वेगळाच स्वॅग तरूणांमध्ये आहे. ब्राऊन मुंडे गाण्यानंतर त्याचं मराठी व्हर्जन  ‘गावरान मुंडे’ जेव्हा हिट होतं त्यातून हा स्वॅग दिसूनच येतो. शेतात जाऊन मोठ्या थाटात फोटो, सेल्फी काढत त्याखाली ‘वावर म्हणजे पावर’ असे हॅशटॅग्स सोशल मिडीयावर फिरताना रोजच दिसतात. पण स्वतः जेव्हा शेती करण्याची वेळ येईल तेव्हा यातील बरेच गावरान मुंडे चटकन ‘मिस्टर इंडिया’ होतील हेही तितकंच खरंय.

याचं कारण म्हणजे शेतीमध्ये साधं एक पीक घेण्यासाठी करावी लागणारी मगजमारी. याची सुरुवात होते ती पीक घेण्याआधी कराव्या लागणाऱ्या जमिनीच्या मशागतीपासून. पण कोणतीही मशागत न करता पीक घेऊन देशातील शेतकरी आता कोट्यावधी रुपये वाचवू शकतात असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का हो? विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण हे शक्य आहे.

देशातील शेतकऱ्यांसाठी हा सुखद धक्का दिलाय तो कृषी तज्ज्ञांनी.

 

मग भिडूंनो, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे? आणि कोणती पीकं घेतली जाऊ शकतात? हे बघूया…

ज्या शेतात आधी भाताचं पीक घेतलं गेलं होतं त्या जमिनीत हे शक्य होणार आहे. भाताची नेमकीच काढणी केल्यानंतर त्याच जमिनीत कोणतीही मशागत न करता उन्हाळी हंगामातील मका, ज्वारी आणि सूर्यफूल ही पीकं घेतली जाऊ शकतात. आता या फक्त वरवरच्या गप्पा नसून याचा प्रयोग करून कृषी तज्ज्ञांनी हे सिध्द केलं आहे बरंका.

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील कांगटी मंडळातील गावात हा प्रयोग करण्यात आलेला आहे. मोची बलैया नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात हा प्रयोग केला गेला. तिथे भाताच्या ओल्या जमिनीत मक्याचे बियाणे थेट पेरले गेले. भात कापणी झाल्यावर एकदा पाणी दिलं जातं आणि नंतर २४ तासांनंतर मक्याचं बी थेट जमिनीत मुरतं. मोची बलैया यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे उत्त्पन्न मिळालं. इतर शेतकरी म्हणजे ते शेतकरी ज्यांनी मशागत करून पीक घेतलं होतं. शिवाय प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती जॅकपाॅट लागला ते वेगळंच.

या शेतकऱ्याचे एकरी सुमारे 3,000 रुपये सुद्धा वाचले. याचं कारण म्हणजे मशागतीच्या प्रक्रियेत नांगरणी, कल्टिव्हेटर वापरणे आणि जमीन समतल करणे यांचा समावेश होतो. पण त्या जमिनीत आधी भाताचं पीक होतं. म्हणून हे सर्व करण्याची गरजंच पडली नाही. म्हणून हा खर्च वाचला आणि शेतकऱ्याचे एकरी सुमारे 3,000 रुपये वाचले. खुद्द कांगटीचे कृषी विस्तार अधिकारी (AEO) जी. संतोष यांनी ही माहिती दिली आहे.

मग भात पिकाचीच जमीन का? भाताच्या शेतीला मशागतीची गरज का नाही पडत?

भाताच्या जमीनीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात सिंचन केलेलं असतं. कारण भाताला पाणी जास्त लागतं. या जमीनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमताही तुलनेनं जास्त असते. शिवाय पिकासाठी लागणारी औषधंसुद्धा भात कापणी नंतरही या जमिनीत बरीच मुरलेली असतात. एकंदरीतच सिंचनाचा, औषधांचा खर्च आपोआपच कमी होतो.

या जमिनीसाठी मका, ज्वारी आणि सूर्यफूल ही पीकं कृषी तज्ज्ञांनी सुचवली कारण ही कमी पाण्यात येणारी पीकं आहेत. तसंच शून्य मशागत असल्याने माती शाबूत राहते, पिकांना कोणताही त्रास होत नाही. भरीस भर म्हणजे ही पीकं लवकर अंकुरतात कारण मुबलक प्रमाणात या पिकांना पाण्याचा पुरवठा होतो.

म्हणजे भिडूंनो, आता पिकाचा कालावधीही कमी झाला ना!

नैसर्गिक संसाधने मौल्यवान आहेत आणि म्हणून त्यांचा प्रभावी आणि शाश्वत वापर आवश्यक आहे. याचा परिपूर्ण वापर ‘झिरो मशागत’ या तंत्रज्ञानाद्वारे करणं शक्य आहे. कमी खर्च, कमी कालावधी आणि कमी मेहनत पण जास्त उत्पादन आणि फायदा भरगोस. जर अशा प्रयोगांनी शेतीच नाही तर खिसादेखील बहरणार असेल, तर गावरान मुंडेचे कितीही पार्ट्स आले तर हिटच होतील. सोशल मिडियाचे हॅशटॅग्स वाले बंदे फिल्डवरही उतरू शकतात. शिवाय रुबाबात शेतकरी त्यांच्या मिश्या पिळू शकतात. फक्त गरज आहे ती अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रयोग करण्याची हिंमत दाखवण्याची. आपकी ये छोटीसी पेहेल आपकी जिंदगी बदल सकती है भिडू!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.