उद्या कुठल्या जागांवर मतदान आहे, कुणाचं काय ठरलय ? सगळे डिटेल्स वाचून घ्या.

उद्या दिनांक २३ एप्रिल. निवडणुकांचा तिसरा टप्पा. महाराष्ट्रात १४ जागांवर उद्या मतदान होणार आहे. इलेक्शन लागल्यापासून चौकाचौकात आमचं ठरलय, आमचं ठरलय म्हणून लोक्स दंगा करु लागलेत. कुणाचं काय ठरलय हे शेवटपर्यन्त कळणा गड्या. पण कसय एखाद्याला निवडून आणायचं जस ठरलय तस कुणाला पाडायचं हे पण पक्क ठरवून लोकं उद्या बोटाला शाई लावायला जाणारायत. 

आत्ता भलेभले दिग्गज बोलून झाले आहेत. पण कुठल्या मतदारसंघात नेमकं काय वातावरण आहे. कुठल्या चौदा जागांवर उद्या राडा होण्याची शक्यता आहे. कोण कुणाला जड चाल्लय याचा थोडक्यात आढावा आम्ही मांडलाय. तर तुम्ही अस करा हे वाचा आणि शांत चित्ताने मतदानाला जा. 

१) कोल्हापूर लोकसभा. 

कोल्हापूरचा मतदारसंघ पहिल्यापासून कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर १९९९ ते २००९ सदाशिव मंडलिक यांच्या रुपात कोल्हापूरचा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यातच होता. २००९ ते २०१४ सदाशिव मंडलिक अपक्ष खासदार होते. २००९ ला राष्ट्रवादीकडून संभाजी महाराज उभा होते, त्यांचा पराभव सदाशिव मंडलिकांनी केला. 

२०१४ ला शिवसेनेकडून संजय मंडलिक तर राष्ट्रवादीकडून मुन्ना महाडिक उभा होते. मुन्ना महाडिक या मोदी लाटेत निवडून आले. 

आत्ता सेनेचे संजय मंडलिक आणि मुन्ना महाडिक असाच सामना आहे. मात्र मित्राचे शत्रू आणि पुन्हा शत्रूचे मित्र आणि परत मित्राचे शत्रू झालेले बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक हे अप्रत्यक्षरित्या समोरासमोर आहे. आमचं ठरवय हे त्यांनीच पोहचवलेलं घोषवाक्य. यंदा सोबत बंटी पाटील नसल्याचा तोटा महाडिकांना होतोय का नाही ते कळेलच.

२) जळगाव लोकसभा. 

जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन भाजपमध्ये बरीच रस्सीखेच झाली. भाजपने ए.टी पाटील यांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. पण स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आली आणि ऐनवेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या देखील निवडणूक लढवत आहेत.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला होता. जळगाव लोकसभा मतदारसंघावर १९९९ पासून भाजपचा झेंडा आहे. १९९९ ते २००७ वाय.जी. महाजन, २००७ ते २००९ हरिभाऊ जावळे आणि २००९ पासून सलग दहा वर्ष ए.टी.नाना पाटील हे जळगावचे खासदार राहिले आहेत.जळगावात १७ लाख, ५ हजार ९३३ मतदार असून त्यापैकी ७ लाख ९८ हजार ९०६ महिला आहेत. 

३) जालना. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध कॉंग्रेसचे विलास औताडे असा सामना जालन्यात रंगला आहे. रावसाहेब दानवे हे १९९९ पासून जालन्यातून खासदार म्हणून निवडणून येत आहेत. दरवेळी रावसाहेब दानवे यांची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आणि दरवेळी रावसाहेब दानवे निवडून येतात. त्यामुळे लोक त्यांना चकवा अस देखील म्हणतात. यंदा पण बच्चू कडूंनी कॉंग्रेसला दिलेला पाठिंबा, रावसाहेब दानवे यांची वक्तव्य पाहून लोक रावसाहेब धोक्यात असल्याचं सांगत आहेत पण शेवटी चकवा यंदाही खरा ठरेल अशीच चर्चा आहे. 

जालना लोकसभा मतदारसंघात १६ लाख १२ हजार ०५४ इतके मतदान आहे पैकी ७ लाख ४५ हजार महिला आहेत. 

४) रावेर. 

२००९ ते २०१४ हरिभाऊ जावळे आणि २०१४ पासून रावेरच्या खासदार रक्षा खडसे आहेत. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. गेल्या टर्मला त्यांना राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांचा तीन लाख १८ हजार मतांनी पराभव केला होता. यावर्षी कॉंग्रेसचे उल्हास पाटील त्यांच्या विरोधात इलेक्शन लढत आहेत. 

रावेरमध्ये टोटल १५ लाख ९३ हजार मतदान आहे. 

५) औंरगाबाद. 

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औंरगाबादला चंद्रकांत खैर यांच्यामुळे ओळख मिळाली आहे. यंदा जागा कॉंग्रेसकडे जाणार की राष्ट्रवादीकडे याची चर्चा चालू होती. अखेर कॉंग्रेसने या ठिकाणावरून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. पहिल्या टप्यात दुरंगी वाटणारा सामना वंचित आघाडीचे अम्तियाज जलिल यांच्यामुळे तिरंगी तर हर्षवर्धन जाधव यांच्या एन्ट्रीने चौरंगी झाला. 

नाय नाय म्हणतं औंरगाबादमध्ये चौघांच्या लढतीमुळे उमेदवारांसोबत मतदारांना देखील कळायचं बंद झालय. अशा ठिकाणी आमच ठरलय म्हणणं देखील अवघड जागेचं दुखणं ठरु शकतय. औंरगाबादमधून १५ लाख ८९ हजार मतदार आहेत.

६) रायगड. 

रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातले पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातले दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघ येतात. २००९ ते २०१९ पर्यन्त इथले खासदार सेनेचे अनंत गिते आहेत. ते तिसऱ्यांदा निवडून येण्याच्या तयारीत असताना रायगडमधून राष्ट्रवादीने सुनिल तटकरे यांना मैदानात उतरवलं आहे. इथे १५ लाख ३२ हजार मतदार आहेत. शिवाय सुनिल तटकरे या नावाचे दोन अपक्ष देखील आहेत. 

७) पुणे. 

भाजपने या वर्षी पुण्यातून गिरीष बापट यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसने निष्ठावंताचा निकष लावून मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. आणि खर सांगायचं तर वातावरण शांत झालं. आत्ता पुण्याबद्दल काहीच बोलण्यासारखं राहिलं नाही अस लोकं म्हणत आहेत. आम्ही आपलं तटस्थ असून तुम्हाला सांगतोय हे नशिब. पुण्यात १८ लाख ३५ हजार मतदार आहेत. बघुया यापैकी किती जण मतदान करतेत. 

८) बारामती. 

२००९ पासून इथल्या खासदार सुप्रियाताई पवार आहेत. सुप्रियाताई पवार तिसऱ्यांदा निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. शरद पवारांचा मतदारसंघ असल्याने तो कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला न ठरता पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. महिलेच्या विरोधात महिला असा निकष लावून यंदा कांचन कुल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुरवातीला सहज, साध, सोप्प वाटणार वातावरण अमित शहा यांच्या सभेमुळे आणि चंद्रकांत पाटलांच्या लावून धरण्याच्या स्वभामुळे तणावात आलं आहे. शेवटी जनताच जनार्दन असते. बारामतीतून टोटल १८ लाख १३ हजार मतदान आहे. त्यापैकी महिलांच मतदान ८ लाख ५३ इतकं आहे. 

९) अहमदनगर. 

यंदा अहमदनगर दक्षिणमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी थेट लढत आहे. सुजय विखे भाजपमध्ये आहेत हे लोकांनी लक्षात ठेवून मतदान करावे लागणार आहे हे प्रमुख आव्हान सुजय विखे यांच्यासमोर आहे तर आपण आणि सरळ शांत सहज राहून निवडणुन यायला हवं अस आव्हान संग्राम जगताप यांच्यासमोर आहे. 

२००९ पासून खासदार असणारे दिलीप गांधी यांना टाळून सुजय विखे यांना भाजपने तिकीट दिलं आहे. काट्याची टक्कर म्हणून तिथून संग्राम जगताप यांना उभा करण्यात आलं आहे. भाजपच्या एकनिष्ठ लोकांना टाळणं, बाहेरचा उमेदवार लादणं या गोष्टी विखेंच्या विरोधात जात आहेत तर गुंडगिरी हा मुद्दा संग्राम जगताप यांच्या विरोधात जात आहे. आत्ता इथे काय होणार हे भलाभला तटस्थ सांगू शकणार नाही. पण फाईट टफ चालू आहे एवढं मात्र नक्की. अहमदनगर दक्षिण मधून १६ लाख ९९ हजार मतदान आहे. 

१०) माढा. 

माढा पाडाचं राजकारण किती खरं किती खोटं हे देवाला माहिती. पण हे राजकारण रंगल. शरद पवारांनी लढणार न लढणार या विचारात आठवडा काढला आणि अखेर नाही म्हणून सांगितलं. रणजितसिंह मोहिते पाटील मग भाजपात गेले. लोकांना वाटलं आत्ता रणजितसिंह लढणार पण लढायला आले रणजितसिंह नाईक निंबाळकर. राष्ट्रवादीने संजयमामा शिंदेना उमेदवारी दिली. वन टू वन फाईट घोषीत झाली. 

विजयसिंह मोहिते पाटलांची ताकद आहे हे मान्य करावेच लागेल. शिवाय राष्ट्रवादीचा स्वतंत्र फॅन क्लब देखील आहे. आत्ता यात नेमकं काय होणार याचा अंदाज अजून घावत नसला तरी राष्ट्रवादीच्या पारंपारिक बालेकिल्याला भाजपनं अवघड केलय एवढं नक्की. 

११) सातारा. 

साताऱ्याबद्दल काय बोलायचं. सगळ्यांना सगळं माहित असतय. इथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध नरेंद्र पाटीलांनी मैदानात उडी घेतलेय. उदयनराजे राष्ट्रवादीकडून तर नरेंद्र पाटील शिवसेनेकडून उभा आहेत. या सामना रंगण्याच्या अगोदरच निवडणुका आल्या अस वाटत आहे. असो. मागच्या वेळी मोदी लाटेत उदयनमहाराज निवडून आले होते. यंदा काय होईल ते तुम्हीच बघा. 

१२) रत्नागिरी सिंधदुर्ग. 

सुरेश प्रभू यांना हरवून निलेश राणे खासदार झाले आणि निलेश राणेंना हरवून विनायक राऊत खासदार झाले. यंदा निलेश राणे महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाकडून तर शिवसेनेकडून विनायक राऊत आणि कॉंग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर उभा आहेत. रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील ३-३ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात पैकी टोटल सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहे.  

१३) हातकणंगले. 

हातकणंगले मध्ये २००९ पासून राजू शेट्टी खासदार आहेत. मोदी लाटेत मोदींसोबत राहिल्याने त्यांना फायदाच झाला. यंदा ते मोदी लाटेच्या विरोधात आहेत. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव करून खासदार झाले होते. आता त्यांचे चिरंजीव धैर्यशील माने त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उभा आहेत. त्यांनी नाही नाही म्हणतं चांगलच वातावरण पेटवलं आहे. हातकणंगलेतून १६ लाख ३० हजार मतदान आहे. 

१४) सांगली. 

सांगली कॉंग्रेसचा बालेकिल्ला. मात्र मोदीलाटेत राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषद आमदार भाजपमध्ये आले आणि ते खासदार झाले. संजयकाका पाटील हे विद्यमान खासदार. भाजपने त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी दिली. संजयकाका कामाला लागले पण विरोधकांकडून फायनल होतं नव्हतं. गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीकडून उभा राहिले.

कॉंग्रेसने हक्काची जागा स्वाभीमानीला सोडली आणि स्वाभीमानीने विशाल पाटलांना उमेदवारी दिली. विशाल पाटील वसंतदादा पाटलांचे नातू. पहिला एकतर्फी वाटणारी निवडणुक दुरंगी आणि आत्ता तिरंगी झालेली आहे. सांगली लोकसभेला एकूण १६ लाख ४९ हजार मतदान आहे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.