तेरे नामचा सिक्वेल येतोय. 

तेरे नामचा सिक्वेल येतोय. निर्माता सतीश कौशीक यांनीच तस सांगितलय. ते म्हणालेत स्टोरी पुर्ण आहे. या वर्षाच्या शेवटाला आम्ही शुटिंग सुरू करतोय. तेरे नाम सारखाच दुसरा पार्ट हा लव्ह स्टोरीवरच असणार आहे. आणि ही स्टोरी उत्तरप्रदेशातल्या एका गॅंगस्टरच्या लव्हस्टोरीवर असणार आहे. 

१६ वर्ष झाली असतील. तारीख पण १५ ऑगस्ट होती. साल होतं २००३ चं. तेव्हा सिंगल स्क्रिनचा शेवट चालू होता. जिल्ह्याच्या गावात मल्टिफ्लेक्सचं खुळ यायला लागलं होतं. दोनचार स्क्रिन असणाऱ्या थेटरात पॉपकॉर्न खात शांतपणे पिक्चर लागणार होते. हिकडं सिंगल स्क्रिनच्या लाललाल पिचकाऱ्या आणि तो कुबट वास तसाच होता. गणपतीच्या वर्गणी फाडल्यासारखी तिकीट चालू होती.

त्याच काळात स्वातंत्रदिनाच्या दिवशी तेरे नाम रिलीज झालेला. स्वातंत्र, देशभक्ती याचा दूरदूरचा संबध नसणारा हा पिक्चर होता. ब्युटी आणि बिस्ट या सुप्रसिद्ध संकल्पनेवर आधारित ‘सेतू’ या साऊथच्या मुव्हीचा ‘तेरे नाम’ रिमेक होता. सलमानने साकारलेल्या ‘राधे’ नावाचा कॉलेजमधला टपोरी आणि भूमिकाची साधी सरळ ‘निर्जरा’ यांची ही प्रेमकथा होती. 

भूमिका चावला फक्त एवढाच रोल साकारण्यासाठी जन्माला आली होती की काय, अशी शंका यावी इतकी ती ‘निर्जरा’ म्हणून शोभली होती. आधी हा रोल आमिषा पटेल करणार होती म्हणे. पण नशिबाने हा रोल भूमिकाकडे आला आणि तिने पण त्याच सोनं केलं. तिला स्वतःला पण हा पिक्चर एवढा हिट होईल असं वाटलं नसेल. सलमानचं तिच्यासाठी वेडं होणं आणि तिची त्याच्यासाठी होणारी घालमेल या दोहोंची केमेस्ट्री पडद्यावर चांगलीच जुळून आली. साथीला होतं हिमेश रेशमियाच आर्त म्हणावं असं संगीत. “क्यू किसिको” असो की “तुमसे मिलना बाते करणा” असो सगळी गाणी तुफान हिट झाली. 

तो काळ सिडी, डिव्हीडी प्लेअरचा होता. लोकांनी गाण्यांच रतिब घातलं होतं. सलमानची हेअरस्टाईल करुन गल्लीतले नौजवान जोषात आले होते. नव्याने येत असलेल्या मल्टिमिडीया फोनमध्ये रिंगटोन असावी म्हणून श्रीमंताची पोरं गर्दी करत होते. 

पिक्चर पण नंबरी होता. माणसं कशी रडत रडतच बाहेर यायची. निर्जराला उचलून नेताता आणि आपले राधे भैय्या टकले होवून पाठमोरं जातानाचा सीन सुपर होता. आत्ता खरं सांगायच झालं तर तो पिक्चर काही ग्रेट वगैरे नव्हता. पण शहर आणि निमशहरात सापडलेल्या, स्वत:ला भाई समजणाऱ्या आणि अजून बुटकट जीन्समध्ये न आलेल्या आपल्या प्रेयसीकडे बघण्यासाठी पिक्चर परफेक्ट होता. 

तेव्हा सलमान खऱ्या आयुष्यात पण खपलेला होता. काळवीट मारणं, फुटपाथवर गाडी घालणं, देवदासच्या सेटवर ऐश्वर्यासाठी दारू पिवून जाणं, राडा करणं हे सगळं त्याच्या मागे होतं. थोडक्यात आत्ता सलमानला घरी बसायला लागतय अस वातावरण झालेलं. इतक्यात तेरे नाम आलेला. अभिजनांनी कितीही नाके मुरडली असली तरी हा पिक्चर सुपरहिट झाला.‘तेरे नाम’ पिक्चरच्या स्टोरीला लोकांनी सलमानच्या रिअल लाईफ स्टोरीशी रिलेट केलं. ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपमागे तीच कशी दोषी आहे वगैरे चर्चा कॉलेजच्या कट्टयावर झडू लागल्या.

वैयक्तिक जीवनात तो कसा “बाहर से सखत मगर अंदरसे बडे दिलवाला है” अशी इमेज बनली. त्याच्या सगळ्या चूका पदरात घेतल्या गेल्या. इंडस्ट्रीचा ‘बॅड बॉय’ एका झटक्यात फॅन्सचा लाडका ‘भाई’ झाला.  युपी बिहारच्या कानाकोपऱ्यापासून  मुंबईच्या रस्त्यापर्यंत केसांचा मधला भांग पाडलेले ‘तेरे नाम’ स्टाईलचे ‘राधे’ सर्वत्र दिसायला लागले. ते आपल्याला भाव न देणाऱ्या पोरींना पडद्यावरच्या ‘निर्जरा’मध्ये शोधत होते. पिक्चरला तुफान व्यावसायिक यश देखील मिळालं.

पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा सिक्वेलमध्ये सल्लूभाय असणार आहेत का? तर या प्रश्नाच अजून उत्तर मिळालं नाही. फक्त इतकच सांगण्यात आलय की पिक्चरच शुटिंग या वर्षाच्या शेवटपर्यन्त सुरू करण्यात येईल. म्हणजे तेरे नाम यायला आपल्याला २०२० ची वाट बघायला लागणार. 

संदर्भ : https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/tere-naam-2-in-the-works-will-salman-khan-return-as-radhe-1507964-2019-04-23

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.